नवी मुंबई – महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनंतर व वनमंत्री गणेश नाईक यांनी महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांना केलेल्या दूरध्वनीनंतरही ठेकेदाराने मनमानी करत लोटस तलावात गेल्या बुधवारी १०० ट्रक भराव टाकण्याचे काम केले होते.त्यामुळे सिडकोच्या पर्यावरण नष्ट करण्याच्या कृती विरोधात व लोटस तलाव वाचवण्यासाठी सलग दुसऱ्या रविवारी (ता.१५) विविध पर्यावरणप्रेमी सामाजिक संघटना,नागरीक, लोकप्रतिनिधी सकाळी ७ वाजता एकत्र येत लोटस तलाव वाचवण्याचा निश्चय करणार आहेत .

सिडकोचा लोटस तलाव बुजवून पर्यावरणाची हानी करत टोलेजंग इमारती उभारण्याचा डाव हाणून पाडण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे. रविवारी सकाळी ७ वाजता सेव्ह नवी मुंबई एन्हवायरमेंट,मॅंग्रोज सोल्जर,सजग नागरीक मंच, सेव्ह लोटस लेक, सीवूड्स दारावे मित्र मंडळ, यांच्यासह विविध पर्यावरणप्रेमी लोटस तलाव वाचवण्यासाठी व पर्यावरणाचा होणारा ऱ्हास थांबवण्यासाठी सीवूड्स सेक्टर २७ येथील लोटस लेक येथे एकत्र येणार आहेत.

सिडकोने मुजोरी करत पर्यावरणाची हानी करत लोटस तलाव नष्ट करण्याचा घाट घातला असून नवी मुंबईतील विमानतळाच्या कामातील रायगड जिल्ह्यातील भराव नेरुळ सेक्टर २७ येथील लोटस तलावात टाकण्यात आला आहे. पर्यावरणप्रेमी , लोकप्रतिनिधी व पालिकेच्या सहकार्याने सध्या तलावात भर टाकण्याचे काम थांबले असले तरी पर्यावरण प्रेमींनी तलावात टाकलेला भराव काढून घ्यावा याची मागणी केली त्यामुळे तलावातील भराव काढून न घेतल्याने सलग दुसऱ्या रविवारी लोटस तलावाच्या ठिकाणी आंदोलन करण्यात येणार आहे. सध्या तलावातील भराव टाकण्याचे काम थांबवले असले तरी लोटस तलाव बुजवण्याचा सिडकोचा इरादा आहे. लोटस तलाव हा पाणथळ तलाव म्हणून उल्लेखित असतानाही सिडको शहरातील निसर्ग संपवण्याचा प्रयत्न करत आहे असा राग पर्यावरणप्रेमींनी व्यक्त केला.

सिडको सहव्यवस्थापकीय संचालक यांना लोटस तलाव बिल्डरांच्या घशात घालण्याचा डाव असून टीआयपीएल कंपनीने जवळजवळ १०० डंपर भराव तलावात टाकले असून तो भराव सिडकोने परत काढून घ्यावा अशी मागणी केली आहे. लोटस तलाव पाणथळ तलाव असताना सिडकोने मनमानी करत भराव टाकला आहे. त्यामुळे रविवारी (ता .१५) जूनला सकाळी ७ वाजता आंदोलन करण्यात येणार आहे. – सुनील अग्रवाल ,सेव्ह नवी मुंबई एन्व्हायरमेंट.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.