त्रिपुरामध्ये अचानक एक मोठे राजकीय नाट्य घडून आले आहे. पुढील वर्षी होणाऱ्या निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून त्रिपुरात एक मोठा राजकीय बदल करण्यात आला. भाजपाने आश्चर्यकारक पाऊल उचलत त्रिपुराचे मुख्यमंत्री म्हणून बिप्लवकुमार देब यांच्या जागी राज्यसभा सदस्य डॉ. माणिक साहा यांची त्रिपुराचे मुख्यमंत्री म्हणून नियुती करण्याचा निर्णय घेतला.साहा सध्या पक्षाचे प्रदेशाध्यक्षसुद्धा आहेत. 

असे घडले राजकीय नाट्य

साहा यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड झाल्यानंतर तिथे उपस्थित असलेल्या एका आमदाराने या निर्णयाला विरोध केला. यावेळी इतर आमदारांशी त्यांची वादावादीसुद्धा झाली. मंत्री रामप्रसाद पॉल यांनी माणिक साहा यांना त्रिपुराचे पुढील मुख्यमंत्री बनवण्याच्या प्रस्तावाला विरोध केला. रागाच्या भरात पॉल यांनी खुर्च्या फेकण्यास, तोडण्यास सुरवात केली. पॉल यांचा एक व्हिडिओ वायरल झाला आहे. त्यात ते मोठमोठ्याने ओरडताना दिसत आहेत. “मी मरेन, पक्ष सोडेन” अशी वाक्य ते बोलताना दिसत आहेत. या घटनेच्या दुसऱ्याच दिवशी साहा यांनी आदल्या दिवशी घडलेल्या नाटकाला “भावनिक उद्रेक” म्हटले आहे.“असे कधी कधी घडते. हा लोकशाही मानणारा पक्ष आहे. इथे सगळे चालते. जे काही होते ते शिस्तीनुसारच होते. मी पक्षासाठी काम करत आहे. मी पक्षाची सेवा करण्यासाठी येथे आलो आहे, असे ते म्हणाले. शपथ विधीच्या दिवशी काय घडणार याची चिंता शासन आणि प्रशासन दोघांनाही होती. शपथ विधीच्या दिवशी पॉल आणि उपमुख्यमंत्री जिष्णू देववर्मा उशिरा पोचले. पण आपल्याला थोडासाच उशीर झाल्याचं स्पष्टीकरण पॉल यांनी दिले.

कोण आहेत रामप्रसाद पॉल ?

रामप्रसाद पॉल हे भाजपा आणि आरएसएसचे दीर्घकाळ सदस्य आहेत. ५४ वर्षीय रामप्रसाद पॉल अनेक अपयशाच्या पायऱ्या चढल्यानंतर २०१८ साली पहिल्यांदा आमदार झाले. त्यांनी २०२० साली तत्कालीन मुख्यमंत्री बिप्लवकुमार देब यांच्या कार्यपद्धतीवर आक्षेप घेत त्यांची तक्रार करण्यासाठी पॉल यांनी दिल्लीतील पक्षाच्या जेष्ठ नेत्यांची भेट घेतली होती. त्यांना पदावरून हटवण्याची मागणी केली होती. पण तेव्हा त्याचा काही परिणाम झाला नाही. बिप्लब देब यांनी मात्र गेल्या वर्षी ३१ ऑगस्ट रोजी त्यांना त्यांच्या मंत्रिमंडळात समाविष्ट करून अग्निशमन आणि सहकार खात्याचा कार्यभार देऊन मनातील राग दूर करून आपलंसं करण्याचा प्रयत्न केला.

पॉल यांच्या रागाचं कारण काय ?

येथील राजघराण्याचे सदस्य आणि उपमुख्यमंत्री जिष्णू देववर्मा यांची मुख्यमंत्री पदी वर्णी लागेल अशी अपेक्षा पॉल यांना होती. मात्र मुख्यमंत्री पदाची माळ साहा यांच्या गळ्यात पडल्यामुळे पॉल यांना राग अनावर होऊन त्यांच्या भावनांचा उद्रेक झाला. २०२१ च्या फेब्रुवारीमध्ये पॉल आणि सध्याचे मुख्यमंत्री साहा यांच्यात खटके उडाले होते. तोच राग मनात ठेवला असल्यामुळेच पॉल यांनी इतक्या आक्रमकपणे साहा यांना विरोध केल्याचं बोलले जात आहे.