१८ वर्षांवरील लसीकरणासाठी एकच केंद्र सुरू

नवी मुंबई : लसपुरवठा न झाल्याने शहरात सलग चार दिवस पहिली मात्रा घेणाऱ्यांचे लसीकरण बंद आहे. त्यामुळे नागरिकांकडून संताप व्यक्त होत आहे. दरम्यान १८ वर्षांवरील लसीकरण नेरूळ येथील पालिका रुग्णालयात करण्यात येत असून  १ मेपासून फक्त ९१९ जणांना पहिली मात्रा देण्यात आली आहे.

ठाणे जिल्ह्यात नवी मुंबई लसीकरणात आघाडीवर आहे. आतापर्यंत  २ लाख ३० हजार नागरिकांचे लसीकरण झाले आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून लसपुरवठा होत नसल्याने वारंवार लसीकरण मोहीम बंद पडत आहे. शहरात खासगी व पालिका अशी ४९ केंद्रे सुरू करण्यात आली होती. आता पालिकेच्या २८ केंद्रांवर लसीकरण केले जात होते. परंतु लस उपलब्धतेअभावी लसीकरण नियोजन बिघडले आहे. त्यामुळे व्यवस्था आहे, पण लस नाही अशी स्थिती आहे. सलग चार दिवस शहरात दुसरी मात्रा दिली जात नाही. फक्त पालिकेच्या वाशी, नेरूळ, ऐरोली येथील रुग्णालयात कोव्हॅक्सिनचा दुसरा डोस दिला जात आहे. मंगळवारी फक्त वाशी येथील रुग्णालयातच दुसरा डोस दिला जाणार असून इतर सर्व लसीकरण केंद्र बंद राहणार आहेत.

ठाणे जिल्ह्यातील ५ केंद्रांपैकी नवी मुंबईत फक्त एकमेव नेरूळ येथील माँसाहेब मीनाताई ठाकरे रुग्णालयाचा समावेश असून केंद्र सरकारच्या कोविन पोर्टलवर रीतसर नोंदणी केल्यानंतर व त्यावर केंद्र निवडून वेळ आरक्षित केल्यानंतरच लसीकरण केले जात आहे.

१ मेपासून हे लसीकरण सुरू असून आतापर्यंत फक्त ९१९ जणांनी याचा लाभ घेतला आहे. १ मे रोजी १८३, २ मे रोजी ३७०, ३ मे रोजी ३६६ जणांचे लसीकरण करण्यात आले.

लसीकरण मोहिमेला अर्धविराम?

गेल्या तीन ते चार दिवसांपासून जिल्ह्याला करोना प्रतिबंधात्मक लशींचा साठा उपलब्ध होत नसल्यामुळे जिल्ह्यात वेगाने सुरू असलेल्या लसीकरण मोहिमेला अर्धविराम लागल्याची चिन्हे आहेत. ठाणे, डोंबिवली, कल्याण, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर, भिवंडी, नवी मुंबई, मीरा-भाईंदर आणि ठाणे ग्रामीण या भागात शासकीय आणि खासगी असे एकूण २३२ लसीकरण केंदे्र आहेत. प्रत्येक लसीकरण केंद्रावर दररोज १०० नागरिकांचे लसीकरण करण्याचे शासनाचे लक्ष आहे. मात्र जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून लशींचा तुटवडा भासू लागल्यामुळे अनेक लसीकरण केंदे्र बंद ठेवावी लागत आहेत.  या संदर्भात ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर आणि जिल्हा आरोग्य विभागाच्या उपसंचालक डॉ. गौरी राठोड यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

पनवेलमध्ये १८ वर्षांवरील लसीकरण तीन केंद्रांवर

पनवेल : १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणासाठी पनवेलमध्ये तीन लसीकरण केंद्रे सुरू केली आहेत. मात्र या केंद्रांवर फक्त नोंदणी झालेले नागरिकही येत आहेत. त्यामुळे गर्दी होत आहे. त्यामुळे नोंदणीनंतर लसीकरणचा दिवस व वेळ मिळाल्यानंतरच लसीकरण केंद्रावर यावे असे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे.  तर लस नसल्याने ४५ वर्षांपुढील नागरिकांचे लसीकरणही ठप्प आहे.