लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

नाशिक: प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या संशयिताने पोलीस कोठडीत आत्महत्येचा प्रयत्न केला. अंबड पोलीस ठाण्यात ही घटना घडली. प्रसाधनगृहातील फरशीच्या तुकड्याने संशयिताने मनगटाची नस कापून घेतली. पोलिसांनी वेळीच धाव घेतल्याने अनर्थ टळला.

विशाल कुऱ्हाडे (१९, घरकुल चुंचाळे) असे पोलीस कोठडीत आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या संशयिताचे नाव आहे. कुऱ्हाडेला खूनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. कुऱ्हाडे आणि त्याचे साथीदार शनिवारी रात्री संविधान चौकातील रमाई अपार्टमेंट येथे वाढदिवस साजरा करीत होते. यावेळी संबंधितांकडून गोंधळ घातला जात असल्याने शेजारी राहणारे शंकर अवचार, संतोष मोरे यांनी गोंधळ करू नका, असे सांगितल्याने टोळक्याने त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला होता. या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच कुऱ्हाडेला अटक करण्यात आली.

हेही वाचा… मनमाड: अन्न महामंडळाच्या गोदामातून २७ क्विंटल तांदळाची चोरी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

संशयित सध्या अंबड पोलीस ठाण्यातील कोठडीत आहे. सायंकाळी त्याने प्रसाधनगृहात जाण्याचा बहाणा केला. बराच वेळ होऊनही तो बाहेर आला नाही. त्यामुळे सुरक्षारक्षक कमलेश आवारे यांनी पाहणी केली असता संशयिताने फरशीच्या तुकड्याने हाताच्या मनगटावरील नस कापून घेतल्याचे दिसून आले. आवारे यांनी तत्काळ वरिष्ठांना माहिती देऊन संशयिताला उपचारार्थ हलविले.त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती वैद्यकीय सुत्रांनी दिली. या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात आत्महत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.