डॉ. यश वेलणकर

ध्यानाचा चौथा प्रकार म्हणजे मनात प्रेम, करुणा, आनंद, कृतज्ञता, क्षमा अशा भावना काही वेळ धरून ठेवायच्या. यालाच ‘करुणा ध्यान’ म्हणतात. ‘सर्वेऽपि सुखिन: सन्तु..’सारख्या प्रार्थना करुणा ध्यान आहेत. मात्र केवळ ते शब्द म्हणून उपयोगाचे नाही, तो भाव मनात धारण करायला हवा. भक्ती हीदेखील एक भावना आहे. जगातील साऱ्या उपासना पद्धतींमध्ये भक्तिभाव महत्त्वाचा असतो. साक्षी ध्यानाचा शोध लावून आयुष्यभर प्रसार करणाऱ्या गौतम बुद्धांच्या अनुयायांनीदेखील महायान पंथात भक्तिमार्गाचाच स्वीकार केला. भक्तिभावाने शरण जाऊन जे काही होते त्याचा स्वीकार करणे म्हणजे साक्षीभाव विकसित करणे. हे सामान्य माणसाला अधिक सोपे जात असल्याने सर्व उपासना पद्धतींमध्ये त्यास महत्त्व दिले गेले आहे. मनात असा भक्तीचा भाव धारण करणे हेही करुणा ध्यान आहे.

मात्र हे ध्यान ईश्वरावर श्रद्धा नसलेले नास्तिकदेखील करू शकतात. ‘मी आनंदी, निरोगी आहे’ अशा स्वयंसूचना हेदेखील एक प्रकारचे करुणा ध्यानच आहे. माणसाला आयुष्यात अनेकांनी मदत केलेली असते. अशा व्यक्तींचे स्मरण करून त्यांच्याबद्दल कृतज्ञता भाव आणि ज्यांनी काही त्रास दिला आहे त्यांच्याविषयी क्षमाभावना मनात काही वेळ धरून ठेवणे, हे करुणा ध्यान आहे. अशी कोणाविषयी कृतज्ञता वाटत नसेल तर ते औदासीन्याचे लक्षण असू शकते. त्याचमुळे त्या व्यक्तीला आपण एकाकी आहोत असे वाटत असते. अशा वेळी स्वत:चा स्वीकार आणि जे काही मिळाले आहे त्याची आठवण करून त्याविषयी कृतज्ञताभाव व्यक्त करणे, हा उपचारांचा भाग असतो.

एखाद्या व्यक्तीने त्रास दिलेला असेल, तर त्याच्याविषयी मनात राग असतो. त्या माणसाची आठवण आली तरी मन अस्वस्थ होते, सूड घ्यावा असे वाटत राहते. मनात सतत हेच विचार असतील, तर शरीर-मन युद्धस्थितीत राहते. त्यामुळे तणावामुळे होणारे शारीरिक आजारही होतात. ते टाळायचे किंवा बरे करायचे असतील, तर त्या व्यक्ती आणि घटनेविषयीची रागाची भावना वाढवणारे विचार कमी होणे आवश्यक असते. त्या व्यक्तीला क्षमा केली तरच तिचे विस्मरण शक्य होते. ‘खळांची व्यंकटी सांडो..’ हे ‘पसायदाना’तील शब्द म्हणजे क्षमाभावाचे करुणा ध्यानच आहे!

yashwel@gmail.com