वाशी टोल नाक्यावर टाळेबंदीच्या नियमांची कठोर अंमलबजावणी
नवी मुंबई : नवी मुंबईतील कठोर टाळेबंदी सुरू केली आहे. मुंबईतून अत्यावश्यक सेवेव्यतिरीक्त अन्य कोणालाही शहरात येऊ दिले जात नाही. याच कारवाई दरम्यान १७५ हून अधिक रिक्षा जप्त करण्यात आल्या आहेत. या सर्व रिक्षा नवी मुंबईतील टाळेबंदी संपल्यावर परत देण्यात येणार आहेत. वाशी टोल नाक्यावर सदर कारवाई करण्यात आली आहे
नवी मुंबईत ३ ते १३ जुलै अशी दहा दिवसांची टाळेबंदी जाहीर करण्यात आली आहे. टाळेबंदीत या पूर्वी असलेल्या टाळेबंदी प्रमाणेच नियम करण्यात आले मात्र पहिल्या दोन दिवस हि टाळेबंदी नागरिकांनी गांभीर्याने न घेतल्याने अखेर पोलीस आयुक्त संजीव कुमार यांनी पोलिसांना दिलेल्या आदेशानुसार नियमांची कठोर अंमलबजावणी सुरू करण्यात आले. यात मुंबईतून ये-जा करणारे अनेक नोकरदार आहेत. त्यात वाशी ते मानखुर्द दरम्यान मोठय़ा प्रमाणात शेअर रिक्षा चालतात. मात्र करोनामुळे बसमध्ये मर्यादित प्रवासी असल्याने अनेक प्रवाशांना बस मिळत नसल्याने रिक्षाचा धंदा तेजीत आहे.
‘टाळेबंदीनंतर रिक्षाचालकांना परत’
पूर्वी केवळ मानखुर्दपर्यंत असणाऱ्या शेअर रिक्षा चेंबूर, शीव आणि घाटकोपपर्यंत सुरू झाल्या आहेत. नवी मुंबईत टाळेबंदी असूनही या रिक्षा बिनदिक्कत व्यवसाय करीत असल्याचे लक्षात आल्यावर वाशी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजीव धुमाळ आणि वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भानुदास खटावकर यांनी सोमवार कठोर अमलबजावणी सुरू केली आहे. यात अत्यावश्यक कामाव्यतिरिक्त प्रवाशाला घेणे अतिरिक्त प्रवासी घेणे आदी कायद्यचे उल्लंघन केल्या प्रकरणी सोमवार आणि मंगळवार या दोन दिवसात १७५ पेक्षा अधिक रिक्षा टॅक्सी जप्त करण्यात आल्या. टाळेबंदी संपुष्टात आल्यानंतर जप्त रिक्षा चालकांना परत केल्या जातील, असे वाहतूक पोलिसांच्या वतीने सांगण्यात आले.