आज श्रद्धेच्या, परंपरेच्या संदर्भात संपन्न वर्गाकडे पाहिलं तर निराश व्हायला होतं, कारण समाजातील हा सुरक्षित वर्ग चिकित्सक व्हायला, कृतिशील व्हायला तयार नाही. हा वर्ग धार्मिक कट्टरता, श्रद्धेचं बाजारीकरण याच्या विरोधी भूमिका घेताना फारसा दिसत नाही. आधुनिकता ही मोबाइल आणि इतर उपकरणांच्या वापरात नसून ती विचारपद्धतीत असावी लागते. ज्या वर्गाने आधुनिकतेचं धुरीणत्व स्वीकारायचं तो वर्गदेखील प्रश्न न विचारता परंपरेचा पाईक होताना दिसतो. हे फार चिंताजनक आहे.

‘श्रद्धेची चुकलेली वाट’ या मागच्या लेखानंतर याच विषयावर थोडं अजून लिहावं, थोडा अजून शोध घ्यावा, असं मला वाटत होतं. लेखावर ज्या प्रतिक्रिया आल्या त्यातल्या काही प्रतिक्रियांमुळे तो विचार बळावला आणि हा लेख लिहायला मी उद्युक्त झालो. श्रद्धा आणि अंधश्रद्धा या दोघांत काही फरक आहे का हा एक कळीचा प्रश्न आहे. तात्त्विकदृष्टय़ा विचार केला तर या प्रश्नाचं उत्तर ‘नाही’ असं द्यावं लागेल, कारण श्रद्धादेखील मुळात अंतर्मनात उगवलेली, तिथे वसलेली आणि प्रश्नांच्या पलीकडची गोष्ट आहे. परंतु श्रद्धेचं अतिशय विपर्यास्त आणि हानीकारक स्वरूप म्हणजे अंधश्रद्धा, असं म्हणून या दोघींमध्ये प्रत्यक्षात एक सीमारेषा आखता येईल आणि दोघी वेगळ्या आहेत असं म्हणता येईल.

peter higgs marathi articles loksatta,
पदार्थ विज्ञानातील जादूगार…
conceit of painter whose exhibition made critics take the term Ambedkari art seriously
हे विचार, हे जगणं दृश्यात आणलं पाहिजे…
Dr. Babasaheb Ambedkar and Buddhism
विश्लेषण: ‘या’ जाती बौद्ध धर्म का स्वीकारतात? त्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदान काय?
kanyadan, valid marriage,
वैध लग्नाकरता कन्यादान नाही, तर सप्तपदी महत्त्वाची !

आपली श्रद्धा जोपासत आणि त्याचबरोबर विवेकही जागा ठेवून गरज भासल्यास त्या श्रद्धास्थानाच्या विरोधी भूमिका घेणारा कुणी असेल तर तेही स्वागतार्ह आहे. मनाची गरज म्हणून श्रद्धा आहे, पण ती आपल्या विचारशक्तीवर मात करत नाही आहे हे चित्र आश्वासक आहे. आज आपल्याला श्रद्धा, अंधश्रद्धा, धार्मिक श्रद्धा या गोष्टींची व्यक्तीनिहाय विखुरलेली रूपे पाहायला मिळतात आणि त्यामुळे आपण जेव्हा या गोष्टींना सामोरे जातो तेव्हा त्यांच्याबाबत एकदम तुकडा पाडल्यासारखा निर्णय देता येत नाही. या सर्वच गोष्टींचा संबंध माणसाच्या मन:स्थितीशी आहे आणि इथे आपल्याला समाजातील विविध वर्ग लक्षात घ्यावेच लागतात. माणसाचं समाजातलं ‘लोकेशन’ काय आहे हे न तपासता त्याची मानसिकता आपल्या विचाराची फूटपट्टी लावून बघता येत नाही. एक अनुभव सांगतो. पुण्यातील ‘सहेली’ या वेश्याव्यवसायातील स्त्रियांच्या संघटनेशी मी जोडलेलो आहे. एकदा एका व्यावसायिक स्त्रीशी बोलत असताना तिच्या चेहऱ्यावर काहीतरी लागल्याचं लक्षात आलं. चौकशी केल्यावर तिने सांगितलं की जिना उतरताना पाय अडखळून पडले आणि लागलं. जखम डोळ्याच्या जवळ होती. मी म्हटलं, ‘‘बरं झालं, थोडक्यात निभावलं.’’ त्यावर ती चटकन म्हणाली, ‘‘फिर? भगवान है ना.. भगवान संभालता है..’’ तिच्या बोलण्यात आणि आविर्भावात ‘देव आहे’ याची एवढी खात्री होती की मी क्षणभर स्तिमित झालो. वेश्यांच्या घरात देवांची रेलचेल असते हे मी पाहिलं होतं. शिवाय देवावर श्रद्धा असते हे मला नवीन नव्हतंच. पण तिच्या बोलण्यात जो ठामपणा होता त्या ठामपणामागे, तिच्या ‘देव’ या संकल्पनेत तिला उभं राहायला आवश्यक असा एक आधार होता. त्या आधाराचा मी विचार करत होतो आणि मला पराभूत वाटत होतं.

अशाच प्रकारचा अनुभव इतरही लोकांसंदर्भात आधी आला होता. देवाधर्माबाबत पूर्ण उदासीनता, नवीन काही करायची ऊर्मी, पारंपरिकतेची काहीशी चीड या प्रारंभीच्या काळापासून ‘ही एकूण सगळी गुंतागुंत आहे’ या विचारापर्यंतच्या प्रवासात अशा अनुभवांनी आपला ठसा माझ्या मनावर उमटवला आहे. आपण जेव्हा काही ‘नवीन विचार’ करतो तेव्हा तो करायची मुभा मला माझ्या सामाजिक स्थानामुळे मिळाली आहे हे लक्षात आल्यावर मला वर म्हटलं तसं पराभूतही वाटलेलं आहे. आपल्या भोवतालच्या समाजाचा आपल्याला न कळणारा प्रवाह, विविध परिस्थितींत असलेली माणसं, त्यांचं जगणं, परस्परसंबंध, त्यांचे प्रश्न, त्यांच्यावर झालेला अन्याय, त्यांचं दुखावलेपण, एकटेपण, त्यांची स्वभाववैशिष्टय़ं या सगळ्याला आपण एका सूत्रात बांधू शकतो का असा प्रश्न पडायला लागल्यावर माझा ट्रॅक थोडा बदलत गेला. दिशा बदलली नाही, पण ट्रॅक बदलला.

वरील उदाहरणातील त्या स्त्रीशी किंवा समाजातल्या कष्टकरी वर्गातील एखाद्या माणसाशी मी श्रद्धेबाबत काय बोलू शकतो? परिवर्तनाबाबत काय बोलू शकतो? इथे त्याच्यावर मर्यादा येतात. कारण मी जर ‘जगण्याचं मूळ डिझाइन’ अधिक चांगलं करू शकत नसेन तर मला त्याच्याही पुढचं काही बोलायचा अधिकार उरतो का? पण याची दुसरी बाजू अशी की जर ‘जगण्यातील सुख-दु:खाची कारणं ईश्वरी सत्तेत/इच्छेत नाहीत तर ती मानवनिर्मित आहेत’ याची जाणीव झाली नाही तर माणूस खऱ्या अर्थाने स्वत:ची उन्नती साधू शकेल का? तो संघर्षांला तयार होईल का? म्हणजे मग इथेही एकच एक उत्तर नाही. इथेही आपल्याला तारतम्याने निर्णय घ्यावा लागणार आणि विशिष्ट परिस्थितीत असलेल्या माणसांना अनुकूल अशा पद्धतीने बदल घडवायचा प्रयत्न करावा लागणार.

परिवर्तन हवं हे मान्य केलं की त्याच्या पुढचा आत्यंतिक महत्त्वाचा प्रश्न येतो तो हा की ‘कुणाचं परिवर्तन’? आणि यातला जो ‘कुणी’ आहे तो शंभर प्रकारचा आहे. त्यामुळे आपण कुणाशी बोलतोय हे आपल्याला लक्षात घ्यावं लागतं. समाजात वर्गसंघर्ष सतत कार्यरत असतो. दृश्य स्वरूपात दिसला नाही तरी त्याचा अंत:प्रवाह सुरू असतोच. मानवी आकांक्षांची टक्कर होते तेव्हा तो कार्यरत असतो. ही टक्कर अगदीच क्षीण असते किंवा नसते तेव्हा तो प्रभावी नसतो इतकंच. परिवर्तनवादी विचाराने जर वर्गसंघर्ष लक्षात घेतला नाही तर ते उलट दिशेने अंगावर येऊ शकतं. या पाश्र्वभूमीवर जेव्हा मी श्रद्धेकडे बघतो तेव्हा मला जाणवतं की जो वर्ग आज सुस्थितीत आहे, शिक्षण आणि नोकरी – व्यवसायाच्या संधी ज्यांना मिळालेल्या आहेत तो वर्गदेखील चिकित्सक होऊ शकत नसेल तर ती गंभीर गोष्ट आहे. या वर्गानेही संघर्ष केला आहेच, पण त्याचं फळही त्यांना मिळालेलं आहे. प्रत्येकालाच संघर्षांचं फळ मिळतं असं नाही त्यामुळे ज्यांना ते मिळालं आहे त्यांनी विश्लेषक वृत्ती ठेवावी ही अपेक्षा आहे. श्रीमंत, मध्यम आणि गरीब असं ढोबळ वर्गीकरण आपण करतो. पण मला यात दोन प्रमुख विभाग करावेसे वाटतात – आर्थिकदृष्टय़ा संपन्न आणि विपन्न. ज्यांची क्रयशक्ती भरपूर आहे किंवा भरपूर नसली तरी चांगली आहे ते संपन्न वर्गात येतात. त्यांच्या क्रयशक्तीत फरक असेल, काहींकडे अतिरिक्त संपत्ती प्रचंड मोठय़ा प्रमाणात असेल तर काहींकडे त्याहून कमी असेल. परंतु दोघांनाही उद्याची भ्रांत नाही आहे. जो विपन्न वर्ग आहे त्याला उद्याची भ्रांत आहे. त्यामुळे तो ‘व्हल्नरेबल’ आहे. या दोघांचं मूल्यमापन करताना त्यांना वेगळे निकष लावावे लागतील.

आज श्रद्धेच्या, परंपरेच्या संदर्भात संपन्न वर्गाकडे पाहिलं तर निराश व्हायला होतं, कारण समाजातील हा सुरक्षित वर्ग चिकित्सक व्हायला, कृतिशील व्हायला तयार नाही. हा वर्ग धार्मिक कट्टरता, श्रद्धेचं बाजारीकरण या सगळ्याच्या विरोधी भूमिका घेताना फारसा दिसत नाही. आधुनिकता ही मोबाइल आणि इतर उपकरणांच्या वापरात नसून ती विचारपद्धतीत असावी लागते. नेमका इथेच मोठा गोंधळ झाल्याचं दिसतं. ज्या वर्गाने आधुनिकतेचं धुरीणत्व स्वीकारायचं तो वर्गदेखील प्रश्न न विचारता परंपरेचा पाईक होताना दिसतो. यात परंपरेचं अतार्किक गौरवीकरण, सामाजिक प्रश्नांबाबत विश्लेषक वृत्तीचा अभाव, रेडीमेड उत्तरांवर विश्वास या गोष्टी अधोरेखित कराव्याशा वाटतात. आणि हे फार चिंताजनक आहे. व्हॉट्सअ‍ॅपवरून तुकडय़ा तुकडय़ांत जे येतं त्याला आपण ज्ञान म्हणणार असू, आपण इतिहास जर तिथे वाचणार असू तर अवघड आहे. म्हणजे मग शिक्षणाने आपल्याला माहिती दिली, पण त्यामानाने चिकित्सेची ताकद काहीच दिली नाही असं म्हणावं लागेल.

जोपर्यंत बहुतांश मानवी व्यवहारांच्या केंद्रस्थानी पैसा आहे, पैसा माणसाला ‘ड्राइव्ह’ करतो आहे तोपर्यंत आपल्याला ‘माणसाचं खरं मानवस्नेही रूप’ दिसणार नाही अशी डाव्या विचारातील मांडणी आहे. संपन्न वर्गाची स्थितिशीलता पाहिली की यातलं तथ्य जाणवू लागतं!

utpalvb@gmail.com

chaturang@expressindia.com