News Flash

आमची पंचविशी आणि ‘घाशीराम कोतवाल’

‘गगनिका’ सदरातला सतीश आळेकर यांचा ‘घाशीराम’ परदेशी!’

‘घाशीराम’च्या संदर्भातले इतरही लेख वाचले.

‘गगनिका’ सदरातला सतीश आळेकर यांचा ‘घाशीराम’ परदेशी!’ हा लेख आणि यापूर्वी ‘घाशीराम’च्या संदर्भातले इतरही लेख वाचले. मूळ प्रश्न असा की, या नाटकाचा नायक घाशीराम होता की नाना? या लेखामुळे ‘घाशीराम’ परदेशी जाण्यामागे कोण कोण होते आणि विरोधात कोण कोण होते, ते समजले.
या लेखामुळे आमच्या पंचविशीतल्या अनेक आठवणी जाग्या झाल्या. त्यावेळच्या नवनाटय़ चळवळीमुळे भारावून गेलेल्या आणि त्यावेळी विशी-पंचविशीत असलेल्या आमच्या कानावर सतत नवनाटय़ चळवळीतसंदर्भात छबिलदास, प्रायोगिक रंगभूमी, थिएटर अकॅडमी, डॉ. लागू, दामू केंकरे, पी. डी. ए., राजाभाऊ नातू, रंगायन, आविष्कार, अरविंद आणि सुलभा देशपांडे, अमोल आणि चित्रा पालेकर, कमलाकर आणि लालन सारंग, दिलीप कोल्हटकर, दिलीप कुळकर्णी, सदाशिव अमरापूरकर, अच्युत देशिंगकर, अच्युत वझे, गो. पु. देशपांडे, विजय तेंडुलकर, इन्टिमेट थिएटर, आदरणीय ‘बाई’ म्हणजे विजया मेहता, ब्रेख्त, जर्मन रंगभूमी वगैरे वगैरे शब्द पडत असत. तसंच ‘गोची’, ‘चल रे भोपळ्या’, ‘अवध्य’, ‘उद्ध्वस्त धर्मशाळा’, ‘गिधाडे’, ‘अजब न्याय वर्तुळाचा’, ‘गाबरे’ या नाटकांवरच्या चर्चा, प्रबोधन, पुरुषोत्तम करंडक.. असं काय काय ऐकता ऐकता आम्हाला अचंबा वाटे. आपणही (पूर्वीच्या स्वातंत्र्य चळवळीप्रमाणे) या नवनाटय़ चळवळीत स्वत:ला झोकून दिलं पाहिजे आणि काहीतरी ताबडतोब केलं पाहिजे असं वाटे. पण म्हणजे नक्की काय, कसं, कधी आणि कुठे करायचं, ते मात्र आम्हाला कळत नव्हतं.
त्यावेळी या ना त्या कारणाने प्रायोगिक नाटय़- चळवळ गाजत होती. तेव्हा मळकट जीन्स, झब्बे, गुरुशर्ट, शबनम झोळी, चपला, अस्ताव्यस्त केस आणि आकाशाकडे नजर लावून तिसरीकडेच पाहत वाढवलेली, जमेल तेवढे ‘इंटुक’ बनून दाढी खाजवत चळवळीच्या भवितव्याची चिंता असल्याचा अभिनय दाखवत निष्कारण अनेक विचारवंत, चिंतातुर तरुण- विशेषत: छबिलदास शाळेच्या परिसरात चारमिनार ओढत फिरत असत. (दाढीचा प्रश्न होता म्हणून की काय माहीत नाही, पण तरुणांच्या मानाने तरुणी मात्र तितक्याशा दिसत नसत. खरी कारणे माहीत नाहीत.) त्यावेळी अनंत भावेंनी ‘प्रायोवायिक’ नाटके असा एक छान नवीन शब्द छापला होता. (‘प्रायोवायिक’ म्हणजे पडलं तर ‘प्रायोगिक’ आणि चाललं तर ‘व्यावसायिक’!) पण हळूहळू ‘थिएटर’चा जप करणारे मोठमोठे अभिनेते एकेक करून छबिलदास परिसरातून अलगद ‘शिवाजी’ आणि ‘रवींद्र’ला वळसा घालून गुपचूप मराठीच नव्हे, तर हिंदी चित्रपटांतही दाखल झाले. पारंपरिक ‘पोशाखी’ नाटकांची टवाळी करीत मनसोक्त खिल्ली उडवणारे, निरनिराळी खलनायकी सोंगे घेऊन, चित्रविचित्र पोशाख करून, खोटय़ा दाढीमिश्या आणि केसांचे रंगीबेरंगी टोप लावून मिळतील त्या भूमिका करू लागले. पण मधल्या मध्ये त्या चळवळीचे काय झाले, ते कुणालाच काही समजले नाही. आणि अचानक एक दिवस पुण्याहून एक नाटक रंगमंच गाजवत आलं-‘घाशीराम कोतवाल’! हा एक ‘चांगला प्रकार’ (तेव्हा हे असंच बोलत असत.) असल्याचं जाणत्यांकडून समजलं. आम्ही ते नाटक ताबडतोब पाहिलं आणि ‘चक्क’ (हासुद्धा तेव्हाचा एक आवडता शब्द!) भारावून गेलो. खरोखरच एक वेगळं काहीतरी (म्हणजे नक्की काय?) पाहिल्याचं समाधान मिळालं. नाटकाचं सादरीकरण आवडत होतं, पण त्यातली ब्राह्मणांवरची टीका सहन होत नव्हती आणि सांगताही येत नव्हती.
बोलता बोलता ‘घाशीराम’ नावाचं चक्रीवादळ सर्वत्र घोंघावत सुटलं. त्या नाटकावर चर्चा सुरू झाल्या आणि त्यात ब्राह्मणांवर हेतुपुरस्सर केलेली कुजकट टीका हळूहळू आमच्या लक्षात येऊ लागली. आमच्या मनात गोंधळ उडू लागला. तेव्हा आम्हाला पुन्हा एकदा शंका आली की, मग हे त्या नाटकात काम करणाऱ्या बऱ्याच अस्सल पुणेरी ब्राह्मणांच्या लक्षात कसं आलं नाही?
जेव्हा हे नाटक परदेशी जायला निघालं तेव्हा एकच राजकीय धुरळा उडाला. बाळासाहेबांनी कडक भूमिका घेऊन आणि ‘घाशीराम’वर सडकून टीका करून ‘ही माणसे परदेशी कशी जातात पाहू. आणि गेलीच, तर परत कशी येतात ते पाहू!’ अशी धमकी दिली. यात त्यांचा राजकीय वगैरे हेतू होता की कसे, ते आम्हाला समजलं नव्हतं. आम्हाला बरं वाटलं. पण ‘घाशीराम’ म्हणजे ऐतिहासिक की अनैतिहासिक की दंतकथा, तेंडुलकरांचा या नाटकामागे नक्की हेतू काय, हे शेवटपर्यंत कळलं नाही.
शिवसेनेने घेतलेल्या भूमिकेमुळे आम्ही बिथरलो होतो खरे; पण सरतेशेवटी नाटक परदेशी गेलं ते गेलच आणि सुखरूप परतही आलं. प्रत्येक प्रयोगाच्या आधी नानांचे गुणगान गाणारे चार शब्द सांगून अखंड नाटकभर नानांची आणि पुण्याच्या आणि एकूणच बामणहरींची बेफाट बदनामी करण्याची सवलत मिळाली. थोडक्यात- म्हणावा तसा बार वाजलाच नाही. आणि अखेरीस ‘आमच्या नानाचं लगीन’ मात्र निर्विघ्नपणे सुखरूप पार पडलं. सगळे ‘वऱ्हाडी’ सुखरूप गेले, सुखरूप परत आले. आता हेच नाटक पुन्हा येत आहे अशी कुणकुण आहे. पाहू या नवीन पिढी त्याचं स्वागत कसं करते ते. पुन्हा एकदा ब्राह्मण-अब्राह्मण वाद वाढवायला अर्थातच आपली प्रसिद्धी माध्यमे पुरेशी सक्षम आहेतच म्हणा.

– सुभाष जोशी, ठाणे

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 22, 2015 1:01 am

Web Title: article on ghashiram kotwal 3
Next Stories
1 चुकीच्या विज्ञानतत्त्वावरील कथा
2 पडसाद
3 मकरंद-नानाची आदर्श कृती
Just Now!
X