सहकार्यासाठी पालिकांना पत्र; सक्षम सेवा देण्याचा विचार

‘एनएमएमटी’ची आर्थिक कोंडी

संतोष जाधव, नवी मुंबई</strong>

‘एनएमएमटी’ उपक्रमाला उभारी देण्यासाठी प्रशासनाने आता महामुंबई क्षेत्रावर लक्ष देण्याचे ठरविले आहे. पुणे-पिंपरी चिंचवड महापालिकेच्या बससेवेचा दाखला देत त्या धर्तीवर शेजारील पनवेल महापालिका व उरण नगर परिषदेने योग्य ते सहकार्य केल्यास नवी मुंबई परिवहन उपक्रमाचा तोटा भरून निघू शकतो, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

नवी मुंबई परिवहन उपक्रमाची बससेवा महापालिकेच्या अनुदानावर सुरू असतानाच  ‘बेस्ट’ने ९ जुलैपासून त्यांचे तिकीट दर कमी केले. या निर्णयाचा नवी मुंबई महापालिकेच्या ‘एनएमएमटी’ बस सेवेवर परिणाम झाला असून  दिवसाला २० ते २५ हजार प्रवासी कमी झाले आहेत. महिनाभरात सुमारे १ ते दीड कोटींचा आर्थिक फटका बसत आहे. यातून सावरायचे कसे, या प्रश्नामुळे ‘एनएमएमटी’ प्रशासनासमोर पेच निर्माण झाला आहे.

त्यामुळे प्रशासनाने महामुंबई क्षेत्रावर लक्ष केंद्रित करण्याचे ठरविले आहे. सद्य:स्थितीतही ‘एनएमएमटी’ची बससेवा पनवेल, उलवे, उरणपासून करंजाडेपर्यंत सुरू आहे. या परिसरातील विद्यार्थी, जेष्ठ नागरिक यांना देण्यात येणाऱ्या तिकीट सवलतीच्या बदल्यात ‘एनएमएमटी’ला महिन्याला सुमारे एक कोटी तोटा सहन करावा लागत होता. त्यामुळे ही सवलत बंद करण्यात आली आहे. पनवेल व उरण पालिकेने तो तोटा भरून द्यावा अशी माफक अपेक्षा ‘एनएमएमटी’ प्रशासनाची आहे.

पुणे परिवहन उपक्रमाची बससेवा पुणे शहरासह पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत सेवा देते. पिंपरी-चिंचवड महापालिकेने स्वत:ची बससेवा सुरू न करता ते पुणे परिवहन उपक्रमाला ४० टक्के अनुदान देतात. या धर्तीवर शेजारील पनवेल महापलिका, उरण नगर परिषद व सिडकोने आर्थिक मदतीचा हात पुढे केल्यास एनएमएमटी उपक्रमाला उभारी मिळू शकते.

तिकीट सवलतीची रक्कम देऊन ‘एनएमएमटी’ला सहकार्य करावे. तसे झाल्यास आपल्याला या ठिकाणी अधिकचे लक्ष घालून सक्षम सेवा देता येईल, असे  ‘एनएमएमटी’चे मुख्य लेखा व वित्त अधिकारी नीलेश नलावडे यांनी पनवेल महापालिका, उरण परिषद यांना याबाबत पत्रव्यवहार केला आहे.

 

स्वतंत्र बससेवेऐवजी ‘एनएमएमटी’ला हात द्या!

पनवेल पालिका नव्याने परिवहन उपक्रम कार्यान्वित करण्याचा प्रस्ताव तयार करीत आहे. सध्या पनवेल पालिका क्षेत्रात एकूण ‘एनएमएमटी’ ६० बसची सेवा देत आहेत. येथील आसूडगाव बस आगार हा ‘एनएमएमटी’च्या ताब्यात असून १२५ बसचे कार्य संचलन केले जात आहे. राज्यातील सर्व परिवहन उपक्रम तोटय़ात जात असताना नवीन उपक्रम सुरू करून आर्थिक घाईत जाण्यापेक्षा नवी मुंबई पालिकेच्या उपक्रमाचा तोटा भरून देऊन येथील बस सेवेचा भार देण्याबाबत विचार करण्यात यावा असा प्रस्ताव ‘एनएमएमटी’ चा आहे.

 

५ सप्टेंबर रोजी होणाऱ्या पनवेल महापालिकेच्या सभेत तिकीट सवलतीबाबत प्रस्ताव मांडला जाणार आहे. त्यानंतर पनवेलचे लोकप्रतिनिधी, नवी मुंबईचे महापौर व आयुक्तांबरोबर बैठक घेतली जाईल. यातून तोडगा न निघल्यास विधानसभा निवडणुकीनंतर स्वतंत्र परिवहन उपक्रमाबाबतचा निर्णय घेतला जाईल.

-गणेश देशमुख, आयुक्त पनवेल महानगरपालिका

 

उरण नगर परिषदेकडून आर्थिक मदतीबाबत सहकार्य अशक्य आहे. ते उरणपर्यंतची सेवा देत

आहेत. ‘एनएमएमटी’ला त्यांच्या गाडय़ा उभ्या करण्यासाठी एमआयडीसी कार्यालयाजवळ सिडकोचा भूखंड दिला आहे.

-अवधूत तावडे, मुख्य कार्यकारी अधिकारी, उरण नगर परिषद