|| विकास महाडिक

रेल्वे, विमानतळ उभारणारे देशातील सिडको एकमेव महामंडळ

नवी मुंबई : मुंबईला पर्याय म्हणून निर्माण करण्यात आलेल्या नवी मुंबईच्या शिल्पकार संस्था सिडकोला बुधवारी ५० वर्षे पूर्ण होत असून हा सुवर्णमहोत्सवी कालावधी देशातील एका शहर व संस्थेच्या सर्वांगीण विकासाचा असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. रेल्वे आणि विमानतळ प्रकल्प उभारणारे सिडको हे देशातील एकमेव महामंडळ आहे. त्यामुळे शहरांचे शिल्पकार म्हणून घोषवाक्य घेऊन उभ्या राहिलेल्या सिडकोला राज्यात अनेक छोटीमोठी शहरे उभारण्याची संधी मिळावी, अशी अपेक्षा नियोजनकार व्यक्त करीत आहेत. चिखलधारा येथे सिडको हिल स्टेशनची उभारणी करीत आहे.

देशात चंडीगडनंतर नियोजित शहर म्हणून नवी मुंबईचे नावलौकिक आहे. अलीकडे दिल्लीच्या जवळ गुडगाव विकसित केले गेले असले तरी मुंबईसारख्या आर्थिक राजधानीला खेटून उभ्या राहिलेल्या या शहराचा महिमा कमी झालेला नाही. राज्यातील दुसऱ्या आंतरराष्ट्रीय विमानतळाची मुहूर्तमेढ सिडकोने २३ वर्षांपूर्वी रचली असून पुढील दोन वर्षांत हा प्रकल्प कार्यान्वित होणार असून यामुळे जगात नवी मुंबईची एक वेगळी ओळख निर्माण होणार आहे. याच विमानतळाला न्हावा शेवा सागरी मार्ग जोडला जाणार असल्याने मुंबई केवळ बावीस मिनिटांच्या अंतरावर येणार आहे. त्यामुळे मुंबई नवी मुंबई खऱ्या अर्थाने एकरूप होणार असून नवी मुंबईत निवास आणि मुंबईत काम, अशी एक परदेशी संकल्पना विकसित होण्याची शक्यता जाणकार व्यक्त करीत आहेत. विकासाचा हा केंद्रबिंदू ओळखून मोठमोठ्या उद्योगसमूहांनीदेखील उरण, द्रोणागिरी, पनवेल या ठिकाणी उद्योग व्यवसायाच्या मुख्यालयांची मुहूर्तमेढ रोवली आहे. जेएनपीटी विस्तारानंतर हा संपूर्ण भाग आर्थिक विकासाचे केंद्र होणार आहे. विमानतळाच्या जवळील भाग हा नियोजित विकसित व्हावा यासाठी निर्माण करण्यात आलेल्या नैना क्षेत्रात मोठ्या प्रमाणात गृहसंकुले उभी राहणार असून या महामायी महामुंबईची लोकसंख्या झपाट्याने वाढणार आहे. विस्र्तीण रस्ते, मुबलक पाणी, दिवाबत्ती, दळणवळणाचा सुखकारक सोय, मोकळ्या जागा, शेकडो उद्याने, शाळा, कॉलेज, रुग्णालयामुळे हे एक छोटे राज्य असल्यासारखे आहे. सिडकोने या क्षेत्राचा सर्वांगीण विकास केला असून दळणवळणाचे प्रमुख साधन असलेल्या रेल्वेचे जाळे विणण्यासाठी पदरमोड केली आहे. खर्चातील अर्ध्याहून जास्त (६७) टक्के हिस्सा उचलून रेल्वेला नवी मुंबईत येण्यास सिडकोने भाग पाडले आहे. त्यामुळे मागील २५ वर्षांत नवी मुंबईचा विकास झपाट्याने झालेला असून येथील जमिनीला सोन्याचा भाव आलेला आहे. शहर वसविण्यासाठी प्रारंभीच्या काळात सिडकोने कमी घरांची निर्मिती केली असली तरी मागील तीन-चार वर्षांत गृहनिर्मितीचा उच्चांक गाठण्याचे लक्ष्य ठेवले आहे. मुंबईतील अनेक प्रकल्पांची उभारणी नवी मुंबईत करण्यात आली आहे. मात्र मुंबईतील झोपडपट्टी या ठिकाणी वाढणार नाही याची काळजी सिडकोने घेतली. मात्र एमआयडीसीला हे तारतम्य राखता न आल्याने पूर्व बाजूस झोपडपट्टी वसाहत वाढलेली आहे. प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न हाताळताना सिडकोची मात्र दमछाक झाली असून प्रकल्पग्रस्तांनी गरजेपोटी बांधलेली घरे कायम करण्याचा शासनाने निर्णय घेतल्याने सिडकोच्या हातातून कोट्यवधी किंमतीची जमीन तर गेलीच, याशिवाय शहरांचा अस्ताव्यस्त विकास झालेला आहे. नियोजित मेट्रो, आंतरराष्ट्रीय गोल्फ, महागृहनिर्मिती, प्रदर्शन केंद्र, खारघर हिल प्लॅटू, सागरी किनारा मार्ग यांसारख्या प्रकल्पांमुळे सिडकोच्या स्थापनेवर राज्यातील जनतेला अभिमान वाटणार आहे. एका महामंडळात सहा ते सात सनदी अधिकारी कारभार पाहणारे हे पहिले महामंडळ असून भविष्यात सिडकोवर शासन अनेक शहरांच्या विकासाची जबाबदारी सोपविण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मुंबईला पर्यायी शहर म्हणून नवी मुंबई स्थापनेचा उद्देश जवळपास पूर्ण झालेला आहे. त्यामुळे नवी मुंबईपेक्षा राज्यात अनेक नवी मुंबई निर्माण करण्याची क्षमता सिडकोकडे असल्याचे यापूर्वीदेखील सिद्ध झाले आहे. राज्य सरकारने ही संधी देण्याची आवश्यकता असल्याचे अनेक नियोजनकारांचे मत आहे.

सिडकोने यापूर्वी राज्यात व राज्याबाहेर विकास आराखडा तयार करण्याची कामे केलेली आहेत. त्यामुळे सिडकोने केवळ नवी मुंबई, पनवेल, उरण पुरतं मर्यादित न राहता राज्यातील शासकीय जमिनीवर ही विकासाची गंगा नेणे गरजेचे आहे. यामुळे शहरावर आदळणारे लोकसंख्येचे लोंढे कमी होतील. खेड्याकडे चला हा संदेश सार्थ होईल. पालघर हे एक उदाहरण आहे. -लीलाधर परब,  वास्तुविशारद, वाशी