पारसिक डोंगरावर खोदकामाची मर्यादा संपुष्टात

नवी मुंबईतील दगडखाणींचा खडखडाट कायमचा बंद होण्याची शक्यता आहे.

ठाणे जिल्हा पर्यावरण परीक्षण समितीचा अहवाल

नवी मुंबईतील पूर्वेकडील डोंगरामध्ये होणाऱ्या दगडखाणींच्या खोदकामाने आता मर्यादा गाठली असून आता यापुढे खोदकाम करता येणार नसल्याचा स्पष्ट अहवाल ठाणे जिल्हा पर्यावरण परीक्षण समितीने हरित लवादाकडे सादर केला आहे. त्यामुळे नवी मुंबईतील दगडखाणींचा खडखडाट कायमचा बंद होण्याची शक्यता आहे. दगडखाणी बंद झाल्यास शेकडो प्रकल्पग्रस्त आणि मजूर बेकार होणार असल्याने त्यांचे पुनर्वसन करण्याची मागणी दगडखाण मालकांनी केली आहे.

दररोज धडधडणाऱ्या नवी मुंबईतील दगडखाणी कायमच्या बंद करण्यासाठी हरित लवादाकडे तक्रार करण्यात आलेली आहे. गेले आठ महिने त्यावर सुनावणी सुरू आहे. नुकत्याच झालेल्या समितीच्या बैठकीत या दगडखाणी बंद करण्यासंदर्भात अनेक कारणे नमूद करण्यात आलेली आहेत. लवादाच्या आदेशानुसार ठाणे जिल्हा पर्यावरण परीक्षण समितीने नुकतीच या दगडखाणींची पाहणी केली असून या दगडखाणीच्या खोदकामांची मर्यादा संपल्याचे आपल्या अहवालात म्हटले आहे. पश्चिम घाटाच्या पर्वतरांगांचा एक भाग असलेल्या पारसिक डोंगराचे क्षेत्र हे विस्तीर्ण आहे. त्यातील नवी मुंबईतील पूर्व भाग शहराच्या विकासासाठी लागणाऱ्या बांधकाम साहित्याच्या निर्मितीसाठी सिडकोने हे दगडखाणी क्षेत्र भाडेपट्टय़ावर दिलेले आहे. गेली ३० वर्षे हे खोदकाम सुरू आहे, पण वाढत्या प्रदूषणामुळे या दगडखाणी बंद करण्याची मागणी होत आहे. पर्यावरण समितीच्या अहवालामुळे वन विभागाच्या जमिनीवरील सुमारे ९४ दगडखाणींचे भवितव्य पणाला लागले आहे. पर्यावरण मूल्यमापन समितीने या दगडखाणी बंद करण्यात याव्यात यासाठी कारणे स्पष्ट केली आहेत.

राज्य सरकारने नवी मुंबई शहर निर्माण करण्याचा निर्णय घेतल्यानेच या दगडखाणी खोदण्याची गरजच पडली आहे. शहराच्या विकासापुरता दगडखाणींचा वापर योग्य नाही. वन विभागाने दिलेल्या ९४ दगडखाणींसाठी लागणाऱ्या १३८ हेक्टर जमिनीच्या बदल्यात रोहा येथे पर्यायी जमीन दगडखाण मालकांनी दिली आहे. त्यावर वनीकरण करण्यासाठी तीन कोटी रुपये वेगळे घेतलेले आहेत. २००७ मध्ये या जमिनीची बाजारभावाप्रमाणे किंमत वसूल करण्यात आली होती. तरीही नवी मुंबईतील दगडखाणी बंद करण्याचा विचार केला जात आहे. येथील मजूर आणि दगडखाण मालकांचे इतरत्र योग्य पुनर्वसन केले पाहिजे.

नामदेव ठाकूर, अध्यक्ष, नवी मुंबई दगडखाण मालक संघटना

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व नवी मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Parsik hill digging limit end thane district environmental monitoring committee

ताज्या बातम्या