पनवेल : उरण विधानसभा क्षेत्रात प्रीतम म्हात्रे यांच्या उमेदवारी अर्जामुळे शेतकरी कामगार पक्ष आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत दुरावा निर्माण झाला असला तरी पनवेलमध्ये मात्र या दोन्ही पक्षांच्या उमेदवारांना महाविकास आघाडीचे नेतृत्व करणारे उद्धव ठाकरे आणि शरद पवार हे दोन्ही नेते हवेहवेसे वाटू लागले आहेत. शेतकरी कामगार पक्षाचे पनवेलचे उमेदवार बाळाराम पाटील आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या लीना गरड या दोन्ही नेत्यांनी आपल्या प्रचारात या दोन्ही नेत्यांची छबी वापरण्यास सुरुवात केली आहे. महाविकास आघाडीत फूट पडलेल्या या विधानसभा क्षेत्रात पवार-ठाकरे नेमके कुणाचे, असा सवाल आता उपस्थित होत आहे.

राज्यात महायुती आणि महाविकास आघाडीत वेगवेगळ्या भागांत मोठ्या प्रमाणावर बंडखोरी झाल्याचे पाहायला मिळत आहे. लोकसभा निवडणुकीदरम्यान शेतकरी कामगार पक्ष हा महाविकास आघाडीचा घटक पक्ष होता. असे असले तरी रायगड लोकसभा मतदारसंघात शिवसेना (ठाकरे) पक्षाचे उमेदवार अनंत गीते यांना शेतकरी कामगार पक्षाकडून हवी तशी साथ मिळाली नसल्याच्या तक्रारी ठाकरे यांच्याकडे केल्या गेल्या. यामुळे नाराज झालेल्या उद्धव ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीत शेकापचे नेते जयंत पाटील यांना मदत केली नाही.

हेही वाचा >>> रायगड काँग्रेस अखेर प्रचारात सक्रिय; काँग्रेसच्या बैठकीत निर्णय झाल्याची महेंद्र घरत यांची माहिती

विधानसभा निवडणुकांच्या जागावाटपात शेकापने अलिबाग, पेण, उरण, पनवेल या चार जागांवर दावा केला होता. मात्र उरणची जागा सोडण्यास उद्धव ठाकरे यांनी नकार दिला. या मतदारसंघात शिवसेना (ठाकरे) पक्षाचे माजी आमदार मनोहर भोईर यांना पुन्हा एकदा रिंगणात उतरविले आहे. येथून शेकापचे नेते आणि मोठे ठेकेदार जे. एम. म्हात्रे यांचे पुत्र प्रीतम यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने शेकाप आणि शिवसेना (ठाकरे) पक्षात बिनसले. असे असले तरी ठाकरे यांनी अलिबागच्या जागेवरील उमेदवार मागे घेताना जयंत पाटील यांना दिलासा दिला.

हेही वाचा >>> पनवेलमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेत फूट

शेकाप आणि शिवसेना (ठाकरे) पक्षात रायगड जिल्ह्यातील राजकारणात उलथापालथ सुरू असताना पनवेलमध्ये लढणाऱ्या या दोन्ही पक्षांच्या उमेदवारांना महाविकास आघाडीच्या नेत्यांची साथ मात्र हवी असल्याचे पाहायला मिळत आहे.

महाविकास आघाडीचे नेते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार, शिवसेनेचे उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचे राहुल गांधी यांच्या पनवेलमध्ये सभा होण्याचे आतापर्यंत तरी संकेत नाहीत. लीना गरड यांना शिवसेना (ठाकरे) पक्षाने उमेदवारी दिल्यामुळे त्यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून पत्रक प्रसिद्ध केले आहे. तसेच शेकापचे उमेदवार बाळाराम पाटील यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकांमध्ये महाविकास आघाडी हा शब्द वगळता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार गट), उद्धव ठाकरे, बाळासाहेब ठाकरे आणि महाविकास आघाडीच्या राष्ट्रीय व स्थानिक नेत्यांची छायाचित्रे लावून प्रचार सुरू केला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अन्य नेत्यांचीही छायाचित्रे पनवेल विधानसभा क्षेत्रात शेकाप आणि शिवसेना (ठाकरे) या पक्षांचे उमेदवार रिंगणात आहेत. येथे महाविकास आघाडीत उभी फूट पडली असली तरी या दोन्ही पक्षांचे उमेदवार महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या नावाचा आणि छायाचित्रांचा वापर करत प्रचार करताना दिसत आहेत. शेकापचे उमेदवार बाळाराम पाटील यांच्या प्रचार प्रसिद्धीपत्रकांमध्ये शरद पवार, बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे, राहुल गांधी, अरविंद केजरीवाल, समाजवादी पार्टीचे अखिलेश यादव यांची छायाचित्रे टाकण्यात आली आहेत, तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने दिलेल्या उमेदवार लीना गरड यांच्या प्रचारासाठीच्या प्रसिद्धीपत्रकांवरही याच नेत्यांची छायाचित्रे झळकत आहेत.