नियोजन व विधि विभागात प्रक्रिया सुरू

नवी मुंबई पालिका क्षेत्रातील गेली अनेक वर्षे रखडलेले घणसोली नोड हस्तांतर बुधवारी पार पडल्यानंतर आता लवकरच विक्रीयोग्य भूखंड वगळता खारघर, नवीन पनवेल, कळंबोली, कामोठे या सिडकोच्या नोडचे पनवेल पालिकेकडे हस्तांतर केले जाणार आहे. त्याची प्रक्रिया नियोजन व विधि विभागात सुरू असून नवीन वर्षांत हे हस्तांतर होणे अपेक्षित आहे. घणसोली नोड हस्तांतरास २० वर्षे लागली पण दक्षिण नवी मुंबईतील हे नोड पनवेल पालिकेकडे हस्तांतरित करण्यास जास्त वेळ लागणार नसल्याचे सिडकोने स्पष्ट केले आहे.

नवी मुंबई महापालिकेची स्थापना जानेवारी १९९२मध्ये झाली. त्यानंतर सिडकोने सप्टेंबर १९९४ नंतर टप्प्याटप्प्याने दिघा ते दिवाळेपर्यंतचे नवी मुंबई पालिका क्षेत्रातील सात नोड हस्तांतरित केले. या प्रक्रियेतील शेवटचा घणसोली हा नोड हस्तांतरित करण्यात आल्याने सिडकोचे पालिका क्षेत्रातील उत्तरदायित्व  संपुष्टात आले आहे. यात विक्रीयोग्य भूखंडांचे हस्तांतर करण्यात आलेले नाही. सिडकोने हे भूखंड विकल्यानंतर त्यांचे हस्तांतर होणार आहे. घणसोली व वाशी येथे सिडकोचे लवकरच नवीन गृहप्रकल्प येत आहेत. त्यामुळे येथील मोकळ्या भूखंडावर तारेचे कुंपण घालण्याचे काम सिडकोने सध्या हाती घेतले आहे. आता पनवेल पालिकेकडे हस्तांतरित करण्यात येणाऱ्या पनवेल, खारघर, कामोठे आणि कंळबोली या नोडच्या हस्तांतराचा प्रश्न अनुत्तरित आहे. या क्षेत्रातील बेकायदा बांधकामे व अतिक्रमणांवर कारवाई करण्यास पनवेल पालिकेने सुरुवात केली असून या सिडकोच्या दक्षिण नवी मुंबईचे हस्तांतर नवीन वर्षांत होणार असल्याचे समजते.

हे हस्तांतरण विनाकारण मागे ठेवण्याचे कारण नसल्याचे सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी यांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे. या दक्षिण नवी मुंबईत सिडकोची अनेक पायाभूत सुविधांची कामे सध्या सुरू आहेत. मेट्रोसारखा राज्यातील महत्त्वाकांक्षी प्रकल्प याच क्षेत्रात आहे. त्यामुळे पायाभूत सुविधांची कामे लवकरात लवकर पूर्ण करून, हे हस्तांतरण केले जाणार आहे. या भागात सिडकोचे अनेक प्रकल्प येऊ घातले असून, विकासासाठी लागणारी मोकळी जमीन याच क्षेत्रात सर्वाधिक आहे. सिडकोने येत्या चार वर्षांत ५५ हजार घरे बांधण्याचे लक्ष्य ठेवले असून यातील ७५ टक्के घरे ही खारघर भागात आहेत. त्यामुळे विक्रीयोग्य भूखंड तसेच प्रकल्पांच्या जमिनी वगळता नोड क्षेत्र पनवेल पालिकेकडे लवकरच हस्तांतरित केले जाणार असल्याचे समजते.

पनवेल, कळंबोली, खारघर, कामोठेचे भूखंड पनवेल पालिकेकडे हस्तांतरित करण्यास आम्ही तयार आहोत. सिडकोच्या सहव्यवस्थापकीय संचालिका प्राजक्ता लवंगारे आणि पनवेलचे आयुक्त सुधाकर शिंदे यांच्या बैठका सुरू असून डाटाबेस तयार केला जात आहे. हे नोडही लवकरच हस्तांतरित केले जातील.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

– भूषण गगराणी, व्यवस्थापकीय संचालक, सिडको