लोकसत्ता वार्ताहर

नवी मुंबई : रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची संख्या वाढल्याने नवी मुंबई महापालिका प्रशासनाने बेलापूर, नेरुळ व वाशी स्थानकांवर करोना चाचणीची व्यवस्था करून दिली आहे. मात्र प्रवासी चाचणी करून घेण्यास टाळाटाळ करत आहेत. आरोग्य पथकांना विनवणी करावी लागत आहे.

दिवाळीनंतर नवी मुंबईत करोना रुग्णांची संख्या वाढत आहे. दिवाळीपूर्वी शंभरच्या खाली आलेली रुग्णसंख्या आता दोनशेच्या घरात गेली आहे. त्यामुळे पालिका प्रशासनाने गर्दीच्या ठिकाणांवर लक्ष केंद्रित करीत करोना चाचण्या वाढविण्यावर भर दिला आहे. सोमवारपासून वाशी, नेरुळ व बेलापूर स्थानकांवर प्रवाशांची करोना चाचणी केंद्रे उभारली आहेत. सोमवारी पहिल्या दिवशी साडेतीनशे प्रवाशांच्या चाचण्या करण्यात आल्या होत्या. मात्र प्रवासी चाचणी करण्यास उत्सुक नसल्याचे गेल्या दोन दिवसांपासून दिसत आहे. आरोग्य पथके प्रवाशांना आग्रह करीत आहेत, मात्र कारणे सांगत प्रवासी निघून जात असल्याचे येथील आरोग्य पथकांचे म्हणणे आहे.

रेल्वे स्थानकात सकाळी ८ ते १ या वेळेत पालिका विनामूल्य चाचणी करीत आहे. मात्र प्रवाशांना करोनाचे गांभीर्य राहिल्याचे दिसत नाही. आमच्याकडे वेळ नाही, आता घाईत आहोत, याआधी चाचणी केली आहे, आमच्या विभागात चाचणी करू.. अशी अनेक कारणे देत प्रवासी निघून जात आहेत. पोलीसांच्या मदतीने मुखपट्टी नसलेल्या प्रवाशांची चाचणी केली जात आहे.

प्रवाशांना करोनाचे गांभीर्य राहिले नाही. विनामूल्य चाचणी असूनही प्रवासी स्वत:हून पुढाकार घेत नाहीत. आम्हाला विनवणी करावी लागते. त्यानंतरही कारणे सांगून ते निघून जात आहेत. मुखपट्टी घातली नसल्याने चाचणी केल्यानंतरच प्रवाशांना प्रवेश दिला जात आहे.
– डॉ. सरिता सरवदे, आरोग्य अधिकारी, वाशी रेल्वे स्थानक पथक