अदिती जोगळेकर
महासागरातील वाऱ्यांची गती व दिशा बदलल्याने जगभरातील हवामानात बदल होतात. वाऱ्यांची दिशा ठरवणारा एक प्रमुख घटक म्हणजे कोरिऑलिस प्रभाव. १८३५ मध्ये गुस्ताव-गास्पार्ड दे कोरिऑलिस या फ्रेंच गणितज्ञाने कोरिऑलिस प्रभाव समजावून सांगितला. पृथ्वीचे परिवलन कोरिऑलिस प्रभावाला कारणीभूत ठरते. परिवलनाची गती विषुववृत्तावर सर्वाधिक तर ध्रुवांवर सर्वात कमी असते. एखादी गोष्ट ध्रुवावरून फेकली तर विषुववृत्ताकडे येता येता खालील पृष्ठभागाची परिवलनाची गती वाढत जाते. म्हणजेच वस्तू पडण्याचे ठिकाण आरंभिबदूपेक्षा जास्त वेगाने पुढे जाते. परिणामी फेकलेली वस्तू सरळ रेषेत न पडता तिचा मार्ग वक्राकार होत जातो. या प्रभावाला कोरिऑलिस प्रभाव म्हणतात. वातावरणीय अभिसरण, व्यापारी वारे आणि सागरी प्रवाहांवर कोरिऑलिस प्रभावाचा परिणाम होतो. चक्रीवादळांचे मार्ग कोरिऑलिस प्रभावामुळे बदलतात.
अटलांटिक महासागरातील चक्रीवादळे हे त्याचे ठळक उदाहरण आहे. आफ्रिकेच्या किनाऱ्यापाशी उष्णकटिबंधीय समुद्रात चक्रीवादळांना सुरुवात होते. गरम, बाष्पभारित हवा वर जाऊ लागल्याने कमी दाबाचा पट्टा निर्माण होतो. हवेचा दाब समान करण्यासाठी उच्च दाबाकडून थंड वारे वाहू लागतात. पण कोरिऑलिस प्रभावामुळे हवेचे झोत सरळ रेषेत न येता, वक्राकार पद्धतीने केंद्राकडे वाहू लागतात व वाऱ्यांच्या जोराने संपूर्ण चक्रीवादळ गोल फिरू लागते. त्याच वेळी व्यापारी वारे वादळांना पश्चिमेकडे वाहून नेतात. दोन्हीच्या एकत्र प्रभावामुळे वादळांची चाल बदलते व ती उत्तरेकडे सरकतात. कोरिऑलिस प्रभाव जेवढा अधिक तीव्र असतो तेवढा वाऱ्यांच्या फिरण्याचा वेग वाढतो व चक्रीवादळाचा जोरदेखील वाढतो. उत्तर गोलार्धात कोरिऑलिस प्रभावामुळे वारे उजवीकडे वळतात व वादळे घडय़ाळाच्या काटय़ाच्या विरुद्ध दिशेप्रमाणे फिरतात. प्रशांत महासागरातील वादळांवरही कोरिऑलिस प्रभाव परिणाम करतो. दक्षिण गोलार्धात कोरिऑलिस प्रभावामुळे वारे डावीकडे वळतात आणि त्यामुळे वादळे घडय़ाळाच्या काटय़ाच्या दिशेप्रमाणे फिरतात.
कोरिऑलिस प्रभावामुळे सागरी प्रवाह आणि लाटांची दिशा बदलते. तसेच रॉसबी लहरी आणि केल्विन लहरी या विशिष्ट प्रकारच्या लहरींची निर्मिती होते. तटवर्ती भागात आढळणारे पश्चिम सीमा प्रवाह कोरिऑलिस प्रभावामुळे तयार होतात. वातावरणातील उच्चस्तरीय जेट प्रवाहांच्या निर्मितीमध्येदेखील कोरिऑलिस प्रभावाचा वाटा असतो. कोरिऑलिस प्रभाव आणि हवेच्या दाबामुळे नियंत्रित होणाऱ्या भूआवर्ती प्रवाहांमुळे हवामानात मोठे बदल घडतात. पर्जन्यमान आणि वादळांचा अंदाज बांधताना कोरिऑलिस प्रभाव विचारात घेणे महत्त्वाचे ठरते.