लागण दर १५ वरून ५ टक्क्यांवर

नवी मुंबई : कडक संचारबंदीनंतर नवी मुंबईतील करोना रुग्णवाढ घटली असून दैनंदिन १४४१ पर्यंत गेलेली बाधितांची संख्या आता शंभर ते दोनशेच्या घरात आली आहे. त्यामुळे १५ टक्क्यांवर पोहोचलेला करोना लागण दर आता ५ टक्क्यांपर्यंत खाली आला आहे, हे शहरासाठी दिलासादायक चित्र आहे.

नवी मुंबई शहरात गेल्या वर्षी ३ मार्च २०२० रोजी करोनाचा पहिला रुग्ण सापडला होता. वर्षभरात रुग्णसंख्या ९५४५५ पर्यंत गेली असून १४६५ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे.

करोनाच्या दुसऱ्या लाटेत १५ फेब्रुवारीपासून शहरात पुन्हा रुग्णवाढ सुरू झाली. तीन महिन्यांत या वाढत्या करोना रुग्णसंख्येमुळे आतापर्यंतच्या करोनाकाळातील सर्व उच्चांक मोडीत काढले.  शहरातील एका दिवसातील नव्या करोना रुग्णांची सर्वोच्च संख्या गेल्या वर्षी २० ऑगस्टला ४७७ होती, तर या वर्षी एप्रिलमध्ये ही संख्या १४४१ वर पोहोचली होती. त्यामुळे आरोग्य व्यवस्था अपुरी पडत होती. खाटांचा तुटवडा, प्राणवायूचा तुटवडा निर्माण झाला होता. तीन टक्क्यांवर असलेला करोना लागण दर १५ टक्क्यांपर्यंत पोहोचला होता. हे शहरासाठी मोठे संकट होते.

त्यानंतर शासनाने कडक संचारबंदी लागू केल्यानंतर संसर्ग हळूहळू कमी होत गेला आहे. १४४१ पर्यंत गेलेली दैनंदिन रुग्णसंख्या आता शंभर ते दोनशेच्या घरात आली आहे. त्यामुळे १५ टक्क्यांवर गेलेला करोना लागण दर आता ५ टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. हे शहरासाठी दिलासादायक आहे. पहिल्या लाटेत करोना लागण दर हा ३ टक्क्यांपर्यंत खाली आल्यानंतर परिस्थिती हाताबाहेर गेली होती.

शहरातील करोना लागन दर १५ टक्क्यांपर्यंत गेला होता; परंतु आता परिस्थिती नियंत्रणात असून लागन दर ५ टक्क्यांवर आला आहे. सातत्याने दैनंदिन रुग्णवाढ कमी झाली तर लवकरच मोठा दिलासा मिळेल; परंतु नागरिकांनी अधिक सहकार्य करून नियमावली पाळण्याची आवश्यकता आहे.

अभिजीत बांगर, आयुक्त, महापालिका