लोकसत्ता प्रतिनिधी

नवी मुंबई :  तीन महिन्यांपूर्वी १९.२३ वर असलेला करोनाबाधित होण्याचा दर आता १२.४९ वर आला आहे. सात टक्के बाधितांच्या संख्येत झालेली ही घट नवी मुंबईसाठी दिलासादायक आहे. त्यात वाढत असलेली करोनाबाधितांची संख्याही आता कमी होऊ लागली आहे.

दिवाळीनंतर नवी मुंबईत बाधितांच्या संख्येत वाढ झाली आहे. शंभरच्या घरात आलेली रुग्णसंख्या दोनशेच्या घरात गेली होती. मात्र या काळात शहरात करोना चाचण्यांतही वाढ करण्यात आली होती. दिवाळीपूर्वी ३ हजार २०० करोना चाचण्या दिवसाला करण्यात येत होत्या. त्यातून सरासरी १२८ रुग्ण सापडत होते. दिवाळीनंतर दिवसाला चार हजार चाचण्या होत असून सरासरी रुग्णसंख्या ही १५० इतकी आहे.

नवी मुंबई शहरात करोनाबाधितांची संख्या ४८ हजार ३६६  झाली आहे तर आतापर्यंत ९८६ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. नवी मुंबईत उपचाराधीन रुग्णांची संख्या नवी मुंबईत ३५००च्यावर पोहचली होती. दिवाळीत ही संख्या १२०० च्या जवळपास होती त्यात वाढ होत आता १५०० इतके रुग्ण उपचार घेत आहेत. दिवाळीच्या खरेदीसाठी, बाहेरगावी फिरण्यासाठी गेलेल्यांची संख्या अधिक होती. त्यामुळे बाधितांची संख्या वाढली. नियंत्रणात आलेली परिस्थिती बिघडत असल्याने पालिका प्रशासनाने दिवाळीनंतर दरदिवशी चार हजार करोना चाचण्या करण्यात येत होत्या. यातून सरासरी पहिल्या पंधरा दिवसांत १२८ रुग्ण सापडत होते. दिवाळीपूर्वीच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत वाढ झाली असली तरी दिवाळीपूर्वी फक्त ३ हजार २०० इतक्याच चाचण्या करण्यात येत होत्या. चाचण्या वाढविण्यात आल्याने रुग्णसंख्येतही वाढ झालेली दिसत आहे.

२० नोव्हेंबरला ५ हजार ६१ तर २४ नोव्हेंबरला ५ हजार ८४ इतक्या सर्वाधिक करोना चाचण्या करण्यात आल्या होत्या. तर सरासरी गेल्या पंधरा दिवसात चार हजार करोना चाचण्या करण्यात आल्या. त्यामुळे करोनाबाधितांची संख्येत वाढ दिसत आहे.

दिवाळीनंतरचे भीतीदायक वातावरण आता हळूहळू निवळेल अशी आशा पालिका प्रशासन व्यक्त करीत आहे. नवी मुंबईत करोनाच्या उपचाराधीन रुग्णांची संख्या १५००च्या जवळपास आहे. दिवाळीनंतर सोमवारी प्रथमच नवे रुग्ण १०० तर मंगळवारी ११५ इतके होते. दिवाळीनंतरचा महत्त्वाचा १५ दिवसांचा कालावधी संपला असून आता यापुढील पंधरा दिवसांत नव्या रुग्णांची स्थिती काय असेल यावर शहरातील करोनाबाबतची परिस्थिती अवलंबून असणार आहे. त्यावर आरोग्य उपाययोजनांचे नियोजन अवलंबून असून बंद करण्यात आलेली करोना काळजी केंद्र सुरू करण्याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे.

शहरात जास्तीत जास्त नागरिकांच्या चाचण्या करून करोनावर मात करण्यासाठी पालिका प्रयत्नशील आहे. शहरात दिवाळीनंतर नव्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाली होती. परंतु करोनाबाधित होण्याचा दर सातत्याने खाली आला आहे. सप्टेंबरमध्ये असलेल्या दरापेक्षा ३० नोव्हेंबरचा दर हा ७ टक्क्यांनी कमी आला आहे. त्यामुळे पालिका करोनावर मात करण्यासाठी प्रयत्न करत असून त्याला नागरिकांचे सहकार्य हवे. नवी मुंबईकर नागरिकांची करोना नियमावली पाळण्यासाठी अधिक साथ हवी आहे.

– अभिजीत बांगर, आयुक्त, महापालिका