आम आदमी पक्ष यावेळी पहिल्यांदाच कर्नाटकमधील सर्व २२४ विधानसभा मतदारसंघात उमेदवार उतरवत असून त्यांनी १४० उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. मागच्या विधानसभा निवडणुकीत आपने २९ ठिकाणी उमेदवार उभे केले होते. त्यापैकी बंगळुरुमध्ये १८ आणि राज्यातील इतर भागांमध्ये ११ उमेदवार उभे केले होते. या सर्व जागांवर आपच्या उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली होती. आप पक्षाचे कर्नाटक राज्य संयोजक पृथ्वी रेड्डी यांनी द इंडियन एक्सप्रेस दैनिकाला विस्तृत मुलाखत देऊन कर्नाटक निवडणुकीसाठी आपची तयारी कशी सुरू आहे? याबद्दल माहिती दिली. कर्नाटकमध्ये सध्या अस्तित्वात असलेल्या जात, धर्म या मुद्द्यांना निवडणुकीच्या प्रचारातून बाजूला करत स्थानिक प्रश्नांना अधिक महत्त्व दिले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. पृथ्वी रेड्डी यांनी व्यक्त केलेली भूमिका प्रश्नोत्तराच्या स्वरुपात खालीलप्रमाणे…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

प्र : उमेदवार निवडीचे निकष काय आहेत?

रेड्डी : आम्ही १४० उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली असून त्यात ११ महिला, २१ पदव्युत्तर पदविका असलेले उच्चशिक्षित, नऊ डॉक्टर, १० इंजिनिअर, १४ शेतकरी, १६ वकील आणि सहा एमबीए पदवी असलेले उमेदवार आहेत. उमेदवारांची निवड करताना आम्ही त्यांची क्षमता आणि सामाजिक कार्याची पार्श्वभूमी पाहिली. जात, धर्म या आधारावर आम्ही उमेदवारांची निवड केली नाही. उदाहरणार्थ म्हणून सांगतो, शिवाजीनगर येथे आम्ही हिंदू उमेदवार दिला. हा मुस्लीमबहुल मतदारसंघ म्हणून ओळखला जातो. आम्हाला परंपरागत राजकारणाचा पोत बदलून नवी रचना प्रस्थापित करायची आहे.

हे वाचा >> मोफत वीज, शिक्षण, कर्जमाफी आणि जुनी पेन्शन योजना; कर्नाटक विधानसभेसाठी ‘आप’कडून आश्वासनांची खैरात

प्र : दिल्लीमधील पक्षात उलथापालथी सुरू आहेत, अशावेळी कर्नाटकमधील प्रचार यंत्रणा कशी सांभाळणार?

रेड्डी : दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांची अटक ही राजकीय असून त्याचा इथल्या राजकारणावर अजिबात फरक पडणार नाही. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान, राज्यसभा खासदार संजय सिंह, खासदार राघव चड्डा हे कर्नाटकमध्ये प्रचार करणार आहेत. कर्नाटकच्या कानाकोपऱ्यात दौरे करून आम्ही पंजाब आणि दिल्लीमध्ये केलेली कामे लोकांना समजावून सांगणार आहोत. छोटा पक्ष असल्यामुळे निधीची कमतरता आहेच.

प्र : कर्नाटकमध्ये आपकडे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा किंवा त्या क्षमतेचा नेता नाही, ही परिस्थिती पक्ष कसा हाताळणार?

रेड्डी : आम्ही व्यक्तिमत्त्वापेक्षा तत्त्वांना या क्षणी अधिक प्राधान्य देत आहोत. ज्यावेळी निकाल जाहीर होतील, त्यावेळी त्यातूनच नेतृत्व आपोआपच समोर येईल. आमचे सर्व २२४ उमेदवार हे मुख्यमंत्रीपदासाठी सक्षम आहेत. आम्ही हा निर्णय लोकांवरच सोडला आहे.

हे ही वाचा >> ‘आप’ची कर्नाटकमध्ये एंट्री; पहिल्याच जाहीर सभेत भाजपावर भ्रष्टाचाराचा आरोप करत हल्लाबोल

प्र : माजी आयपीएस अधिकारी भास्कर राव यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिल्यामुळे काही अडचण निर्माण होईल?

रेड्डी : मी त्यांच्यावर भाष्य करू इच्छित नाही. ते वर्षभर आपसोबत होते. या काळात ते रोज भाजपाचा भ्रष्टाचारावर तुटून पडायचे, आज ते त्याच पक्षात सामील झाले आहेत. आपमध्ये त्यांच्या राजकीय प्रगतीला मर्यादा होत्या, असे त्यांनी सांगितले.

प्र : कर्नाटकमध्ये पक्षाचे अस्तित्व अतिशय कमी असून तुम्ही सर्व जागा लढण्याचा निर्णय का घेतला?

रेड्डी : आम्ही आतापर्यंत निवडणूक लढविल्यापैकी कर्नाटक हे सर्वात मोठे राज्य आहे. पक्षाच्या इतिहासात पहिल्यांदाच आम्ही एका राज्यात २२४ जागी निवडणूक लढवत आहोत, पक्षासाठी ही गोष्ट मैलाचा दगड ठरेल. दक्षिणेत शिरकाव करण्यासाठी कर्नाटक आमच्यासाठी प्रवेशद्वार आहे. आम्हाला आमच्यावरील शहरी भागातला पक्ष, हा शिक्का पुसून काढायचा आहे. यासाठीच ग्रामीण भाग असलेल्या राज्यात आम्ही निवडणूक लढवत आहोत. जात, धर्म हे मुद्दे बाजूला ठेवून लोकांच्या स्थानिक प्रश्नांवर काम करण्यात आम्हाला रस आहे. भाजपा, काँग्रेस आणि जनता दल (धर्मनिरपेक्ष) हे एकमेकांवर भ्रष्टाचाराचे आरोप करत असल्याचे तुम्ही पाहिले असेल. पण एकही पक्ष दावा करू शकत नाही की, ते भ्रष्टाचार मुक्त आहेत. बंगळुरुमध्ये आम्ही काही जागा जिंकू हे खरे असले तरी उत्तर कर्नाटक मधील मतदारसंघ जिंकण्यावर आमचा भर असेल, याठिकाणी आम्हाला लोकांचा चांगला पाठिंबा मिळत आहे.

आणखी वाचा >> विश्लेषण : मनिष सिसोदियांच्या अटकेचा ‘आप’वर काय परिणाम होणार? जाणून घ्या सविस्तर

प्र : लोक आपला मतदान करतील, असे तुम्हाला का वाटते?

रेड्डी : आम्ही दिलेली आश्वासने पूर्ण करतो, अशी आमची ख्याती आहे. आम्ही दिल्ली आणि पंजाबमध्ये जी आश्वासने दिली होती, त्याचीच नक्कल भाजपा, काँग्रेस आणि जेडीएसने आपल्या जाहीरनाम्यात केली आहे. आम्ही आमच्या जाहीरनाम्यात १० क्षेत्रांसाठी मर्यादीत आश्वासने दिली आहेत. जसे की, ३३ युनिटपर्यंत मोफत वीज, स्थानिकांना नोकऱ्यांमध्ये ८० टक्के राखीव जागा, सरकारी नोकऱ्यांमधील सर्व जागा भरणे.. लोकांनी जर आम्हाला निवडून दिले तर पंजाब आणि दिल्लीप्रमाणे आम्ही ही आश्वासने पूर्ण करू.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aap karnataka convenor prithvi reddy talk about aap narrative in contesting karnataka assembly election kvg
First published on: 02-04-2023 at 17:12 IST