कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि प्रदेश काँग्रेस अध्यक्ष उपमुख्यमंत्री डी. के.शिवकुमार यांच्यातील सत्तासंघर्ष पुन्हा एकदा चव्हाट्यावर आल्याचे दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर सोमवारी काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वाने हस्तक्षेप करीत परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी एआयसीसीचे सरचिटणीस रणदीप सुरजेवाला यांना निर्देश दिले होते. या निर्णयामुळे दोन्ही गटांमधल्या अपेक्षा आता वाढल्या आहेत. कर्नाटकच्या तीन दिवसांच्या दौऱ्यात सुरजेवाला सर्व आमदार आणि विधान परिषद सदस्य, जिल्हा काँग्रेस अध्यक्ष, विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या उमेदवारांना भेटणार आहेत. तसेच प्रशासन आणि राजकारणाशी संबंधित इतर नेत्यांच्या समस्या, चिंता आणि मागण्याही समजून घेण्यासाठी त्यांच्याशी संवाद साधणार आहेत.
आमदार आणि विधान परिषद सदस्यांना भेटण्याचा त्यांचा निर्णय नेतृत्वातील विविध घटकांनी वेगळ्या दृष्टिकोनातून पहिला आहे. सिद्धरामय्या मंत्रिमंडळात संभाव्य फेरबदल किंवा नेतृत्वबदलाबद्दल आमदारांच्या भावना जाणून घेण्यासाठी हा दौरा असावा, असं काहींना वाटत आहे. असं असताना काँग्रेस हायकमांडमधील सूत्रांनी नेतृत्वबदलाची शक्यता फेटाळून लावली आहे. त्यामुळे सिद्धरामय्या या वर्षाच्या अखेरीस शिवकुमार यांना मुख्यमंत्री बनवतील या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. शिवकुमार गटातील नेते काही काळापासून दोघांमध्ये अडीच वर्षांच्या कार्यकाळवाटपाचा फॉर्म्युला तयार होण्याची शक्यता वर्तवीत आहेत. मात्र, सिद्धरामय्या गटानं अशा कोणत्याही कराराबाबतच्या शक्यता फेटाळून लावल्या आहेत आणि त्याऐवजी शिवकुमार यांच्याकडे दोन पदे असल्याचा मुद्दा उपस्थित केला आहे.
सिद्धरामय्या गटातील सूत्रांना खात्री आहे की, पाच वर्षं सिद्धरामय्या हेच मुख्यमंत्री राहतील. मुख्यमंत्र्यांच्या जवळच्या एका नेत्यानं सांगितलं, “ते काँग्रेसचे एकमेव मागासवर्गीय मुख्यमंत्री आहेत.” पक्षाच्या हायकमांडने अलीकडेच पक्षाच्या सुमारे २४ मागासवर्गीय नेत्यांचा समावेश असलेली ओबीसी सल्लागार परिषद स्थापन केली आहे. परिषदेची पहिली बैठक १५ जुलै रोजी बंगळुरू इथे होणार आहे. बैठकीनंतर सिद्धरामय्या त्यांच्यासाठी खास जेवणाचं आयोजन करतील. सिद्धरामय्या यांच्यासारख्या मागासवर्गीय नेत्याला हायकमांड कसे हटवू शकते? अशा सर्व कथा केवळ तर्कवितर्क आहेत.”
काँग्रेस हायकमांडमधील सूत्रांनी सांगितले की, सुरजेवाला यांच्या भेटीचा उद्देश नेतृत्वातल्या एका गटातील निराशा दूर करण्याचा होता. पक्षाच्या एका केंद्रीय नेत्यानं सांगितलं, “निधीच्या वाटपाबाबत एक-दोन आमदारांनी उघडपणे निराशा व्यक्त केली. त्याशिवाय पक्ष आणि सरकारमध्ये नेतृत्वाच्या बदलाबाबत अनेक प्रकारची विधानं केली जात आहेत. आम्ही त्यांना दिल्लीला बोलावून सार्वजनिक ठिकाणी अशी विधानं करण्यापासून परावृत्त करण्यास सांगण्याचा विचार केला. मात्र, आम्हाला वाटलं की, प्रभारी सरचिटणीसांनी तिथे जाऊन सर्व स्तरांतील नेत्यांना भेटणं, त्यांच्या चिंता समजून घेणं आणि संघटनात्मक, तसेच प्रशासनविषयक बाबी सार्वजनिक करू नयेत, असे सांगितल्यास योग्य ठरेल.”
ठळक मुद्दे:
- कर्नाटकात मुख्यमंत्रीपादासाठीचा संघर्ष सुरूच
- सध्या सिद्धरामय्या यांना हदलण्याचा प्रश्नच नाही – काँग्रेस
- डी के शिवकुमा यांच्या मंत्रिमंडळात फेरबदल नको
- पक्ष नेतृत्वाने सुरजेवाला यांना कर्नाटक दौऱ्यावर पाठवले
दुसरीकडे काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या एका विधानानं संमिश्र संकेत दिले आहेत. राज्यातील काही काँग्रेस नेत्यांनी ऑक्टोबरमध्ये नेतृत्वबदलाच्या दाव्यांबद्दल केलेल्या प्रश्नांना उत्तर देताना खरगे सोमवारी म्हणाले, “हे हायकमांडच्या हातात आहे. हायकमांडमध्ये काय चाललं आहे कोणीही सांगू शकत नाही आणि त्यांनाच पुढील कारवाई करण्याचा अधिकार आहे. मात्र, कोणीही अनावश्यक अडचणी निर्माण करू नयेत”.
तसेच सुरजेवाला यांच्या दौऱ्याबाबत खरगेंना विचारले असता, ते म्हणाले, “सुरजेवाला आता आले असताना त्यांचा अहवाल आणि त्यांच्याकडून मिळालेला अभिप्राय यांच्या आधारे आम्ही काय पावलं उचलायची ते ठरवू”. कर्नाटकातील एका नेत्यानं सांगितलं, “खरगेजींच्या विधानाचा वेगळा अर्थ लावता येतो. ते म्हणाले की, नेतृत्वबदल हा निर्णय हायकमांडच्या हातात आहे. दोन्ही गटांकडून त्याचा वेगळा अर्थ लावला जात आहे.”
सप्टेंबरनंतर क्रांतिकारी राजकीय घडामोडींचे संकेत देणारे सहकारमंत्री के. एन. राजण्णा यांच्या विधानानंतर बदलीची अटकळ पुन्हा सुरू झाली असताना सुरजेवाला यांची भेट झाली आहे. सिद्धरामय्या यांचे निकटवर्तीय राजण्णा यांनीही संकेत दिले होते की, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री सतीश जारकीहोली हे शिवकुमार यांच्या जागी पुढील प्रदेश काँग्रेस प्रमुख असतील. पक्षाच्या वर्तुळात मंत्रिमंडळातील फेरबदलाचीही चर्चा होत आहे. दरम्यान, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी सुरजेवाला यांच्या भेटीला कमी महत्त्व दिल्याचे दिसते. “ते एआयसीसीचे प्रभारी सरचिटणीस आहेत. ते आमदारांचे मत घेतील, त्यांच्या समस्या ऐकतील आणि संघटना मजबत करण्यासाठी नेमकं काय करण्याची आवश्यकता आहे याचा आढावा घेतील. ते त्यांचं काम करतील”, असे ते म्हणाले. कर्नाटकचे गृहमंत्री जी परमेश्वर म्हणाले, “सुरजेवाला केवळ सरकारी बाबींचाच नव्हे, तर पक्षाच्या बाबींचा आढावा घेण्यासाठी नियमितपणे कर्नाटकला भेट देतात.” ते राजकीय पैलू, पक्षाच्या कार्यक्रमांचा आढावा घेतील आणि जर पक्षात किंवा सरकारमध्ये काही गोंधळ असेल, तर प्रभारी सरचिटणीस म्हणून आम्हाला मार्गदर्शन करतील, असेही ते म्हणाले.
सुरजेवालांनी काय माहिती दिली?
दरम्यान, सुरजेवाला यांनी सांगितले, “या बैठका केवळ एक नियमित संघटनात्मक कार्य आहेत आणि नेतृत्वबदलाबाबत माध्यमांमध्ये फिरणारे वृत्त केवळ कल्पनाच आहे.” सरकारनं त्यांच्या कार्यकाळाची दोन वर्षं पूर्ण केली असल्यानं त्यांच्या संबंधित विधानसभा मतदारसंघांतील पाच हमी योजनांची स्थिती समजून घेण्यासाठी ते सर्व काँग्रेस आमदारांना वैयक्तिकरीत्या भेटत असल्याचेही त्यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, “प्रत्येक आमदाराने त्यांच्या मतदारसंघात विकासासाठी किती काम केले आहे आणि आणखी कोणती विकासकामे प्रलंबित आहेत हे पक्ष समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहे. जर गरज पडली, तर आम्ही आमच्या मंत्र्यांना आणि मुख्यमंत्र्यांना कोणते काम करायचे ते सांगू. त्याशिवाय आम्हाला आमदारांकडून हेदेखील जाणून घ्यायचे आहे की, सरकारची भूमिका काय असावी आणि सरकार लोकांच्या हितासाठी आणखी काय करू शकते.