सुनीत पोतनीस

पुढे फिअरलेस नादिया म्हणून विख्यात झालेली मेरी इव्हान्स तिच्या वडिलांच्या युद्धातील मृत्यूनंतर पेशावरहून आईबरोबर मुंबईत राहायला आली. मुंबईत आल्यावर प्रथम तिने आर्मी अँड नेव्ही स्टोअर्समध्ये सेल्स गर्लची नोकरी वर्षभर केली. या काळात मुंबईत मॅडम अ‍ॅस्ट्रोव्हा या रशियन बॅले नíतका, बॅले नृत्याचे वर्ग घेत आणि त्यांच्या चमूबरोबर देशभरात ठिकठिकाणी ब्रिटिश सनिकांसाठी नृत्यनाटिका आणि बॅले नृत्याचे कार्यक्रम करीत असत. मेरी त्यांच्याकडे बॅले नृत्य शिकल्यावर त्यांच्या नृत्य चमूतून स्टेजवर नृत्य करू लागली. हरहुन्नरी मेरी काही काळ अ‍ॅस्ट्रोव्हा नृत्य पथकात काम करून झारको सर्कसमध्ये दाखल झाली. झारको सर्कसमध्ये मेरीच्या कसरतींमुळे ती लोकप्रिय झाली होती, पण एका ठिकाणी फार काळ न रमणारी मेरी १९३१ मध्ये हिंदी चित्रपटांमधील नृत्य पथकात सामील झाली!

लाहोरमधील एक सिनेमा थिएटर मालक आणि चित्रपट निर्मात्यांना अर्थपुरवठा करणारे कांगा यांनी मेरीचे नृत्यगुण, तिचे पाश्चिमात्य व्यक्तिमत्त्व हेरून वाडिया मूव्हीटोन या चित्रपट निर्मात्या कंपनीचे मालक जे.बी.एच.वाडिया आणि होमी वाडिया यांना मेरीला त्यांच्या चित्रपटात काही भूमिका देण्याबद्दल सुचवले. वाडिया बंधूंनी मेरीला प्रथम तिच्या िहदी उच्चारांमध्ये सुधारणा करायला लावून एका अमेरिकन जोतिषाच्या सांगण्यावरून तिचे नाव बदलून नादिया केले.

पहिल्या दोन चित्रपटातील किरकोळ भूमिकांनंतर १९३५ साली प्रदíशत झालेल्या ‘हंटरवाली’ या स्टंटपटाने नादियाचे जीवनच बदलले. नादिया आणि जॉनकावस या जोडीचे स्टंटपट तुफान लोकप्रिय झाले.

अ‍ॅनिमेशनचे तंत्रज्ञान अवगत नसलेल्या त्या काळात पुरुषांनाही अवघड वाटणारी झुंबरांना लटकणे, टेकडय़ांवरून चालत्या रेल्वेत उडी टाकणे, सिंहाशी जवळीक करणे अशी दृश्ये नादिया सहज पार पाडत असे. तिने एकूण ५० चित्रपटांत नायिका साकारली. त्यापैकी‘हंटरवाली’, ‘लुटेरू ललना’, ‘जंगल प्रिंसेस’, ‘पंजाब मेल’ वगैरे चित्रपट उल्लेखनीय आहेत. पुढे १९६१ मध्ये तिने होमी वाडिया यांच्याशी विवाह केला. चित्रपट निवृत्तीनंतर रेसच्या घोडय़ांची पदास हा व्यवसाय नादियाने केला. वयाच्या ८८ व्या वर्षी नादिया वाडियांचं निधन मुंबईच्या कम्बाला हिल रुग्णालयात झालं.

sunitpotnis@rediffmail.com