दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांनी रविवारी मध्य प्रदेश येथे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जाहीर सभा घेतली. यावेळी त्यांनी भाजपाचे नेते आणि मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्यावर टीका केली. शिवराज सिंह चौहान यांचा मामा असा उल्लेख करत केजरीवाल म्हणाले की, त्यांनी आपल्या भाची आणि भाच्यांची फसवणूक केली आहे. त्यापैकी आता ‘तुमच्या काका’वर (केजरीवाल) विश्वास ठेवा. यावेळी केजरीवाल यांनी तेलंगणामध्ये दोन दिवसांपूर्वी दिलेली आश्वासने मध्य प्रदेशच्या जनतेलाही दिली. संपूर्ण राज्यासाठी २४ तास वीजपुरवठा, दर्जेदार शिक्षण अशी त्यातील प्रमुख आश्वासने होती.

“मला असे कळले की, मध्य प्रदेशमध्ये मामा आहे. या मामाने स्वतःच्याच भाची-भाच्यांना फसवले आहे. त्यांच्यावर विश्वास ठेवू नका. आता तुमचा काका या ठिकाणी आलेला आहे. त्यामुळे तुम्ही काकावर विश्वास ठेवा. मी येथे शाळा, महाविद्यालये, रुग्णालये उभारतो आणि मध्य प्रदेशच्या युवकांच्या हाताला काम देतो”, अशी भूमिका केजरीवाल यांनी व्यक्त केली.

हे वाचा >> Chhattisgarh : वीज, आरोग्य, शिक्षण मोफत देण्याचे ‘आप’चे आश्वासन; ‘इंडिया’ आघाडीत बिघाडी?

मध्य प्रदेशच्या सतना जिल्ह्यात जाहीर सभेला संबोधित करत असताना आम आदमी पक्षातर्फे ‘केजरीवाल की गँरंटी’ या पुस्तिकेचे अनावरण केले. यामध्ये मोफत वीजपुरवठा, दर्जेदार शिक्षण, सर्वांना मोफत आरोग्य सुविधा, वृद्धांना मोफत तीर्थयात्रा आणि शहीद झालेल्या सैनिकांच्या कुटुंबीयांना एक कोटी रुपयांचा सन्मान निधी अशा प्रकारच्या लोकप्रिय घोषणा केजरीवाल यांनी केल्या.

केजरीवाल पुढे म्हणाले की, भाजपा आणि काँग्रेस मध्य प्रदेशच्या जनतेला मोफत वीज देण्यात अपयशी ठरले आहेत. तुम्ही त्या दोन्ही पक्षांच्या (काँग्रेस आणि भाजपा) सरकारचा मागच्या ७५ वर्षांचा अनुभव घेतला आहे, तरीही तुम्हाला अखंडित वीजपुरवठा मिळालेला नाही. आम आदमी पक्ष तुम्हाला अखंडित वीज देण्याचे वचन देत आहे. जर तुम्हाला अनेक तासांचे भारनियमन हवे आहे, तर मग तुम्ही याच पक्षांना मतदान करा.

आणखी वाचा >> अरविंद केजरीवाल कठोर हिंदुत्ववादी; असदुद्दीन ओवैसी यांनी आपला पाठिंबा देण्यास केला विरोध

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आम आदमी पक्ष सध्या इंडिया आघाडीचा घटक पक्ष आहे. काँग्रेसशी आघाडी करण्याची चर्चा सुरू असतानाच आता केजरीवाल यांनी मध्य प्रदेशमधील काँग्रेसच्या कारभारावर टीका केली. ते म्हणाले की, मध्य प्रदेशमध्ये लाच घेऊन नोकऱ्या देण्यात आल्या. “मध्य प्रदेशमध्ये पैसे घेऊन सरकारी नोकऱ्या देण्यात आल्या. आता हा भ्रष्टाचार बंद झाला पाहिजे. दिल्ली आणि पंजाबमध्ये गुणवत्तेच्या आधारावर नोकऱ्या दिल्या जातात. आम्ही भ्रष्टाचाराचे समूळ उच्चाटन करणार आहोत. पंजाबमध्ये आतापर्यंत ३००० अधिकारी, कर्मचारी आणि काही मंत्र्यांनाही भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे जेलची हवा खावी लागली आहे. त्यांनी भ्रष्टाचारातून कमावलेल्या पैशांतून शाळा आणि रुग्णालय बांधली जात आहेत. इथेही मागच्या सरकारने जो जो भ्रष्टाचार केला आहे, त्यांच्याकडून त्याची वसुली केल्याशिवाय आम्ही राहणार नाही”, अशीही घोषणा केजरीवाल यांनी केली.