नाशिक फस्र्टच्या ‘ट्रॅफिक नॉलेज हब’चे आज उद्घाटन
रस्ते अपघातांमध्ये दरवर्षी प्राण गमावणाऱ्यांची संख्या अतिशय मोठी आहे. वाहन चालविताना नियमांचे पालन होत नसल्याने अपघातांचे प्रमाण दिवसागणिक वाढत आहे. या बाबी लक्षात घेऊन विद्यार्थ्यांसह वाहनधारकांना प्रशिक्षण देण्यासाठी नाशिक फर्स्ट संस्थेने वर्षभरापूर्वी साकारलेल्या ‘चिल्ड्रन ट्रॅफिक पार्क’मध्ये सुरक्षित वाहतूक या विषयावर शिक्षण देण्यासाठी राज्यातील पहिली संस्था सुरू करण्याचा संकल्प सोडला आहे. वाहतूक व्यवस्थापनाशी संबंधित पुस्तके, ध्वनी व चित्रफितींचा संग्रह, मोटार चालविण्याचे आभासी प्रशिक्षण देणारी यंत्रणा (सिम्युलेटर) आदींचा अंतर्भाव असणाऱ्या ‘नॉलेज हब’ची उभारणी त्यातील महत्त्वपूर्ण टप्पा ठरेल. या हबचे उद्घाटन शनिवारी सकाळी साडेअकरा वाजता केंद्रीय भूपृष्ठमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.
मुंबई नाका परिसरातील मोटकरीनगर येथील उद्यानात होणाऱ्या या सोहळ्यास पालकमंत्री गिरीश महाजन, महापौर अशोक मुर्तडक, आ. प्रा. देवयानी फरांदे आणि आ. सीमा हिरे आदी उपस्थित राहणार आहे. महापालिकेने उपलब्ध केलेल्या जागेत नाशिक फर्स्टने तब्बल साडेतीन कोटी रुपये खर्चून वाहतुकीच्या नियमांची माहिती देणारे हे अनोखे उद्यान साकारले आहे. सप्टेंबर २०१५ मध्ये त्याचे उद्घाटन झाले. या उद्यानाला भेट देऊन प्रशिक्षण घेणारा विद्यार्थी नंतर पालकांनाही वाहतुकीच्या नियमांची आठवण करून देईल, अशी त्याची रचना आहे. वर्षभराच्या कालावधीत हजारो शालेय विद्यार्थी आणि शालेय वाहतूक करणारे वाहनचालक, रिक्षाचालक यांना प्रशिक्षित करण्यात आले. रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत या प्रशिक्षित विद्यार्थ्यांनी एक दिवस शहरातील वाहतूक व्यवस्थेचे नियोजनही केले होते. काही दिवसांपूर्वी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना सुरक्षित वाहतुकीचे धडे देण्यासाठी ‘डॉन’ उपक्रमांची मुहूर्तमेढ रोवली गेली. त्या अंतर्गत वर्षभर वेगवेगळे उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे संस्थेचे अध्यक्ष अभय कुलकर्णी यांनी सांगितले.
‘नॉलेज हब’द्वारे प्रशिक्षणात महत्त्वपूर्ण हातभार लागणार आहे. मोटार वाहतूक नियमांशी संबंधित पुस्तके, वाहतूक व्यवस्थानाशी निगडित ध्वनी व चित्रफितींचा संग्रह, मोटार चालविण्याचे आभासी प्रशिक्षण देणारी यंत्रणा (सिम्युलेटर) याचा लाभ प्रशिक्षणार्थीना मिळणार आहे. अनोख्या उद्यानाची निर्मिती, सुरक्षित वाहतुकीसाठी प्रशिक्षण आणि आता नॉलेज हब अशी पावले टाकत संस्थेने वाहतुकीशी निगडित प्रशिक्षण देण्यासाठी संस्था उभारण्याचा मानस ठेवला आहे. ही बाब प्रचंड खर्चीक असली तरी आतापर्यंत या प्रकल्पास अनेक बडे कारखाने व उद्योजकांनी योगदान दिले आहे. राज्यात वाहनधारकांना शास्त्रशुद्ध प्रशिक्षण देणारी कोणतीही संस्था कार्यरत नाही. ही उणीव भरून काढण्याचा नाशिक फर्स्टचा प्रयत्न आहे.
चिल्ड्रन ट्रॅफिक पार्क आणि प्रशिक्षण
या उद्यानात भ्रमंती करताना कोणत्याही रस्त्यांवर असणारी सर्वागीण स्थिती अनुभवयास मिळते. उड्डाणपूल, ‘झेब्रा क्रॉसिंग’, सिग्नल यंत्रणा, एकेरी मार्ग, पदपथ, बस थांबा, रुग्णालय, पेट्रोलपंप, रस्ता वाहतुकीचे दिशादर्शक फलक, आदेशात्मक चिन्हे, सावध करणारी चिन्हे कोणती? आदी वाहतूक नियमांवर प्रकाश टाकण्यात आला आहे. ‘अॅम्पी थिएटर’चाही अंतर्भाव आहे. वाहतूक प्रशिक्षण केंद्रात विद्यार्थ्यांना वाहतुकीच्या नियमांची माहिती देण्याचा उपक्रम राबविला जातो. दररोज १०० विद्यार्थी या ठिकाणी येतात. त्यांच्यासाठी सायकलची तजवीज आहे. उद्यानातील रस्त्यांवर फेरफटका मारून वाहतुकीचे नियम, रस्त्यावरील स्थिती याचे ते अवलोकन करतात. या वेळी वाहतूक पोलीसही उपस्थित असतात. नंतर खास अभ्यासक्रमाचे पाठ दिले जातात. प्रथम विद्यार्थ्यांची प्रशिक्षण पूर्व आणि नंतर प्रशिक्षणानंतर चाचणी घेतली जाते. याच ठिकाणी रिक्षाचालक, शालेय विद्यार्थी वाहतूक करणारे बसचालक व इतर वाहनधारकांना मार्गदर्शनाची व्यवस्था करण्यात आली आहे.