पालघर :  बोईसर-चिल्हार रस्त्यावरील अपघातांची मालिका सुरूच आहे. या रस्त्यावरील धोकादायक वळणे प्रवाशांच्या जिवावर बेतली आहेत. गेल्या महिनाभरात बारा गंभीर प्रकारचे अपघात घडले असून एकाचा बळी गेला आहे. लहान अपघाताच्या नोंदीच पोलिसांकडे नसल्याचे सांगितले जाते. त्यामुळे हा रस्ता जीवघेणा ठरत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

दोन दिवसांपूर्वी वारांगडे येथे तारापूर औद्योगिक वसाहतीत जाणारा कच्चा माल वाहून ट्रक पलटी झाला होता.या अपघातात जीवितहानी झाली नसली तरी या रस्त्यावरील एकेरी वाहतूक काही काळ खोळंबली होती. रस्त्याच्या दूपदरीकरणाचे काम गेल्या चार वर्षांपासून संथ गतीने सुरू आहे. रस्ता तयार करताना रस्त्यावरील धोकादायक वळणांचा विचार न केल्याने ही वळणे अपघातांना निमंत्रण देणारी आहेत. वळणावर वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. यामुळे लहान-मोठे अपघात घडत आहेत.

बोईसर परिसरातील तारापूर औद्योगिक वसाहतीमधून वाहनांची या रस्त्यावर मोठय़ा प्रमाणात दळणवळण होत आहे. रस्त्याच्या दुपदरीकरणाचे काम हाती घेण्यात आल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली असली तरी त्याची गती संथ आहे. रस्त्यावरील वळणे काढण्यासाठी काही जमीन अधिग्रहित करण्यात आलेली नाही. त्यामुळे ही वळणे धोकादायक ठरत आहेत.  रस्त्यावरील वारांगडे गावच्या हद्दीतील विराज कंपनीजवळील वळण, पाच बंगला कॉलनीसमोरील वळण, वाघोबा खिंड चढताना लागणारे वळण, गुंदले येथील अधिकारी पेट्रोल पंप वळण, खुटल येथील वळण तर नव्याने सूर्या नदीवर बांधण्यात आलेल्या पुलाला दिले गेलेले वळण अत्यंत धोकादायक असून त्या ठिकाणी आत्तापर्यंत अनेकांना अपघात होऊन जीव गमवावा लागला आहे.