लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

नाशिक : शिवसेना ठाकरे गटाचे नेते, माजी महापौर वसंत गिते यांचे मुंबई नाकास्थित संपर्क कार्यालय शनिवारी महापालिकेने मोठा फौजफाटा घेऊन जमीनदोस्त केले. त्यास गिते समर्थकांनी विरोध केल्यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला होता. जागा राज्य परिवहन (एसटी) महामंडळाची असताना महापालिकेच्या कारवाईला आक्षेप घेण्यात आला. अखेर गिते समर्थकांनी स्वत:हून कार्यालयातील महापुरुषांचे पुतळे, साहित्य काढून घेतल्याने कारवाईचा मार्ग मोकळा झाला. राजकीय हेतूने ही कारवाई झाल्याचा आरोप ठाकरे गटाने केला आहे.

मुंबईनाका परिसरात माजी महापौर गिते यांचे प्रदीर्घ काळापासून कार्यालय आहे. हे कार्यालय जमीनदोस्त करण्याचे आदेश महापालिकेने काढले होते. त्यानुसार शनिवारी दुपारी अतिक्रमण निर्मूलन पथक मोठा पोलीस बंदोबस्त घेऊन या ठिकाणी धडकले. हे समजताच गिते समर्थक जमा झाले. जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर, वसंत गिते, माजी उपमहापौर प्रथमेश गिते यांच्यासह अन्य माजी नगरसेवकांनी धाव घेतली. अनुचित प्रकार घडू नये म्हणून विविध पोलीस ठाण्यांची कुमक बोलावण्यात आली. कार्यालयाचा विषय न्यायप्रविष्ठ असल्याचा मुद्दा गिते यांच्या वकिलांनी मांडला. तीन तारखेला सुनावणी असून तोपर्यंत प्रतीक्षा करण्याची मागणी करण्यात आली. परंतु, पथक कारवाईवर ठाम राहिले.

आणखी वाचा-आरोग्य विद्यापीठ अधिसभेसह परिषदेवर नऊ विद्यार्थी बिनविरोध

सायंकाळपर्यंत हा गोंधळ सुरू होता. यावेळी गिते समर्थकांनी कडाडून विरोध केला. काही जण जेसीबीसमोर आडवे आले. कार्यालयासमोर शिवसेनाप्रमुख, पक्षप्रमुखांचे छायाचित्र असणारी कमान आहे. तिला धक्का लागल्यास महागात पडेल, असा इशारा दिला गेला. ५० खोके सबकुछ ओके यांसह स्थानिक आमदाराच्या विरोधात घोषणाबाजी झाली. पथकाने हॉटेल, छोटी दुकाने, हातगाड्या हटविले. समर्थकांचा विरोध मावळल्यानंतर कमान कायम ठेवत गिते यांचे कार्यालय जमीनदोस्त करण्यात आले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वसंत गिते यांच्या कार्यालयाची जागा एसटी महामंडळाची असताना महानगरपालिकेने कारवाई करणे बेकायदेशीर आहे. राजकीय दबावापोटी मनपा आयुक्तांनी ही कृती केली. शनिवारी महापालिकेला सुट्टी असताना आयुक्तांनी आदेश कसे काढले ? नोटीस न देता, म्हणणे मांडण्याची संधी न देता कारवाई केली गेली. शासनाने सक्ती केली आणि मनपा आयुक्तांनी अंमलबजावणी केली. या कारवाई विरोधात न्यायालयात दाद मागितली जाईल. -सुधाकर बडगुजर (जिल्हाप्रमुख, ठाकरे गट)