Molestation Case, पनवेल – कामोठे येथील सेक्टर १५ मधील ‘लुक अॅण्ड लाईक युनिसेक्स पार्लर’मध्ये एका महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी पार्लरच्या मालकाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर संतप्त नागरिकांनी आरोपीला बेदम मारहाण केली असून, संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला केशकर्तन व केस रंगविण्यासाठी संबंधित पार्लरमध्ये गेल्या होत्या. त्या वेळी पार्लरचा मालक दानीश शहा (वय २१) याने गळ्यापर्यंत मसाज करण्याच्या बहाण्याने महिलेसोबत गैरवर्तन केले. महिलेने विरोध दर्शवत जाब विचारला असता, आरोपीने उद्धटपणे वर्तन केलं.
संतप्त झालेल्या महिलेनं घटनेची माहिती आपल्या शेजाऱ्यांना व नातेवाईकांना दिली. यानंतर गुरुवारी रात्री संतप्त नागरिकांनी पार्लरवर धडक देत आरोपी दानीशला बेदम चोप दिला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाला असून, परिसरात चर्चेचा विषय ठरला आहे.
घटनेची माहिती मिळताच कामोठे पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पीडितेचा जबाब नोंदविल्यानंतर आरोपी विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विमल बिडवे यांनी घटनेची गंभीर दखल घेतली असून, तपास सुरू असल्याचे सांगीतले आहे. या प्रकारामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पोलिसांनी नागरिकांना कायदा हातात न घेण्याचे आवाहन केले आहे.