नांदेड : १८ महिन्यांपूर्वी राज्यसभा आणि विधान परिषदेच्या निवडणुकांदरम्यान राज्याच्या राजकारणात शिवसेनेपासून सुरू झालेली फाटाफूट पुन्हा एकदा राज्यसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसपर्यंत येऊन ठेपली आहे. या फुटीच्या केंद्रस्थानी नांदेड जिल्ह्यातील काँग्रेस नेते, राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे आहेत. शिंदे-फडणवीस आणि चव्हाण यांच्यातील मागील काही महिन्यांतल्या सौहार्दाची माहिती यानिमित्ताने समोर आली आहे. शिवसेनेतील फुटीचे नेतृत्व विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले होते. बहुसंख्य आमदारांच्या पाठिंब्याच्या बळावर त्यांनी नंतर निवडणूक आयोगाच्या माध्यमातून पक्षावरही ताबा मिळविला. त्यानंतर वर्षभराने अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठी फूट पडली. या गटानेही पक्षावर ताबा मिळवला. आता राज्यसभा निवडणुकीच्या तोंडावर अशोक चव्हाण यांनी काँग्रेस पक्षाचा तसेच आमदारकीचाही राजीनामा दिल्यानंतर जिल्ह्यातील इतर आजी-माजी आमदारांसह पक्षाच्या बहुसंख्य पदाधिकार्यांनी त्यांच्यासोबत राहण्याची भूमिका घेतली आहे. हेही वाचा : शिरोमणी अकाली दल अन् भाजपामध्ये युतीची चर्चा; जेडीयूनंतर आणखी एक जुना मित्रपक्ष एनडीएत परतणार? यानिमित्ताने काही जुन्या बाबींना उजाळा मिळाला आहे. जून २०२२ मध्ये झालेल्या विधान परिषद व राज्यसभा निवडणुकीत काही निकाल चमत्कारिक लागले होते. विधान परिषद निवडणुकीत चंद्रकांत हंडोरे हे काँग्रेसचे पहिल्या क्रमांकाचे उमेदवार असताना त्यांचा पराभव झाला आणि दुसरे उमेदवार भाई जगताप विजयी झाले. काँग्रेस-शिवसेना व राष्ट्रवादीकडे पुरेसे संख्याबळ असतानाही या आघाडीला परिषद व राज्यसभेमध्ये प्रत्येकी एक जागा गमवावी लागली. शिवसेनेतील फुटीनंतर राज्यात भाजपच्या मदतीने शिंदे सरकार सत्तारुढ झाल्यानंतर या सरकारच्या विश्वासदर्शक ठरावाच्यावेळी अशोक चव्हाण व त्यांचे काही सहकारी आमदार गैरहजर राहिल्यामुळे त्याची बरीच चर्चा झाली होती. पृथ्वीराज चव्हाण यांनी गैरहजर आमदारांच्या चौकशीची मागणी तेव्हा केली, पण पक्षश्रेष्ठींनी तेव्हा तो विषय फार ताणला नाही. तथापि विश्वासदर्शक ठरावाला गैरहजर राहिल्यानंतर काही दिवसांनीच म्हणजे १४ जुलै २०२२ रोजी शिंदे सरकारने भोकर विधानसभा मतदारसंघासाठी जलजीवन मिशनअंतर्गत ७२६ कोटी रूपयांची पाणीपुरवठा योजना मंजूर केली, हे विशेष. हेही वाचा : राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा नियोजित वेळेआधी संपुष्टात येणार, यूपीतील बहुतेक भाग वगळणार अशोक चव्हाण यांनी गेल्या दीड वर्षात विधानसभेत आणि पक्षाच्या व्यासपीठावरुन राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल केला, तरी या सरकारने मागील दीड वर्षात नांदेड जिल्ह्यामध्ये अशोक चव्हाण यांना नेहमीच झुकते माप दिले. गेल्या काही महिन्यांपूर्वी या सरकारने भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या साखर कारखान्याला कर्ज नाकारले होेते. तर दुसरीकडे अशोक चव्हाण यांच्याशी संबंधित साखर कारखान्याला दीडशे कोटींचे कर्ज मंजूर करण्यात आले. हेही वाचा : पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांत वर्चस्वासाठी संघर्ष वरील कर्जमंजुरी म्हणजे नियमित बाब असल्याचे भाऊराव चव्हाण कारखान्याच्या प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले होते. सुमारे दीड महिन्यांपूर्वी अशोक चव्हाण कारखानास्थळी गेले असता त्यांच्या सहकार्यांनी पुढील राजकीय निर्णयासंबंधी त्यांच्याकडे विचारणा केली होती. पण तेव्हा चव्हाण यांनी आपण काँग्रेस सोडणार नसल्याचे स्पष्ट केले होते. आता राज्यसभा निवडणुकीच्या तोंडावरच त्यांनी आमदारकीचा राजीनामा देत काँग्रेस पक्ष सोडल्यानंतर फडणवीस-शिंदे आणि चव्हाण यांच्यातील सौहार्दाची संगती बारड येथील प्रा.संदीप देशमुख यांनी घटनाक्रमांसह समोर आणली.