नवी मुंबई : गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी कोकण रेल्वेने सुरू केलेल्या विशेष रो-रो कार सेवेला अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याचे सध्या चित्र आहे. २१ जुलैपासून रो-रो कार सेवेसाठी सुरू केलेल्या आरक्षण प्रक्रियेतून आतापर्यंत केवळ दोन वाहनधारकांनीच जागा निश्चित केली असून, ५० हून अधिकांनी चौकशी केली तरी प्रत्यक्ष आरक्षण टाळले आहे. परिणामी, १३ ऑगस्ट ही पूर्वीची अंतिम तारीख पुढे ढकलून आता १८ ऑगस्टपर्यंत रो-रो कार सेवेसाठी आरक्षण करता येणार असल्याची माहिती कोकण रेल्वेकडून देण्यात आली आहे.
मुंबई-गोवा मार्गावरील खड्डेमय रस्ते आणि रेल्वे गाड्यांची तिकिटे मिळण्यात होणारी अडचण लक्षात घेऊन, कोकणवासीयांना स्वतःच्या वाहनासह सोयीस्कर प्रवासासाठी कोकण रेल्वेकडून विशेष कोलाड–वेर्णा दरम्यान रो-रो कार सेवा सुरू करण्यात आली आहे. मात्र, थेट सेवा असल्याने आणि वेळेचा अपव्यय होत असल्याच्या कारणावरून प्रवाशांचा उत्साह कमी होता. यामुळे प्रवाशांच्या सोयीसाठी कोकण रेल्वेकडून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातील नांदगाव रोड स्थानकात नव्याने थांबा देण्यात आला आहे. याचा रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात जाणाऱ्यांना मोठा लाभ होणार असल्याचे कोकण रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
कोकण रेल्वेने प्रसारित केलेल्या नवी वेळापत्रकानुसार २३ ऑगस्ट पासून सुरू होणाऱ्या या सेवेतील पहिली रो-रो कार सेवा दुपारी ३ वाजता कोलाडवरून सुटून रात्री १० वाजता नांदगाव रोड येथे पोहोचेल व रात्री १२ वाजता नांदगाववरून सुटून दुसऱ्या दिवशी सकाळी ६ वाजता वेर्णा येथे पोहोचेल. परतीच्या प्रवासात, दुपारी ३ वाजता वेर्णा येथून सुटून रात्री ८ वाजता नांदगाव रोड, तर रात्री १०.३० वाजता नांदगाव रोडवरून सुटून दुसऱ्या दिवशी सकाळी ६ वाजता कोलाड येथे पोहोचेल. प्रवाशांनी सुटण्याच्या तीन तास आधी स्थानकात हजर राहणे आवश्यक आहे.
शुल्क
कोलाड–वेर्णा प्रवासासाठी प्रति वाहन ७,८७५ रुपये, तर कोलाड–नांदगाव रोडसाठी ५,४६० रुपये आकारले जातील. बुकिंगवेळी ४,००० रुपये नोंदणी शुल्क भरावे लागेल व उर्वरित रक्कम प्रवासाच्या दिवशी देय असेल. १६ पेक्षा कमी वाहने नोंदवल्यास फेरी रद्द होईल आणि शुल्क परत केले जाईल.
या रो-रो सेवेसोबतच तृतीय व द्वितीय वातानुकूलित डबे जोडण्यात आले आहेत. यातून एका वाहनासोबत जास्तीत जास्त तीन प्रवाशांना प्रवासाची परवानगी असेल. तृतीय एसी डब्यासाठी प्रति प्रवासी ९३५ रुपये, तर द्वितीय एसीसाठी १९० रुपये आकारले जातील.
५० गाड्यांची भर
कोकणातील घाटमाथ्याचा रस्ता आणि त्यातून निर्माण होणारे वाहतुकीतील अडथळे लक्षात घेता. गणेशोत्सव काळात चाकरमान्यांच्या सोयीसाठी यंदा कोकण रेल्वेच्या ५० गाड्यांची भर करण्यात आली आहे. त्यामुळे या काळात तब्बल ३५० गाड्या शिवाय अतिरिक्त रो-रो कार सेवा या कोकण मार्गावर धावतील, अशी माहिती कोकण रेल्वेचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक संतोषकुमार झा यांनी दिली.
रो-रो कार सेवा नवीन असल्याने आणि कोकणात जाणारे प्रवासी साधारणतः शेवटच्या आठवड्यात ही सेवा आरक्षित करतील असा अंदाज असल्याने आगामी आठवड्यात आरक्षण वाढेल, असा विश्वास कोकण रेल्वे प्रशासनाने व्यक्त केला आहे.
“रो-रो कार सेवा हा एक ऐतिहासिक प्रयोग असून, गणेशोत्सवादरम्यान कोकणात जाणाऱ्यांनी या सेवेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे मी त्यांना आवाहन करतो. २३ ऑगस्ट ते ११ सप्टेंबर पर्यंत ही सेवा सुरू राहणार असून, कोकणातील प्रवाशांना जाताना आणि येताना दोन्ही वेळेला ही सेवा उपलब्ध असेल. तसेच यावर्षीच्या प्रतिसादावरून आम्ही पुढच्यावर्षी महाराष्ट्रातील अन्य रेल्वे स्थानकांवरही या रो-रो कार सेवेचा प्रयोग राबवू. त्यामुळे प्रवासी या सेवेचा पुरेपूर लाभ घेतील अशी मला खात्री आहे.” – संतोष कुमार झा, अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक , कोकण रेल्वे.