क्लिष्ट गणितीय समस्यांची अत्यल्प त्रुटी असलेली उकल जलद रीतीने मिळवण्याची आवश्यकता असल्याचे चार्ल्स बॅबेज या गणितज्ञाला प्रथम जाणवले. त्यातूनच संगणकाचा जन्म झाल्याने त्यांना संगणकाचे जनक संबोधले जाते. संगणकाचे प्रारंभीचे स्वरूप आणि कार्य बघितल्यावर हिशोब ठेवताना, आकडेमोड किंवा गणना करताना होणाऱ्या मानवी चुका टाळण्यासाठी मुळात संगणक निर्माण करून उपयोगात आणल्याचे लक्षात येते. संगणकाच्या केंद्रीय प्रक्रियकातील (सेंट्रल प्रोसेसिंग युनिट) मुख्य घटक भाग, दिलेल्या आकडेवारीवर (डेटा) अंकगणित आणि तार्किक परिकर्मी यांच्या साहाय्याने तसेच गणितातील मूलभूत तत्त्वांच्या आणि नियमांच्या आधारे क्रिया-प्रक्रिया करतो. संगणक क्षेत्रात काम करण्यासाठी अमूर्त संकल्पनांचा बोध लावणे, गणितीय तर्कसंगती उपयोगात आणणे, वास्तविक जगाची शक्य तितकी अचूक प्रतिकृती तयार करणे या सगळ्याची पूर्वावश्यकता असते. त्याची दिशा गणिताच्या अभ्यासातून मिळते. तरी त्रिकोणमिती, द्विमान अंकगणित, संच सिद्धांत, बीजगणित, भूमिती यांच्या ज्ञानाबरोबरच, संगणकशास्त्रासाठी तर्कशक्तीची मजबूत जोड हवी.

संगणकाच्या प्रक्रियांची कार्यक्षमता वाढवण्यासाठीही गणितीय विचारसरणीचा उपयोग अनिवार्य ठरतो. संगणक जालव्यूह आणि सुरक्षा शिष्टाचार प्रणालीचे (प्रोटोकॉल) कार्यक्षम प्रारूप तयार करण्यासाठी गणितातील कलनशास्त्राचा उपयोग होतो. चित्रालेखाद्वारे आकृत्या आणि चित्रे रेखाटण्यासाठी भूमितीचे ज्ञान आवश्यक आहे. अल्गोरिदमचे प्रारूप तयार करताना विविक्त (डिस्क्रिट) गणिताचा उपयोग होतो. आज्ञावली लिहिणे म्हणजेच प्रोग्रॅमिंग हे संगणकशास्त्राचे उपयोजित पण अविभाज्य अंग समजले जाते. कार्यसाधक संगणक आज्ञावली तयार करताना फलन आणि पुनरावर्तनाचा वापर अनेकदा उपयुक्त ठरतो.

tuberculosis marathi news, tuberculosis genetic sequencing marathi news
क्षयरोग उपचारामध्ये जनुकीय क्रमनिर्धारण महत्त्वपूर्ण, औषध प्रतिरोधकातील बदल समजण्यासाठी मदत
IITM Pune Bharti 2024
Pune Jobs : IITM पुणे येथे नोकरीची संधी, आजच अर्ज करा, एवढा मिळणार पगार
stock market, 3 7 crore dmat accounts
सरलेल्या आर्थिक वर्षात ३.७ कोटी डिमॅट खात्यांची भर
toll plaza
विश्लेषण : भविष्यात टोलनाके बंद होणार? कशी असेल GPS आधारित नवी यंत्रणा?

गेल्या काही दशकांमधली संगणकाची उत्क्रांती आणि विविध क्षेत्रांतले उपयोजन बघता निर्मितीच्या मूळ हेतूपासून दूर जाऊन संगणक अन्य क्षेत्रांत उपयोगी ठरत असले तरी अनेक गणितज्ञांनी संगणकशास्त्राची पायाभरणी केल्याचे सत्य आपण डोळ्याआड करू शकणार नाही. गणिताच्या आधारे तात्त्विकरीत्या जे सिद्ध केले जाते, त्यामागचा तर्क शोधून त्या प्रक्रिया स्वचालित करण्यासाठी संगणकशास्त्राची मदत होते. गणितातील उदाहरणे पद्धतशीरपणे सोडवूनही झालेल्या चुका स्वत:च शोधून सुधारण्यासाठी जसे प्रत्येक पायरी तपासत जावे लागते तसेच प्रोग्रॅममधील तांत्रिक आणि तार्किक दोष (बग्स) शोधून त्यांचे निराकरण करावे लागते. गणिती तर्कातूनच संगणकाची संकल्पना उगम पावल्याने संगणकशास्त्राची पाळेमुळे गणितातच आहेत हे विसरता कामा नये.    

– वैशाली फाटक-काटकर

मराठी विज्ञान परिषद,

वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२ 

office@mavipamumbai.org