संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात सहानुभूतीचा फायदा कोणत्या उमेदवाराला मिळाला, याबाबत तर्क वितर्क सुरू झाले आहेत. या मतदारसंघातून महाविकास आघाडीतर्फे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे मावळते खासदार विनायक राऊत आणि महायुतीतर्फे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यात मुख्य लढत आहे. या मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघांपैकी चार ठिकाणी महायुतीचे आमदार आणि त्यापैकी दोघे कॅबिनेट मंत्री असल्यामुळे कागदावर तरी महायुती वरचढ आहे. मंगळवारी झालेल्या मतदानामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण-संगमेश्वर मतदारसंघाने चांगली कामगिरी बजावली आहे. येथे अजितदादा गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शेखर निकम यांनी सुरुवातीपासून राणे यांच्या प्रचारात मनापासून लक्ष घातले. मात्र त्यांचे कार्यकर्ते आणि मतदार त्याबाबत उदासीन होते. दुसरीकडे, या मतदारसंघातून विधानसभेसाठी इच्छुक असलेले शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रशांत यादव यांनी राऊत यांच्या प्रचारासाठी नेटाने काम सुरू केले. त्यामुळे तालुक्यातील आपल्या स्थानाला धक्का लागेल, या जाणिवेने निकम सावध झाले आणि शेवटच्या दोन दिवसात त्यांनी कार्यकर्त्यांना कामाला लावून आपल्या हक्काच्या वाड्या-वस्त्यांवर ‘रसद’ पोहोचवली. भाजपा आणि राणे यांनीही त्यांना चांगली साथ दिली. त्यामुळे या मतदारसंघातून राऊत यांना मिळणारी आघाडी कमी झाली असण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

महायुतीच्या उमेदवाराला सर्वाधिक मताधिक्य रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातून अपेक्षित होते. राज्याच्या मंत्रिमंडळातील वजनदार मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी त्या दृष्टीने व्यक्तिगत पातळीवर प्रयत्न केले. मात्र कार्यकर्ते आणि मतदारांनी त्यांना कितपत साथ दिली, याबाबत शंका आहे. त्याचबरोबर तालुक्यातील राजकारणात माहीर असलेले त्यांचे ज्येष्ठ बंधू किरण सामंत जवळजवळ दिवसभर ‘नॉट रिचेबल’ राहिल्याने कार्यकर्त्यांच्या वर्तुळात संभ्रम निर्माण झाला. त्याचाही फटका राणे यांना बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा: राहुल गांधींचे निवडणुकीच्या घोषणेपासून अदाणी-अंबानींवर मौन, पंतप्रधान मोदींच्या या दाव्यात किती सत्य?

जिल्ह्यातील तीन मतदारसंघांपैकी राजापूर या एकमेव मतदारसंघात ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी खिंड लढवत आहेत. त्यांच्यामागे राज्य सरकारने प्रतिबंधक खात्याचे शुक्लकाष्ट लावले असल्याने पक्षाच्या पाठिंब्याची त्यांना नितांत गरज आहे. त्यामुळे राणे यांच्याशी जुने संबंध असले तरी साळवी यांनी या निवडणुकीत प्रामाणिकपणे काम केले असावे, असा अंदाज आहे. त्यांच्या जोडीला काँग्रेस पक्षाचे नेते आणि विधानसभेचे इच्छुक अविनाश लाड यांनी जास्तच जोर लावल्यामुळे या मतदारसंघात राऊत यांना आघाडी मिळेल, अशी अपेक्षा त्यांचे कार्यकर्ते बाळगून आहेत.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदारसंघांपैकी कणकवली हा राणे कुटुंबाचा हक्काचा मतदारसंघ. कारण, तिचे त्यांचे धाकटे चिरंजीव आमदार म्हणून चांगल्या प्रकारे काम करत आहेत. त्यामुळे येथून सर्वांत जास्त मताधिक्याची त्यांना अपेक्षा आहे आणि ती पूर्ण व्हावी असे वातावरण आहे.

राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर महायुतीचे जिल्ह्यातील एकमेव मंत्री असल्यामुळे येथूनही राणे यांना चांगलं मताधिक्य मिळेल, अशी आशा राणे यांचे कार्यकर्ते बाळगून आहेत, पण जिल्ह्यातील भाजपाचे नेते राजन तेली, केसरकर आणि राणे यांचे एकमेकांशी फारसे सख्य नाही. शिवाय, गेली काही वर्षे एकमेकांचे राजकीय स्पर्धक असलेले केसरकर आणि राणे यांनी निवडणुकीच्या तोंडावर राजकीय स्वार्थासाठी एकमेकांना मिठ्या मारणे त्यांच्या कार्यकर्त्यांना, मतदारांना पटलेले नाही. या मतदारसंघाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, इथे सुमारे ३०‌ते ३५ हजार ख्रिश्चन मतदार आहे. देशातील बदललेल्या राजकीय-सामाजिक वातावरणात तो कमळाचे बटन दाबण्याची शक्यता कमी आहे.

हेही वाचा: ५,७०५ कोटींची संपत्ती, ब्रँडेड गाड्या अन् बरंच काही! कोण आहेत लोकसभेचे सर्वात श्रीमंत उमेदवार?

कुडाळ-मालवण या एकमेव विधानसभा मतदारसंघात ठाकरे यांच्या शिवसेनेचे आमदार वैभव नाईक प्रसंगी जीवावर उदार होऊन राणे यांच्याशी कौटुंबिक-राजकीय लढाई गेली सुमारे तीन दशके लढत आहेत. त्यामुळे या मतदारसंघातून ते राऊत यांनाजास्तीत जास्त मताधिक्य मिळवून देण्याचा प्रयत्न करणार, हे स्वाभाविक आहे.

या सहा मतदारसंघांमध्ये झालेल्या मतदानाच्या अंतिम आकडेवारीनुसार, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मतदारसंघ लहान असल्यामुळे टक्केवारीमध्ये वरचढ दिसतात. पण या दोन जिल्ह्यांमधील मतदानाची आकडेवारी पाहिली तर रत्नागिरी जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदारसंघांमध्ये मिळून एकूण ४ लाख ६८ हजार १९९ आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात ४ लाख ३९ हजार ४१९ मतदान झाले आहे. म्हणजे , रत्नागिरी जिल्ह्यात सुमारे २८ हजार मतदान जास्त आहे.

या लढतीतील दोन्ही प्रमुख उमेदवारांना मतदानानंतर प्रसारमाध्यमांनी प्रतिक्रिया विचारली असता, भाजपाचे उमेदवार राणे यांनी, ‘विजयाचे वातावरण आहे. ४ जूनला त्याचा अनुभव येईल,’ असे मोघम उत्तर दिले, तर ठाकरे गटाच्या शिवसेनेचे राऊत म्हणाले की, याआधी आपण दोन ते अडीच लाख मतांनी निवडून येऊ, असा अंदाज बांधला होता. पण झालेले मतदान लक्षात घेता ही आघाडी आणखी जास्त राहील, असा विश्वास वाटतो.

हेही वाचा: यंदा काँग्रेस लढवतेय सर्वात कमी जागा; ‘इतक्या’ जागा दिल्या मित्र पक्षांना

अशा प्रकारे रितीनुसार दोन्ही उमेदवारांनी विजयाचा दावा केला असला तरी यावेळच्या निवडणुकीच्या प्रचार काळात मतदारांनी आपला कल कुठं आहे, याबाबत घट्ट मौन धारण केले होते. काही ठिकाणी मतदानाबाबत उदासीनता दिसून आली, तर इतर काही ठिकाणी, पक्षाचा स्वीकार, पण उमेदवाराला नकार, अशी भावना होती. या मतदारांनी नेमके काय केले असावे, याबाबत अंदाज बांधणे कठीण आहे. रत्नागिरी जिल्ह्यात झालेले जास्त मतदान कोणाला लाभदायक ठरणार, याबाबतही तर्कवितर्क चालू झाले आहेत. राज्यातील फोडाफोडीच्या राजकारणामुळे काहीजणांची सहानुभूती ठाकरे गटाकडे होती, तर सुमारे दहा वर्षांनंतर निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले ज्येष्ठ नेते नारायण राणे उर्फ ‘दादां’ना शेवटची संधी द्यावी, अशी सहानुभूतीची भावना, विशेषतः सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मतदारांमध्ये दिसून आली. म्हणजे सहानुभूती दोन्ही बाजूंकडे आहे. त्याचा निर्णायक लाभ कोणाला मिळणार, याबाबत आडाखे बांधले जात आहेत. पण सत्ताधारी गटाबाबत नाराजीचे राजकीय वातावरण येथेही असले तर ती महाविकास आघाडीच्या बाजूने कलण्याची जास्त शक्यता आहे. मात्र व्यक्तिगत पातळीवर राहिली तर महायुतीला लाभ होईल, असे चित्र आहे.