नवी मुंबई : नवी मुंबईतील एपीएमसी परिसरात लावलेले अद्ययावत सीसीटीव्ही कॅमेरे नागरिकांच्या सुरक्षेसाठी उपयुक्त ठरत असले तरी, त्याच वेळी पायाभूत सुविधांकडे झालेल्या दुर्लक्षामुळे लहान वाहनचालकांसाठी हे प्रकल्प त्रासदायक ठरत आहेत. सीसीटीव्हीच्या वायरिंगसाठी मागील वर्षी रस्त्यांमध्ये खोदकाम करण्यात आले होते.

त्यानंतर तात्पुरते काँक्रीटीकरण करण्यात आले असले तरी, पावसाळा सुरू होताच हे थर उखडून रस्त्यावर खड्डे पुन्हा वर आले आहेत. हे खड्डे लहान व्यावसायिक वाहन, टेम्पो आणि दुचाकीस्वारांसाठी धोक्याचे ठरत आहेत. विशेष म्हणजे सिग्नलजवळच्या खड्ड्यांमुळे अपघात होण्याची शक्यता आहे.

माथाडी भवन चौक, जलाराम मार्केट, तुर्भे गाव, सानपाडा आणि कै. रामदास जानू पाटील चौक (क्लॉक टॉवर) या महत्त्वाच्या रस्त्यांवर बसवले गेलेले हे सीसीटीव्ही कॅमेरे अत्याधुनिक पॅन-टिल्ट-झूम तंत्रज्ञानावर आधारित आहेत. हे सर्व थेट पोलीस नियंत्रण कक्षाशी जोडले गेले असल्याने सुरक्षेच्या दृष्टिकोनातून हा उपक्रम स्तुत्य आहे.

एपीएमसी परिसरात मालवाहतुकीसाठी मोठ्या प्रमाणात अवजड वाहने ये-जा करत असतात. अशा वाहनांच्या वारंवार झालेल्या हालचालीमुळे या खड्ड्यांच्या आजूबाजूला आणखी लहानमोठे खड्डे तयार झाले असून, रस्त्यांच्या एकूणच गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.

सुरक्षा वाढली, पण रस्तेच अपघातप्रवण

याबाबत सुरक्षा वाढली, पण रस्तेच अपघातप्रवण झाले, असे ताशेरे वाहनचालकांकडून प्रशासनावर ओढण्यात येत आहेत. नागरिकांनी महानगरपालिकेकडे याबाबत तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी केली असून, लवकरात लवकर खड्डे बुजवून रस्ते पूर्ववत करावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सदर रस्त्यांची पाहणी करण्यात आली असून, साहाय्यक अभियंत्यांना यासंदर्भात सूचना देण्यात आल्या आहेत. पावसामुळे कामात थोडा अडथळा येत असला तरी शक्य तितक्या लवकर सर्व खड्डे बुजवण्यात येतील. – सागर मोरे, विभाग अधिकारी, तुर्भे.