नागपूर : नागपूर लोकसभा मतदारसंघात सलग दोनदा १८ ते २६ टक्के अधिक मते घेऊन भाजपने काँग्रेसचा पराभव केला. त्यावेळी आम आदमी पक्ष, बहुजन वंचित आघाडी, बहुजन समाज पार्टी मैदानात होती. आता ‘आप’ आणि वंचित आघाडी मैदानाबाहेर तर बसपच्या हत्तीचे बळ बरेच कमी झाले आहे. आधी काँग्रेसचा गड मानल्या जाणाऱ्या नागपूर लोकसभा मतदारसंघात २०१४ मध्ये भाजपने धक्का दिला. या निवडणुकीत संयुक्त पुरोगामी आघाडी विरोधात वातावरण होते. शिवाय नागपुरात ‘आप’कडून अंजली दमानिया यांनी भाजपचे नितीन गडकरींविरुद्ध निवडणुकीत उडी घेतली होती. दमानिया यांनी ६९,०८१ मते घेतली होती. काँग्रेस विरुद्ध भाजप अशी थेट लढत होत असतानाही बसपचे डॉ. मोहन गायकवाड यांना ९६,४३३ मते मिळाली होती. गडकरी यांनी ५,८६,८५७ घेऊन काँग्रेसला २,८४,२३९ मतांनी पराभूत केले होते. काँग्रेसला ३,०२,६१८ मते मिळाली होती.

हेही वाचा : केजरीवालांची सावली म्हणून ओळखले जाणारे बिभव कुमार नेमके कोण?

काँग्रेसने २०१९ मध्ये नागपुरात उमेदवार बदलला. परंतु, काँग्रेसला विजय मिळवता आला नाही. वंचित आघाडीने २५,९९३ मते घेतली तर बसपचे बळ अर्ध्यावर आले. या पक्षाला केवळ ३१,६५५४ मतांवर समाधान मानावे लागले. आता ‘आप’चे काँग्रेसला समर्थन आहे. वंचित आघाडीने उमेदवारच दिलेला नाही. बसपच्या हत्तीची शक्ती क्षीण झाली आहे. या निवडणुकीत सत्ताधारी संस्कृतीरक्षण, विकसित भारत या मुद्यांवर भर देत आहेत तर काँग्रेस आणि इंडिया आघाडी ओबीसींची जातनिहाय जनगणना, लोकशाही आणि राज्यघटना धोक्यात असल्याचा मुद्दा लावून धरत आहे. मागील दोन्ही निवडणुकीत संपुआविरोधी जनमत, नरेंद्र मोदी यांचा करिश्मा होता. तसेच या निवडणुकीत आप, वंचित आघाडी आणि बसपमध्ये मतांची विभागणी झाली होती. आता हे दोन्ही पक्ष निवडणुकीच्या रिंगणात नाहीत. तर बसपच्या हत्तीमध्ये बळ उरलेले नाही. त्यामुळे या निवडणुकीत भाजपचे नितीन गडकरी विरुद्ध काँग्रेसचे विकास ठाकरे अशीच थेट लढत होणार आहे.

हेही वाचा : भाजपामध्ये असताना पटनाईक सरकारवर करायच्या जोरदार टीका; आता त्याच पक्षाकडून दोन महिला लढवणार निवडणूक

भाजपच्या मतांच्या टक्केवारीत घट

२०१४ मध्ये भाजपला ५,८६,८५७ आणि काँग्रेसला ३,०२,६१८ मते मिळाली होती. बसपने ९६,४३३ आणि ‘आप’ने ६९,०८१ मते प्राप्त केली. भाजपने २६.३ टक्के मते अधिक मिळवली होती. २०१९ लोकसभेत भाजपला ६,५७,६२४, काँग्रेसला ४,४२,७६५ मते मिळाली. बसपने ३१,६५५४ आणि वंचित बहुजन आघाडीने २५,९९३ मते घेतली. या निवडणुकीत भाजपच्या विजयाच्या मतांची टक्केवारी १८.३ एवढी कमी झाली होती.