महासभेत नगरसेवकांचा गोंधळ; अपशब्द वापरल्याने आयुक्त महासभेतूनच बाहेर

नवी मुंबई पालिका आयुक्तांबद्दल सत्ताधारी नगरसेवकांत असलेला रोष बुधवारी थेट महासभेत चव्हाटय़ावर आला. आपल्या प्रभागातील कामे होत नसल्याचा आरोप करीत नगरसेवकांनी सभा सुरू होताच गोंधळ घातला. कामांचे निवेदन देताना सभागृह नेते रवींद्र इथापे यांनी आयुक्तांना अपशब्द वापरले. यावर आयुक्तांनी आक्षेप घेतल्यानंतरही ते प्रतिउत्तर देत राहिल्याने अखेर सभागृहातूनच कामकाज सोडून निघून गेले. महापौरांनी मनधरणी केल्यानंतर ते परतले.

या घटनेमुळे तुकाराम मुंढेनंतर पालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन विरूद्ध सत्ताधारी असा दुसरा अध्याय सुरू झाला आहे.

शहरातील प्रत्येक कामाची जातीने पाहणी केल्याशिवाय त्याला मंजुरी किंवा बिले न देण्याचा निर्णय आयुक्तांनी घेतला आहे. त्यामुळे अनेक नगरसेवकांची ‘रोजीरोटी’ बंद झाली आहे. न्यूनतम दरात काम करावे लागत असल्याने पालिकेच्या कामांना कंत्राटदार हात लावत नाही. त्यामुळे अनेक कामांची फेरनिविदा काढावी लागत आहे. त्यात आता पुढील महिन्यात लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होणार असल्याने कामे होत नसल्याची ओरडा नगरसेवकांकडून सुरू आहे. याशिवाय काही निर्णयांमुळे सत्ताधारी व आयुक्त यांच्यातील दरी वाढत आहे. आयुक्तांच्या बदलीसाठी प्रयत्न सुरू आहेत. याचा रोष बुधवारी थेट महासभेतच बाहेर आला.

११ वाजता सुरू होणारी सभा ३ वाजता सुरू होताच सत्ताधारी पक्षातील नगरसेविकांनी विषयपत्रिका बाजूला ठेवून आम्हाला बोलू द्या, असा पवित्रा घेतला. त्यानंतर महापौरांनी ऐकाकाला बोलण्याची विनंती केली. यानंतर नगरसेवक सुरेश कुलकर्णी यांनी प्रभागातील

पाण्याची समस्या मांडत, प्रभागातील कामे होत नसतील तर इथे बसण्याचा काय फायदा? असा सवाल करीत सभा चालवू देणार नसल्याचा

इशारा दिला. नगरसेविका कविता आगोंडे यांनी प्रभागातील रस्त्याची कामे होत नसल्याचा आरोप करीत सभागृहात ठिय्या मारण्याचा इशारा दिला.

त्यांनतर सभागृह नेते रवींद्र इथापे यांनी नेरुळ प्रभागातील कामे दोन वर्षांपासून होत नाहीत असा प्रशासनावर थेट आरोप करीत धारेवर धरले. यावेळी आयुक्तांनी या प्रभागात २०१५ पासून १४ कामे केल्याचे स्पष्टीकरण देत असताना, इथापे त्यांना प्रतिउत्तर देत राहिले. लखवा मारू नका, स्वत:ची पाठ थोपवून घेऊ  नये, असे आरोप केले. यानंतर अपशब्द वापरून आयुक्तांना व्यक्तिगत पातळीवर बोलण्यास सुरुवात केली. यावेळी संतापलेल्या आयुक्तांनी व्यक्तिगत टीका करण्याचे अधिकार कोणालाही नाहीत, असे सांगत सभागृहातून निघून गेले. यानंतर महापौरांनी नगरसेवकांना खडसावत उपमहापौरांना कार्यभार देत आयुक्तांच्या दालनात गेले. अर्धा तास आयुक्तांची मनधरणी केल्यानंतर पाऊण तासांने आयुक्त सभागृहात दाखल झाले.

सदस्यांना महासभेचे गांभीर्य नाही

११ वाजता सुरू होणारी महासभा १२.३० वाजता सुरू झाली. त्यानंतर पुलवामा येथील शहीद जवानांना श्रद्धांजली वाहण्यासाठी सभा तहकूब करण्यात आली. २ वाजता सुरू होणारी सभा ३ वाजता सूरू झाली. पुढील महिन्यात आचारसंहिता लागू होणार असल्याने ही महासभा विकास कामे मार्गी लाग्ण्यासाठी महत्त्वाच्या असताना देखील तास न् तास वाया घालविण्यात आले.