करोनाची लागण झालेल्यांची संख्या झपाट्याने वाढत असताना राज्यात लसीचा तुटवडा निर्माण झाला आहे. लसीचा तुटवडा जाणवत असल्याने पनवेलमध्ये तर लसीकरण पूर्णतः ठप्प झालं आहे. पुढील लस उपलब्ध होईपर्यंत सर्व शासकीय आणि खाजगी लसीकरण केंद्रामध्ये लसीकरण बंद करण्याचा निर्णय पनवेल महानगरपालिकेने घेतला आहे.

पनवेल महानगरपालिका क्षेत्रात सध्या कोव्हीड-19 लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरु आहे. मात्र, लसींचा तुटवडा असल्याकारणाने पुढील लस उपलब्ध होईपर्यंत सर्व शासकीय आणि खाजगी लसीकरण केंद्रामध्ये लसीकरण कार्यक्रम बंद राहणार आहे, अशी माहिती पनवेल महानगरपालिकेकडून देण्यात आली. लसतुटवड्यामुळे पनवेलसोबतच सांगली, साताऱ्यातही लसीकरण ठप्प झाले आहे.

यापूर्वी, सद्य:स्थितीत राज्यात फक्त १४ लाख लसमात्रा शिल्लक असून, हा साठा के वळ तीन दिवस पुरेल. वेळेत लसीचा पुरवठा झाला नाही तर लसीकरण बंद पडेल. त्यामुळे लशीचा पुरवठा करा, अशी मागणी वारंवार केंद्र सरकारकडे करण्यात येत असल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली. जागतिक आरोग्य दिनाच्या पार्श्वभूमीवर माध्यमांशी संवाद साधताना टोपे यांनी राज्यातील करोना लसीच्या टंचाईबाबत गंभीर चिंता व्यक्त केली. राज्यात करोना संसर्गाचा उद्रेक होत असून, सद्य:स्थितीत ४ लाख ७० हजारपेक्षा जास्त उपचाराधीन रुग्ण आहेत. पण लस नसल्याने म्हणून काही लसीकरण केंद्र बंद ठेवावी लागत आहेत. अनेक केंद्रावरून लस नाही म्हणून लोक परत जात आहेत. राज्याला दर आठवड्याला ४० लाख लसीची गरज आहे. पण, तेवढा पुरवठा होत नसल्याने लोकांना लसीकरण केंद्रातून परतावे लागत आहे. त्यामुळे इतर राज्यात नंतर करा, पण महाराष्ट्रात करोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. त्यामुळे इथे आधी लस द्या, अशी मागणी केंद्राकडे करण्यात आल्याचे टोपे यांनी सांगितले.