आठवडय़ाभरासाठी बंद ठेवण्यात आलेला मुंबई कृषी बाजार उत्पन्न समिती (एपीएमसी)  सोमवारी (१८ मे) पहिल्या टप्प्यात सुरू करण्यात आली. मात्र, पहिल्याच दिवशी टाळेबंदीचे नियम धाब्यावर बसवत लोकांनी धान्य बाजारात रांगा लावल्या. या वेळी सामाजिक अंतर पाळण्यात आलेले नव्हते. या स्थितीवर नवी मुंबई पालिका आयुक्तांनी ‘एपीएमसी’ नियमांचे काटेकोर पालन करण्याच्या सूचना केल्या होत्या. तरीही ग्राहक आयुक्तांचे आदेश पाळत नसल्याचे दिसून आले.

संक्रमणाचा स्रोत म्हणून ‘एपीएमसी’ बाजाराकडे पाहण्यात येऊ लागल्याने १७ मेपर्यंत येथील व्यवहार पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय उच्चस्तरीय बैठकीत घेण्यात आला होता. शहरातील १, १९०रुग्णांपैकी ३७० रुग्ण एपीएमसीशी निगडित होते.

बाजार पुन्हा सुरू करायचा असेल तर सामाजिक नियमांचे पालन बंधनकारक राहील, असे पालिका आयुक्तांनी आदेश म्हटले होते. सोमवारी पहिल्या टप्प्यात भाजीपाला, धान्य आणि मसाला बाजार सुरू करण्यात आले. पहिल्याच दिवशी धान्य बाजाराच्या प्रवेश द्वारावर गर्दी झाली. त्यामुळे बाजारातील ग्राहकांच्या येण्या-जाण्यावर मर्यादा घातल्या जाव्यात, अशी मागणी होत आहे.

‘एपीएमसी’त करोनाचे संक्रमण लक्षात घेऊन बाजारात येणाऱ्याची तपासणी करूनच त्याला बाजारात प्रवेश द्यावा, अशी सूचना दिली आहे. त्यानुसार बाजारात रविवारी रात्री ८ ते सोमवार सकाळी ८ या कालावधीत १,८९६ घटकांची थर्मल व ऑक्सिजन मात्रेची तपासणी करूनच आत प्रवेश देण्यात आला.

‘एपीएमसी अ‍ॅप’ लवकरच

बाजारातील गर्दी कमी करण्यासाठी ऑनलाइन व्यवहारावर भर देण्यात येत आहे. ग्राहक ऑनलाइन मालाची बुकींग करतील तर व्यापारी, अडते,वाहतूकदार हे मागणीनुसार नोंदवलेला माल ग्राहकांना पोचवतील यासाठी ‘एपीएमसी अ‍ॅप’ तयार करण्यात येणार आहे. सोमवारी बाजारात प्रत्येकाची पूर्ण तपासणी करूनच आत प्रवेश दिला जात होता.

-अनिल चव्हाण, सचिव, एपीएमसी