29 May 2020

News Flash

मेंदूशी मैत्री : भीती आणि असुरक्षिततेची भावना

भीती कशाहीमुळे वाटत असो; तिच्या मुळाशी असुरक्षिततेची भावना असते. बऱ्याच मुलांना परीक्षेची भीती वाटत असते.

भीती कशाहीमुळे वाटत असो; तिच्या मुळाशी असुरक्षिततेची भावना असते. बऱ्याच मुलांना परीक्षेची भीती वाटत असते. त्यावेळी, परीक्षेत मार्क मिळाले नाहीत तर काय होईल. घरी लोक रागावतील, वर्गात कमी मार्कामुळे मित्र चिडवतील ही असुरक्षिततेची भावना मोठय़ा प्रमाणावर असते. त्याचा परिणाम म्हणून भीती वाटते. वास्तविक, भीती वाटावी असं परीक्षागृहामध्ये काहीच नसतं.

अशी एखादी चिंताजनक परिस्थिती ओढवली की आपली जीभ कोरडी पडते, छातीत धडधडतं, घाम फुटतो, झोपेवर परिणाम होतो, अस्वस्थता वाढते. पाय जड होतात, हातांचे चाळे सुरू होतात, पोटात गोळा उठतो म्हणजेच भीतीचा आपल्या संपूर्ण शरीरावर परिणाम होतो. हे केवळ प्रौढ व्यक्तींच्याच बाबतीत घडतं असं नाही. मुलांनादेखील कितीवेळा तरी भीतीला सामोरं जावं लागतं. भीतीची भावना जास्त प्रमाणात निर्माण होते, तेव्हाच नैराश्य ग्रासून टाकतं. कायम असुरक्षित वाटणाऱ्या व्यक्तीला नैराश्याच्या बाहेर पडण्याचा रस्ता सापडत नाही.

जर वातावरण ताणलेलं असेल तर ‘मनावर’-  मेंदूवर ओझं येतं. ज्या माणसाची भीती वाटते, तिथे थांबावंसं वाटत नाही. मग ते आईबाबा असोत, शिक्षक, बॉस, क्लायंट.  असा नकारात्मक अनुभव टाळावासा वाटतो. तिथून सुटका करून घ्यावीशी वाटते.

आपल्या मनातली भीती सांगता आली पाहिजे. यासाठी ती आधी आपल्याला नीट कळली पाहिजे. भीती का वाटते आहे हे कळलं तर त्यावर उपाय करता येतात. पण आपल्या या भावना कोणत्या शब्दात सांगायच्या हा अत्यंत साधा प्रश्न मुलांना पडलेला असतो. तर मोठय़ा माणसांना आपल्याला कशाची भीती वाटते आहे हे दुसऱ्याला सांगणं चुकीचं वाटतं.  वास्तविक शांत मनाने विचार करून भीतीच्या पाठीमागे असलेल्या असुरक्षिततेचं कारण शोधलं तर ‘यात भीती वाटण्यासारखं काहीच नाही’ असा साक्षात्कार होतो.

भीती वाटते त्या वेळेस काही माणसं अगदी  घाबरून एका जागेवर बसतात, तर काही माणसं येरझाऱ्या घालतात, असं आपण पाहिलं असेल. भीती वाटू नये, भीतीची तीव्रता कमी करण्याचा हा एक सोपा उपाय आहे. कारण यामुळे शरीराची हालचाल वाढते, त्यामुळे रक्ताभिसरण वाढलं, आनंदी रसायनं निर्माण झाली की मार्गही सुचतो.

– डॉ. श्रुती पानसे – contact@shrutipanse.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 3, 2019 3:24 am

Web Title: fear and feelings of insecurity akp 94
Next Stories
1 कुतूहल : द्यूतसिद्धान्ताची उपयुक्तता
2 मेंदूशी मैत्री : राग आणि असुरक्षिततेची भावना
3 कुतूहल : रांगेचा सिद्धांत
Just Now!
X