जळगाव – रावेर स्थानकावर कामायनी एक्स्प्रेसमधून प्रवास करणाऱ्या बऱ्हाणपुरच्या एका प्रवाशाचे सुमारे साडेचार लाख रूपये लुटण्यात आले होते. या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुरूवारी रात्री चार संशयितांना मुद्देमालासह ताब्यात घेण्याची कारवाई केली.
मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूरचे रहिवाशी सुधाकर धनलाल पटेल ६०) हे कामायनी एक्सप्रेसने नऊ सप्टेंबर रोजी प्रवास करत होते. गाडी रावेर स्थानकावर थांबली असता संशयित किरण पंडित हिवरे (३२, रा. भातखेडा, ता. रावेर), अजय सुपडू कोचुरे (२५, रा. खिर्डी, ता. रावेर), हरीश अनिल रायपुरे (२५, रा. प्रतापपुरा, बऱ्हाणपूर) आणि गोकुळ श्रावण भालेराव (२७, रा. डांभूर्णी, ता. यावल) आदींनी पटेल यांना मारहाण करून त्यांच्याकडील सुमारे चार लाख ५० हजार रुपयांची बॅग हिसकावून पळ काढला होता.
या प्रकरणी पटेल यांच्याकडून सुमारे चार लाख ५० हजार रुपयांची रोख रक्कम घेऊन पसार झालेल्या चारही संशयितांना पोलिसांनी अटक केली आहे. तसेच त्यांच्याकडून संपूर्ण रक्कम जप्त करण्यात आली आहे.
जळगाव शहरातील जी. एस. मैदानाच्या परिसरात लुटलेल्या पैशांची वाटणी करण्यासाठी चारही संशयित एकत्र येणार होते. त्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ निरीक्षक राहुल गायकवाड यांना मिळाली. त्यानंतर त्यांनी तातडीने पोलीस पथकाला कारवाईचे निर्देश दिले. उपनिरीक्षक सोपान गोरे, पोलीस कॉन्स्टेबल प्रीतम पाटील, यशवंत डहाकडे, बबन पाटील, सचिन घुगे, प्रदीप सपकाळे आणि मयूर निकम यांच्या पथकाने गुरूवारी रात्री नऊ वाजता सापळा रचून चौघांना ताब्यात घेतले. पुढील कारवाईसाठी संशयितांना जप्त केलेल्या मुद्देमालासह भुसावळ येथील लोहमार्ग पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
पाचोऱ्यात १८ तलवारी जप्त
पाचोरा शहरात गुरूवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास पोलिसांनी एका तरूणाकडून सुमारे ५४ हजार रूपये किमतीच्या १८ तलवारी जप्त केल्या. पाचोरा पोलीस ठाण्याचे निरीक्षक राहुलकुमार पवार यांना माहिजी नाका परिसरात तलवारी विक्रीसाठी एक तरूण येत असल्याची माहिती मिळाली होती. त्या आधारे पोलिसांनी तात्काळ कारवाई करत स्मशानभूमी रस्त्यावरील बाहेरपुरा येथील सोहेल शेख (२४ वर्षे) याला ताब्यात घेतले.
प्राथमिक चौकशीत त्याने काही तलवारी आधीच विकल्याचे कबूल केले. त्यामुळे त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर आणि उपविभागीय अधिकारी अरूण आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक राहुलकुमार पवार, उपनिरीक्षक कृष्णा घायाळ, कैलास ठाकूर, पोलीस नाईक संदिप राजपूत, जितेंद्र पाटील आणि हरीश परदेशी यांनी सदर कारवाई यशस्वी केली.