पारदर्शी कारभारासाठी १ ऑगस्टपासून धनादेश, डिमांड ड्राफ्ट स्वीकारणे बंद

नवी मुंबई सिडकोची बिघडणारी प्रतिमा पूर्वपदावर आणण्यासाठी सिडकोतील सर्व आर्थिक व्यवहार यापुढे केवळ ऑनलाइन पद्धतीनेच करण्याचे आदेश व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी दिले आहेत. त्यामुळे एक ऑगस्टपासून सिडकोतील कोणतेही शुल्क, घरांचे पैसे, निविदा प्रक्रियेतील अनामत रक्कम फक्त आरटीजीएस, एनईएफटीद्वारेच स्वीकारण्यात येणार आहे. यापूर्वी सिडकोत घरासाठी भरावे लागणारी रक्कम अथवा अनामत रकमा धनादेश किंवा दर्शनी धनाकर्षांद्वारे (डीडी) स्वीकारल्या जात होत्या. प्रकल्पग्रस्तांची नवीन पिढीही आधुनिक झाली आहे, त्यामुळे त्यांच्यासमोरदेखील सिडकोची दयके भरताना अडचण येणार नाही, असा विश्वास सिडकोला आहे. सिडकोचा तक्रार निवारण कक्ष गुंडाळण्यात येणार आहेत.

मोठमोठय़ा आर्थिक गैरव्यवहारांमुळे सिडकोची प्रतिमा पुन्हा डागळू लागली आहे. काही दिवसांपूर्वी खारघर येथील २४ एकर जमिनीचा घोटाळा नागपूर अधिवेशनात गाजला. अशा प्रकारचे अनेक व्यवहार सिडकोत झाले आहेत. सिडकोची बिघडलेली प्रतिमा सुधारण्याचा प्रयत्न माजी व्यवस्थापकीय संचालक संजय भाटिया यांनी केला होता. त्यासाठी अतिरिक्त पोलीस महासंचालक दर्जाचे अधिकार शासनाकडून मागून घेतले होते. दिल्लीहून नव्याने आलेले व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी मध्यंतरी सर्व विभागांना अचानक भेटी देऊन त्यांची पाहणी केली. ज्या ठिकाणी आपण जास्त काळ राहतो त्या जागा स्वच्छ आणि सुंदर ठेवाव्यात असा सल्लाही त्यांनी दिला.

१ ऑगस्टनंतर सिडकोची सर्व प्रकारची शुल्क केवळ ऑनलाइनच स्वीकारली जाणार आहेत. यात स्वप्नपूर्ती, व्हॅलीशिल्प सारख्या घरांच्या थकलेल्या हप्त्यांचाही समावेश आहे. सिडको लवकरच शिल्लक अडीच हजार घरांची नवीन लॉटरी काढणार आहे. तेही ऑनलाइन अदा करावे लागणार आहेत. सिडको दक्षिण नवी मुंबईत काही इमारतींना बांधकाम परवानगी देत आहे. त्याचप्रमाणे कोटय़वधी रुपये किमतीच्या नागरी कामांच्या निविदा व भूखंड विक्री होत असून ही रक्कमही ऑनलाइन भरण्याची सूचना देण्यात आली आहे. त्यामुळे सिडकोत यापुढे एक रुपयादेखील रोख स्वरूपात अथवा डीडी, धनादेशाद्वारे स्वीकारला जाणार नाही. सिडकोचा आर्थिक व्यवहार अतिशय पारदर्शी व्हावा यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. रोख रक्कम व डीडीमुळे सिडकोत दलालांची ये-जा मोठय़ा प्रमाणात सुरू असते, त्यालाही या निर्णयामुळे आळा बसणार आहे.

सिडकोच्या कामकाजाचा अभ्यास केल्यानंतर कर्मचारी अधिकाऱ्यांव्यतिरिक्त काही चेहरे सातत्याने दिसू लागले आहेत. सिडकोत दलालराज असल्याचे स्पष्ट आहे. मानवी हस्तक्षेप कमीत कमी व्हावा यासाठी सिडकोचा सर्व आर्थिक कारभार ऑनलाइन करण्यात येणार आहे. याला सर्वानीच सहकार्य करावे

– लोकेश चंद्र, व्यवस्थापकीय संचालक, सिडको