27 January 2021

News Flash

बी युअरसेल्फ

 इतिहासाची पुनरावृत्ती होते, अस्तित्वाची पुनरावृत्ती कधीही होत नाही.

मी हजारो लोक बघितले आहेत, मी हजारो लोकांसोबत सातत्याने काम करत आलो आहे, आणि माझं निरीक्षण असं आहे की स्वत:वर प्रेम करणारे मला क्वचितच भेटले. खरंच कठीण आहे स्वत:वर प्रेम करणं. स्वत:वर प्रेम करणं, स्वत:चा आदर करणं, स्वत:ला कोणत्याही अटीशिवाय जसे आहोत तसं स्वीकारणं कठीण आहे.

स्वत:सारखे व्हा किंवा बी युअरसेल्फ हे शब्द संपूर्ण मानवजातीला बदलून टाकण्यासाठी पुरेसे आहेत; हे शब्द एका पूर्णपणे नवीन माणसाला जन्म देऊ शकतात. या शब्दांच्या गाभ्यात खूप मोठा अर्थ भरलेला आहे. मानवतेचा सगळा भूतकाळ आपण जे नाही आहोत ते होण्यासाठी केलेल्या प्रयत्नांत गेला. कारण धर्मगुरू, राजकारणी, शिक्षक आपल्याला तेच सांगत आले. ते म्हणायचे ‘ख्रिस्त व्हा’ किंवा ‘बुद्ध व्हा’. दुसरा ख्रिस्त झाला नाही आणि दुसरा बुद्धही झाला नाहीच. कधी होणारही नाहीत. कारण, तो निसर्गाचा स्वभावच नाही.

इतिहासाची पुनरावृत्ती होते, अस्तित्वाची पुनरावृत्ती कधीही होत नाही. इतिहास स्वत:चीच पुनरावृत्ती करतो, कारण तो मानवाकडून अजाणतेपणी घडलेला असतो. अस्तित्व कधीच स्वत:ची पुनरावृत्ती करत नाही, कारण अस्तित्व म्हणजे देवत्व, सर्जनशीलता. सर्जनाची पुनरावृत्ती होऊ शकत नाही. सर्जनशील व्यक्ती नेहमी ज्ञाताला मागे टाकून अज्ञाताच्या दिशेने जात असते. कोणाची तरी पुनरावृत्ती करणं हे ढोंग, लबाडी, फसवणूक आहे. ख्रिस्ताला जाणून घेणं, बुद्धावर प्रेम करणं खूप सुंदर आहे. लाओ त्झूलाही समजून घेणं सुंदर आहे. मात्र, त्यांच्यासारखं होण्याचा प्रयत्न करणं, नक्कल करणं हे हिडीस, अवमानकारक आहे. पण शतकानुशतके माणसाच्या मनाची घडण दुसऱ्या कोणासारखा तरी व्हायचं अशीच करण्यात आली आहे. तुम्हाला तुमच्यासारखं न राहू देण्यात अनेकांचे हितसंबंध गुंतलेले असतात. तुम्ही जसे असाल तसे वागलात तर काय होईल याची भीती त्यांना असते; नवं काहीही त्यांना धोक्यासारखं वाटतं. जुन्या गोष्टींना ते सरावलेले असतात. म्हणून ते म्हणतात, जुनं ते सोनं किंवा जुनं तेवढं चांगलं.

माणूस अजाणतेपणी कायम प्रस्थापित रचनेचीच आराधना करतो, कारण ती त्याला परिचित असते. आणि ख्रिस्त किंवा बुद्ध किंवा कृष्ण हा अपरिचित असतो. तो सामान्य माणसांमधून आलेला नसतो. तो दुसऱ्या जगातून आल्यासारखा वाटतो. तो वेगळी भाषा बोलतो, नवीन संदेश आणतो आणि जनतेला अज्ञातात जाण्याची भीती वाटत असते. ते जुन्याला, भूतकाळाला चिकटून राहतात. मेलेल्याची पूजा करतात आणि जिवंत असतं ते उद्ध्वस्त करतात. ही मूर्ख विचारसरणी दृढ करण्यासाठी प्रत्येकाला दुसऱ्या कोणासारखं तरी व्हा, असं सांगितलं जातं. याचा यंत्रणेला दोन कारणांनी फायदा होतो. पहिलं : दुसरं कोणी तरी व्हायचा प्रयत्न केलात की तुमच्या आयुष्यात गोंधळ होऊन जातो, कारण तुम्ही दुसरे कोणी तरी होऊच शकत नाही- ते अशक्य आहे- तुम्ही फक्त तुमच्यासारखे असू शकता. त्यामुळे दुसरं कोणी तरी होण्याच्या प्रयत्नात तुम्ही स्वत:च्या अस्सलतेपासून दूर जाल; तुमची ऊर्जा वाया जाईल. तुमचा स्वत:सोबत कायम संघर्ष सुरू राहील. तुमचं मन भूतकाळात राहील आणि हृदय म्हणेल की ‘स्वत:सारखे राहा.’ मनाचा आवाज एवढा मोठा असतो की हृदयाचा आवाज ऐकूच येणार नाही. तुम्ही विभागले जाल, स्किझोफ्रेनिक होऊन जाल. तुमचा एक भाग एका दिशेने जाईल, तर दुसरा विरुद्ध दिशेने. आयुष्यात नुसता तणाव, चिंता आणि मनस्ताप राहील.

आणि मनस्तापातल्या माणसाला गुलामगिरीत अडकवणं सोपं असतं. कारण, त्याच्याकडे बंड करण्यासाठी ऊर्जा शिल्लक नसते. बंड करायचं तर ऊर्जेचा मोठा साठा लागतो.

आणि माणसाला खच्ची करण्यासाठीही नेहमी हीच युक्ती वापरली जाते : तुमचे आईवडील तुम्हाला सांगतात, शिक्षक तुम्हाला सांगतात, आजूबाजूचे सगळे तुम्हाला सांगत राहतात : ‘‘बुद्ध व्हा, कृष्ण व्हा, ख्रिस्त व्हा.’’ पण ‘‘तुम्ही स्वत:’’ कधीच होऊ नका. हे मानसशास्त्रीय खच्चीकरणच आहे : तुमच्यात ते अपराधी भावना निर्माण करतात. तुमचं आयुष्य दु:खाने भरून जातं, कारण तुम्ही जेव्हा तुम्ही स्वत: असता तेव्हाच आनंदाची भावना अनुभवू शकता.

वाऱ्यावर, सूर्यप्रकाशात, पावसात डोलणारा गुलाब सुंदर असतो, कारण त्याने कमळ होण्याच्या प्रयत्नात स्वत:ला वाया घालवलेलं नाही. कमळ सुंदर असतं तेही याच कारणामुळे. झेंडूही सुंदरच आहे, सगळीच फुलं सुंदर आहेत ती याच साध्या कारणामुळे. ती तीच आहेत. विचार करा गुलाबाने कमळ व्हायचा प्रयत्न केला तर. कमळ होण्याच्या प्रयत्नात त्याची सगळी शक्ती संपून जाईल आणि मग तो गुलाबही होऊ शकणार नाही आणि झाला तरी तो बिचारा गुलाब असेल, ज्याला रंग नाही, गंध नाही; जो गात नाही, डोलत नाही असा. हे तुम्हाला सर्वत्र दिसू शकेल. लोक किती दु:खी दिसतात, ओझ्याखाली वाटतात, जसे काही पर्वत वाहत आहेत खांद्यांवरून. आणि ते वाहत असतात मनाचं ओझं.

बी युअरसेल्फ, तुम्ही स्वत:सारखेच व्हा. हा तोच संदेश आहे, सर्वाना प्रबुद्ध करणारा. बुद्ध म्हणतात : स्वत: स्वत:चा प्रकाश व्हा. हा त्यांचा अखेरचा संदेश आहे. मरणशय्येवर असताना त्यांनी हा अखेरचा संदेश मानवजातीला दिला :  स्वत:च स्वत:चा प्रकाश व्हा. कोणाचीही नक्कल करू नका.

तर एका बाजूला हे नक्कल करणं तुम्हाला दुबळं करतं आणि दु:खी करतं. दुबळे आणि दु:खी. तुम्ही खूप बुद्धिमान नसाल, तर यात अडकालच अडकाल. कारण, जीझस व्हायला कोणाला आवडणार नाही? कल्पना भारून टाकणारीच आहे. कुणाला बुद्ध व्हायला आवडणार नाही? ते संमोहित करणारंच आहे.

मी हजारो लोक बघितले आहेत, मी हजारो लोकांसोबत सातत्याने काम करत आलो आहे, आणि माझं निरीक्षण असं आहे की स्वत:वर प्रेम करणारे मला क्वचितच भेटले. जीझस म्हणतो : तुम्ही स्वत:वर करता तसंच प्रेम तुमच्या शत्रूवरही करा. आणि तुम्हाला वाटतं की शत्रूवर प्रेम करणं किती कठीण आहे. नाही, ते तसं नाही. खरं कठीण आहे ते स्वत:वर प्रेम करणं. स्वत:वर प्रेम करणं, स्वत:चा आदर करणं, स्वत:ला कोणत्याही अटीशिवाय जसे आहोत तसं स्वीकारणं कठीण आहे. आणि हीच तर क्रांतीची सुरुवात आहे, परिवर्तनाची सुरुवात आहे.

माझ्या सगळ्या शिकवणीचं सार या दोन शब्दांत सामावलेलं आहे – बी युअरसेल्फ!

‘गिदा स्पिरिच्युअल’मधील अंश / ओशो टाइम्स इंटरनॅशनल/सौजन्य ओशो इंटरनॅशन फाउंडेशन/ www.osho.com

भाषांतर – सायली परांजपे

chaturang@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 17, 2018 1:23 am

Web Title: osho philosophy part 7
Next Stories
1 स्वातंत्र्य
2 आयुष्य अर्थपूर्ण की अर्थहीन?
3 भित्रं मन
Just Now!
X