हत्येचा प्रयत्न, बलात्कार प्रकरणी वाशी रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हा

नवी मुंबई वाशी खाडीपुलावर रेल्वेरुळालगत मंगळवारी गंभीर जखमी अवस्थेत एक तरुणी सापडली असून तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याची शक्यता डॉक्टरांनी वर्तवली आहे. त्यानुसार वाशी रेल्वे पोलिसांनी हत्येचा प्रयत्न व बलात्कारप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा नोंद केला आहे.

गेली तीन दिवसांपासून ती बोलण्याच्या मन:स्थितीत नसल्याने नेमका प्रकार समोर आला नाही, मात्र पोलिसांनी केलेल्या तपासात ती युवती कोणत्याही रेल्वे स्थानकावर सीसीटीव्हीत आढळून न आल्याने  रेल्वे प्रवासात तिला ढकलल्याची शक्यता कमी असल्याचेही पोलिसांनी सांगितले आहे.

वाशी खाडीपुलावर एक महिला असल्याची माहिती मिळाल्यावर वाशी रेल्वे पोलीस ठाण्यातील साहाय्यक पोलीस निरीक्षक भाऊसाहेब शिंदे यांनी मंगळवारी घटनास्थळी जात तिला ताब्यात घेतले. ती युवती वाशी अप मार्गावरील रुळालगत २६/२ या ठिकाणी गंभीर जखमी अवस्थेत आढळून आली. तिला तत्काळ वाशीच्या पालिका रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिच्या अंगावर असलेल्या जखमा या केवळ पडल्याने झालेल्या नसून कोणाशी तरी जोरदार झटापट झाल्याचा प्राथमिक अंदाज डॉक्टरांनी वर्तवला आहे. तपासणीत तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचेही नमूद केले आहे. तिला पुढील उपचारासाठी मुंबईतील जे.जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सद्य:स्थितीत ती खूप घाबरलेली असून बोलण्याच्या मन:स्थितीत नाही. तिच्या जबाबानंतरच तपासाला वेग दिला जाईल. ओळख पटली असून तिची प्रकृती सध्या स्थिर आहे, अशी माहिती वाशी रेल्वे पोलिसांनी दिली.

पोलीस उपायुक्त यांच्यासमवेत घटनास्थळाची पाहणी करण्यात आली आहे. पीडित युवती बोलण्याच्या मन:स्थितीत नसल्याने अन्य मार्गाने तपासकार्य सुरू आहे. प्राथमिक तपासात ती कुठल्याही रेल्वे स्थानकात वा लोकलमध्ये चढताना सीसीटीव्हीत आढळून आलेली नाही. त्यामुळे तिला लोकलमधून ढकलून ठार करण्याचा प्रयत्न केली की अत्याचार करून या ठिकाणी जखमी अस्वस्थेत आणून टाकण्यात आले हे आता सांगता येणार नाही. सर्व बाजूंनी तपास सुरू आहे.

– विष्णू केसरकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वाशी रेल्वे पोलीस