नवी मुंबई : एकाच खोलीमध्ये राहत असलेल्या अन्य एकाचा मोबाइल चोरी करून त्याच्या बँक खात्यातून २९ हजार ९९९ रुपये काढून घेतल्याचा प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी तपासाअंती आरोपीला अटक केली असून त्याने गुन्हा कबूल केला आहे. त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

अमन रामाबिस्वास कुशवाह असे अटक आरोपीचे नाव असून अन्य आरोपी फरार आहे. फिर्यादी आणि आरोपी उरणमध्ये एकाच खोलीत राहत होते. काही दिवसांपूर्वी फिर्यादीचा मोबाइल चोरीला गेला.

 मोबाइल चोरीला गेल्यानंतर काही दिवसांनी त्याच्या बँक खात्यातील तीन वेळा मिळून २९ हजार ९९९ रुपये परस्पर काढण्यात आले. तसा संदेश फिर्यादीला आल्यानंतर त्याने उरण पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. सदर गुन्ह्याचा तपास सायबर शाखेकडे वर्ग करण्यात आला होता.

त्यांनी तांत्रिक तपास केला असता हे पैसे मध्य प्रदेश येथून काढण्यात आल्याचे समोर आले. तपासात फिर्यादीसमवेत राहणारा कुशवाह हा आरोपी निघाला.

आरोपी हा फिर्यादीसमवेत राहत असल्याने गूगल पे व अन्य गोपनीय बाबी ठाऊक होत्या. पकडले जाऊ नये म्हणून त्याने गावाकडील एका मित्राचे साहाय्य घेत ही फसवणूक केली, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुहास चव्हाण यांनी दिली.

मोबाइल चोरटय़ास अटक

नवी मुंबई : मोबाईल चोरी आणि फसवणूकप्रकरणी एका आरोपीला वाशी लोहमार्ग पोलिसांनी जेरबंद केले असून आरोपी हा अभिलेखावरील आहे.  पुढील तपास लोहमार्ग पोलीस करीत आहेत.

३ जानेवारी रोजी घणसोली येथे राहणाऱ्या सविता घालके या घणसोली ते जुईनगर प्रवास करीत असताना जुईनगर येथे आल्यावर त्यांना पर्समधील मोबाईल आढळून आला नाही. मोबाईल चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी वाशी लोहमार्ग पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या गुन्ह्याचा तपास करीत असताना तांत्रिक माहिती आणि गोपनीय माहितीद्वारे सदर चोरी ही सानपाडा येथे राहणाऱ्या चांद शेख याने केल्याचे समोर आले. पोलिसांनी तत्काळ त्याला ताब्यात घेत चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याला न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

चौकशी दरम्यान आरोपीने त्याचा मानखुर्द येथील साथीदार बबलू व त्याने मिळून काही दिवसापूर्वी सानपाडा रेल्वे स्टेशन येथे एका प्रवाशास एक लाख रुपयांच्या चलनी नोटांचे पुडके म्हणून कागदी बंडल देऊन त्यांच्याकडून फसवणूक करून मोबाइल चोरल्याचे  कबूल केले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

चांद शेख हा अभिलेखावरील आरोपी असून २०१८ मध्ये त्याच्या विरोधात दोन चोरीच्या गुन्ह्यांची नोंद आहे, अशी माहिती वाशी लोहमार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक व्ही.डी केसरकर यांनी दिली.