नाशिक – जिल्ह्यातील लोकांविषयी काही बोलले की ते तक्रार करतात. तुम्ही कामावर असतांना पत्ते खेळणार. तुमच्या मागील माणूस तुमचा व्हिडिओ काढणार. तुमच्याच माणसाने तुमचा कार्यक्रम केला की आमच्यावरच अब्रु नुकसानीचा दावा करणार. हा कुठला न्याय, असा प्रश्न उपस्थित करुन राष्ट्रवादीच्या (शरद पवार) खासदार सुप्रिया सुळे यांनी क्रीडामंत्री माणिक कोकाटे यांना लक्ष्य केले.

दिंडोरी तालुक्यातील खेड येथे विविध विकास कामांचा शुभारंभ शनिवारी खासदार सुळे यांच्या उपस्थितीत झाला. यावेळी मेळाव्याच्या माध्यमातून त्यांनी उपस्थितांशी संवाद साधला. आज हम नंबरसे कम हें. फिर भी हम इमानदार हैं, असा शेरही त्यांनी ऐकविला. आमदार रोहित पवार यांच्याविरुध्द अब्रु नुकसानीची तक्रार करण्यात आली आहे. तुमच्या मागच्या माणसांपैकी कोणीतरी व्हिडिओ काढून तो समाजमाध्यमात टाकला. तुमचा कार्यक्रम आम्ही केला की तुमच्या माणसाने ? सुप्रिया सुळे समोरून वार करते. अब्रु नुकसानीचा दावा म्हणजे चोर तो चोर सीनाचोरी, असा प्रकार झाला. आम्ही शेवटपर्यंत लढू, असा इशारा खासदार सुळे यांनी दिला. या सरकारच्या आणि माझ्या विकासाच्या संकल्पना वेगळ्या आहेत.

सरकारला असे वाटते की, ठेकेदाराचा विकास झाला, महामार्ग झाला म्हणजे विकास. पण मला वाटते समोरच्या महिलेच्या हातातील एक जरी काचेची बांगडी सोन्याची झाली तर त्यास विकास म्हणावे लागेल. शेतकऱ्याच्या शेतीमालाला हमीभाव मिळाला पाहिजे, हा विकास आहे. माझे सर्वांशी वैचारीक मतभेद आहेत, परंतु वैयक्तीक नाही. विरोधकही सशक्त लढाई लढत आहेत केंद्राच्या जल जीवन मिशनसह अनेक योजनांमध्ये घोटाळे झाले आहेत. काय चाललं आपल्या राज्यात, असा प्रश्नही सुळे यांनी उपस्थित केला.

आज आपण कबुतरे, कुत्रे अशा गोष्टींवर चर्चा करतो. कर्जमाफीवर चर्चा कधी करणार, असेही त्या म्हणाल्या. मुख्यमंत्री सरसकट कर्जमाफी देण्याविषयी बोलले होते. आता ओला दुष्काळ असतांना कुठे झाली कर्जमाफी, केंद्रात सत्ताधाऱ्यांकडे कर्जमाफीसाठी कोणी गेले का, असेही प्रश्न खासदार सुळे यांनी उपस्थित केले.

मुख्यमंत्री मला वेळ देत नाही. मी माझी कामे दिल्लीत करून घेते. गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेत सर्व प्रश्न मांडले. शेतीची परिस्थिती अतिशय गंभीर आहे. सरकार काय करते ते लक्षात येत नाही. या प्रकरणी लक्ष घालावे, अशी मागणी सुळे यांनी केली. भरतीय जनता पक्ष आम्हाला ७० वर्षात तुम्ही काय केले, असा विचारतो. आम्ही अमेरिकेला भारतीय शेती क्षेत्रात पाय ठेवू दिला नाही. सध्या सरकारला लाडक्या बहिणींची काळजी वाटते. परंतु, सरकारने २५ लाख बहिणींची नावे कमी केली. या संपूर्ण योजनेची चौकशी व्हायला हवी, अशी मागणी खासदार सुळे यांनी केली.

अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांनी हा सोहळा सर्वपक्षीय व्हायला हवा होता, असे सांगितले. त्याविषयी खासदार सुळे यांनी त्यांना कानपिचक्या दिल्या. तुम्ही आमचा पक्ष मानत नातही. आम्ही तुमचा. आपले संबंध खूप चांगले. परंतु, कौटुंबिक संबंध उंबऱ्याच्या आत. उंबऱ्याबाहेर आपली लढाई चालु राहील, असे खासदार सुळे यांनी सुनावले.