उरण : चिरनेर परिसरात २० जानेवारीला पसरलेली बर्डफ्लूची साथ आटोक्यात आली असल्याचा दावा जिल्हा पशुधन विभागाने केला आहे. त्याचप्रमाणे बर्डफ्लूला अटकाव करण्यासाठी उपाययोजना सुरू असून येथील पशुधनाची तपासणी सुरू आहे. त्यामुळे नागरिकांनी चिकन आणि अंडी शिजवून खाण्यास कोणतीही हरकत नसल्याचा, त्याचप्रमाणे शेतकऱ्यांना पशुधनाचा मोबदलाही दिल्याचा दावा विभागाने केला आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये असेही आवाहन करण्यात आले आहे.

उरण तालुक्यातील चिरनेरच्या कोंबड्यांमध्ये बर्डफ्लू आढळला होता. त्यानंतर खबरदारी म्हणून प्रशासनाने चिरनेर परिसरातील बाधित क्षेत्रातील सुमारे १ हजार २३७ कोंबड्यांची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावली होती. चिरनेर येथे परिसरातील कुक्कुट पक्षांमध्ये मरतुक आढळल्याने रोग निदानासाठी नमुने भारतीय कृषी संशोधन परिषद अंतर्गत राष्ट्रीय उच्च सुरक्षा पशुरोग प्रयोगशाळा, भोपाळ मध्य प्रदेश येथे रोग निदानास्तव पाठवण्यात आले होते. प्रयोगशाळेतून कुक्कुट पक्षातील मरतुक एव्हियन इन्फ्लुएंझा / बर्डफ्लू या रोगासाठी अहवाल होकारार्थी आला होता. त्यानंतर खबरदारी म्हणून रायगड जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी येथील बाधित क्षेत्रापासून एक किलोमीटरपर्यंतचा परिसर बाधित क्षेत्र व एक ते दहा किलोमीटरपर्यंतचा परिसर सर्वेक्षण क्षेत्र म्हणून घोषित केला होता. पशुसंवर्धन विभागाने तातडीने कार्यवाही केली होती.

चिरनेर परिसरात फैलाव झालेला बर्डफ्लू आटोक्यात आला असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे पशुधन विकास उपायुक्त सचिन देशपांडे यांनी दिली. तसेच नागरिकांनी शिजविलेली अंडी, चिकन खाण्यास हरकत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. त्याचप्रमाणे सध्या येथील वातावरण पक्ष्यांना पुरक असे असून, त्यानंतर कुठल्याही पक्ष्यांमध्ये ही साथ आढळून आलेली नाही, असेही त्यांनी सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

चिरनेरमधील कोंबड्यांमध्ये आढळून आलेला बर्ड फ्लूचा फैलाव कमी झालेला आहे. त्यामुळे चिकन, अंडी खाण्यास काहीही अडचण नाही. फक्त ते चांगल्या प्रकारे शिजवून खाणे शरीरास पोषक आहे, चिकन वा अंड्यांबाबत कुठल्याही प्रकारची अफवा न पसरविता मांसाहार भक्षण करण्यास काहीच हरकत नसल्याचे देशपांडे यांनी स्पष्ट केले आहे. – सचिन देशपांडे, पशुधन विकास उपायुक्त, जिल्हा परिषद