नवी मुंबई – सिडकोच्या गृहनिर्माण प्रकल्पातील अव्वाच्या सव्वा दरावरून उसळलेल्या असंतोषाने आता राजकीय वळण घेतले आहे. गणेशोत्सवापूर्वी घरांच्या किंमतीत घट झाली नाही तर उपमुख्यमंत्री व नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील निवासस्थानावर मोर्चा नेण्याचा इशारा मनसेने दिल्याने, त्यांच्या शिंदे यांच्या राजकीय कोंडीला सुरुवात होण्याची चिन्हे राज्याच्या राजकीय वर्तुळात दिसू लागली आहेत.
सिडकोच्या गृहनिर्माण प्रकल्पातील महागड्या घरांच्या दरावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) वेळोवेळी आंदोलने केली मात्र त्याकडे सरकारने दुर्लक्ष केल्याने मनसे आक्रमक झाली असून यावेळी मनसेने त्याबाबतचा स्पष्ट इशारा दिला आहे. गणेशोत्सवापूर्वी घरांच्या किंमती कमी झाल्या नाहीत तर ठाण्यातील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानावर मोर्चा नेण्यात येईल. या इशा-याने सिडकोचे सोडतीमधील स्वस्त घरासाठी अपेक्षेने वाट पाहणारे रहिवाशांच्या पुन्हा एकदा आशा पल्लवीत झाल्या आहेत. यापूर्वी ही मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी सरकारमधील राज्यकर्त्यांकडे सिडकोच्या घरांच्या किमती कमी करण्यासाठी भेट घेतल्यानंतर हे दर कमी करण्यात आले होते.
मनसेचे नवी मुंबई शहराध्यक्ष गजानन काळे यांनी पत्रकार परिषद घेऊन केलेल्या आरोपामध्ये सिडकोने काढलेल्या २६ हजार घरांच्या सोडतीनंतर जाहीर झालेल्या किंमती सामान्यांना परवडणाऱ्या नसल्याने उपमुख्यमंत्री शिंदे यांनी वारंवार बैठकीचे आश्वासन देऊनही भेट देत नसल्याने संताप व्यक्त केला. त्यामुळे सोडतधारकांचा संयमाचा अंत झाल्याने तिव्र आंदोलन करण्याची वेळ सोडतधारकांवर आल्याचे काळे म्हणाले.
मनसेचे पदाधिकारी सोडतीमधील स्वस्त घरांसोबत अजून एका मुद्यासाठी सिडकोच्या कारभारावर टीका करत आहेत. सिडको मंडळाने नूकतेच नेरुळ सेक्टर-२८ मधील काही भूखंडांची विक्री केली. मात्र नवी मुंबई महापालिकेच्या विकास आराखड्याला राज्य सरकारने मंजूर दिली असल्याचे सिडकोच्या उच्चपदस्थांना माहिती असताना सुद्धा सिडकोने विकास आराखड्यात अंतर्भूत असलेले सामाजिक सेवेच्या वापरासाठी आरक्षित असलेल्या भूखंडाची विक्री कोणत्या नियमाने केली याबाबत मनसेने आक्रमक भूमिका घेतली. यावेळी मनसेचे काळे यांनी “खेळाचे मैदान, उद्यान, ज्येष्ठ नागरिक केंद्र आणि पोलीस स्थानकासाठी राखीव असलेले हे भूखंड चढ्या दराने विकले गेले. राज्य सरकारची मंजुरी असलेल्या आराखड्याला सिडकोने डावलले,” असा आरोप केला.
सिडकोच्या घरांच्या किमती महाग असल्याचा प्रश्न विधानसभेत सत्ताधारी व विरोधी आमदारांनीही उपस्थित केला होता. मंत्री उदय सामंत यांनी घरांच्या किंमती २०-२५ टक्क्यांनी कमी करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र त्यावर कोणतीही कारवाई न झाल्यामुळे सिडकोच्या कारभाराविषयी संशय निर्माण झाल्याचे मनसेने सांगीतले. “दर आठवड्याला मंत्रिमंडळाच्या बैठकीत हजेरी लावणारे मंत्री गणेश नाईक यांनीही सर्वसामान्य नागरिकांशी निगडीत असणा-या या प्रश्नाविषयी का आवाज उचलला नसल्याकडे मनसेने लक्ष वेधले.
सरकार सामान्य जनतेविषयी कोणतेही उत्तरदायित्व ठेवत नसल्यामुळे नाईलाजेस्तव गणेशोत्सव काळात देखील ठाण्यातील मंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानासमोर मोर्चा उभारून निषेध करण्याचा इशारा मनसेने दिल्याने आगामी दिवसांत या वादाला तीव्र राजकीय स्वरूप येण्याची चिन्हे आहेत.