उत्तर प्रदेशच्या इटावामध्ये गुरुवारी भागवत कथा सुरू असताना कथा सांगणारे ब्राह्मण नसून यादव असल्याची माहिती समोर आली आणि त्यानंतर मोठा गोंधळ निर्माण झाला. कथा सांगणाऱ्यांना मारहाण झाली. त्यांचे मुंडन करण्यात आले. त्यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला. यादव गटातील सदस्यांनी याविरोधात आंदोलन केले आणि संबंधित सर्व आरोपींना अटक करण्याची मागणी केली. हे आंदोलन आक्रमक झाले. या परिस्थितीसाठी समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी भाजपाला जबाबदार धरले. नेमके हे प्रकरण काय? अखिलेश यादव यांनी भाजपावर काय टीका केली? त्याविषयी जाणून घेऊ…
आंदोलनादरम्यान नक्की काय घडले?
- पोलिसांनी सांगितले की, आग्रा-कानपूर महामार्गाजवळ आणि बकेवार परिसरातील गावात मोठा जमाव जमला होता.
- पोलिसांनी निदर्शकांना पांगविण्यासाठी हवेत बंदुका धरल्या. मात्र, यादरम्यान अज्ञात व्यक्तींनी पोलिसांवर दगडफेक केली.
- २२ ते २३ जूनच्या रात्री या गावात निदर्शने झाली.
- भागवत कथा उपदेशक मुकुट मणी यादव आणि त्यांचे सहकारी संत सिंह यादव यांचे उच्च जातीच्या लोकांनी मुंडन केल्याचा आणि त्यांचा अपमान केल्याचा आरोप आहे.
- कथावाचक हे यादव जातीचे असल्याचे आढळले आणि त्यानंतर हा गोंधळ निर्माण झाला.

अखिलेश यादव यांची भाजपावर टीका
समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी शुक्रवारी या घटनेवरून भाजपावर टीका केली. अखिलेश यादव शेजारच्या राज्यांमधून समाजकंटकांना आणून जातीच्या आधारे राज्याचे विभाजन करण्याचा मोठा कट रचल्याचा आरोप केला. “उत्तर प्रदेशात घुसखोरीचे राजकारण करण्यासाठी आणि सामाजिक सौहार्द बिघडविण्याच्या उद्देशाने भाजपाने शेजारील राज्यांमधून लोकांना बोलावले; परंतु उत्तर प्रदेशातील लोकांना सत्याची जाणीव आहे. काही नकारात्मक घटकांच्या कृतींमुळे हा समाज विभागला जाणार नाही. तो आणखी मजबूत होईल,” असे अखिलेश यांनी ‘एक्स’वर लिहिले.
भाजपाचा अखिलेश यादवांवर पलटवार
उत्तर प्रदेशचे मंत्री जयवीर सिंह यांनी अखिलेश यादव यांच्यावर घटनेला जातीय वळण देण्याचा आरोप केला आणि हिंसाचार भडकवल्याचा आरोप केला. इटावाचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक (एसएसपी) ब्रिजेश कुमार श्रीवास्तव म्हणाले, “काही लोक आंदोलन करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर त्यांनी कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी शहरात, महामार्गावर आणि गावात पोलिसांना तैनात केले. ते म्हणाले, “दुपारी १.३० च्या सुमारास, आग्रा-कानपूर महामार्गावर मोठा जमाव जमू लागला. बहुतेक जणांना पांगवण्यात यश आले. मात्र, त्यातील काहींनी जबरदस्तीने दंडारपूर गावात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे तणाव निर्माण झाला आणि अस्थिर परिस्थिती निर्माण झाली.” शांतता भंग होऊ शकली असती, अशी परिस्थिती निर्माण झाली,” असे ते म्हणाले.
पोलीस अधीक्षक म्हणाले की, १९ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे आणि १३ वाहने जप्त करण्यात आली आहेत. तसेच आता परिस्थिती सामान्य आहे. आदल्या दिवशी यादव गटातील शेकडो लोक बकेवार पोलीस ठाण्याला घेराव घालण्यासाठी गेले आणि त्यांनी निषेध व्यक्त केला. पोलिसांनी आरोपींऐवजी पीडितांवर कारवाई केल्याबद्दल ते संतप्त झाले. जमावाने जबाबदार असलेल्यांना अटक करण्याची मागणी केली.
पोलीस अधीक्षक (ग्रामीण) श्रीश चंद्र यांनी पत्रकारांना सांगितले की, पोलिसांनी जमावाला रोखण्याचा प्रयत्न केला; परंतु वाद निर्माण झाला. निदर्शक पुढे जात असताना पोलिसांनी त्यांना मागे ढकलण्यासाठी लाठ्यांचा वापर केला. प्रत्युत्तरात जमावातील काही लोकांनी पोलिसांवर दगडफेक केली आणि त्यात पोलिसांच्या जीपच्या काचेचे नुकसान झाले. त्यानंतर काही निदर्शक आग्रा-कानपूर महामार्गाकडे पळाले.
अखिलेश यादव यांनी धर्मोपदेशकांबरोबर घडलेल्या कथित घटनेचा एक व्हिडीओ शेअर केला होता. त्यात आरोपी, “तुम्हाला ब्राह्मणांच्या गावात आल्याबद्दल शिक्षा होत आहे,” असे म्हणताना दिसले पीडितांनी आरोप केला आहे की, त्यांना प्रथम त्यांच्या जातीबद्दल विचारण्यात येऊन, ओळख दाखविण्यास भाग पाडले गेले आणि नंतर अपमानित केले गेले. संत सिंह यादव म्हणाले, “रात्रभर माझा छळ करण्यात आला. माझे मुंडन करण्यात आले आणि त्यांनी माझ्यावर गोमूत्र शिंपडले. मला शुद्ध करण्यासाठी तसे केल्याचे त्यांनी सांगितले.” हा ऑनलाइन व्हिडीओ समोर आल्यानंतर, पोलिसांनी आशीष तिवारी, उत्तम कुमार अवस्थी, निक्की अवस्थी व मनू दुबे अशा चार आरोपींना अटक केली.