श्रुती पानसे contact@shrutipanse.com

पहिलीपासून औपचारिक शिक्षण सुरू होणार त्याच्या आधीची, सामाजिकरणासाठीची एक पायरी म्हणून बालवाडय़ांकडे पाहणं हे योग्य आहे. सध्या बालवाडय़ांमध्ये मुलांना अक्षरश: अभ्यासाला जुंपल्याचं चित्र दिसतं.

बालवाडीतच मुलांना अभ्यासाला, लेखनाला लावणं हे चूक असूनही भरपूर शाळांमध्ये हे सुरू आहे. ते का बंद झालं पाहिजे, या भावनेमागे मेंदूशास्त्रीय कारणही आहे.

मेंदूतला मोटर कॉर्टेक्स हा भाग लेखनाला मदत करतो. वयाच्या पाचव्या-सहाव्या वर्षांपर्यंत हा भाग विकसित झालेला नसतो. मुलं रेघोटय़ा काढू शकतात, चित्रं काढू शकतात, पण अक्षरं काढण्यासाठी जी क्षमता आवश्यक असते, ती नसते. यानंतर पुढच्या दोन-तीन वर्षांत हा कॉर्टेक्स हळूहळू तयार होत राहतो. प्रत्येकात हा कॉर्टेक्स विकसित होण्याचा वेग कमी-अधिक असतो.

चौथ्या-पाचव्या वर्षी मुलांच्या मनगटातल्या स्नायूंची वाढ अद्याप चालू असते. ते स्नायू पुरेसे विकसित नसतात. प्रौढांच्या हट्टाखातर मुलं लिहितात; पण त्यांच्या बोटांवर ताण पडतो. चौथी-पाचवीतच लेखन नकोसं होतं. आठवी-नववीत मुलांनी बरंच लिहिणं अपेक्षित असतं, तेव्हा मुलांना लेखनाचा पुरता कंटाळा येतो. याचं कारण लहानपणी पडलेला हा ताण. सहा वर्षांपर्यंत ही वाढ पूर्ण होते, तेव्हा मूल आपणहून लिहायला लागेल, लिहायला मागेलही. पण आत्ता त्यांच्यावर जबरदस्ती करून, एखादा कृत्रिम अभ्यासक्रम कृत्रिम पद्धतीने लादणं हे त्यांचं बालपण हिरावून घेण्यासारखंच आहे.

या वयात मुलांना मूर्त गोष्टी समजतात. जे अमूर्त आहे, त्या समजत नाहीत. तर त्यातून मुलं कसा काय आनंद मिळवतील? एक पान भरून बी (इ) लिहायचा सराव करायला देणं, यातून मूल कसा काय आनंद शोधणार? त्याला मारून मुटकून करायला लावणं, शिक्षेची भीती घालणं, टय़ूशनला घालणं, यामुळे मूल अभ्यासापासून दूर जातं.

लेखन येण्यासाठी हस्त-नेत्र समन्वयाची गरज असते. या वयात डोळ्यांची बुबुळं अजून स्थिर होत असतात, अशा काळात त्यांच्या डोळ्यांवर ताण देणं, लिहिण्यासाठी जबरदस्ती करणं हे किती चूक आहे, हे वेगळं सांगायची गरज नाही. पण स्पर्धेचं युग आहे, ‘मुलांनी शिकायलाच हवं’ अशा पद्धतीने हट्टाला पेटलेली, प्रौढ-निर्मित शिक्षणव्यवस्था मुलांना क्रूरपणे दिव्य करायला लावते आहे.