Aam Aadmi Party expelled MLA Umesh Makwana : गुजरातच्या विसावदर विधानसभा पोटनिवडणुकीत विजय मिळवून सत्ताधारी भाजपाचा पराभव करणाऱ्या आम आदमी पार्टीला ७२ तासांतच एक मोठा धक्का बसला. बोटाद विधानसभा मतदासंघाचे आमदार उमेश मकवाना यांनी गुरुवारी पत्रकार परिषद घेत पक्षातील सर्व पदांचा राजीनामा दिला. त्यानंतर आम आदमी पार्टीने त्यांची तातडीने पक्षातून हकालपट्टी केली. दरम्यान, कोण आहेत उमेश मकवाना? त्यांनी ‘आप’च्या सर्व पदांचा तडकाफडकी राजीनामा का दिला? पक्षाने त्यांची हकालपट्टी नेमकी कशामुळे केली? याबाबत जाणून घेऊ…
आम आदमी पार्टीतील सर्व पदांचा राजीनामा देताना मकवाना म्हणाले, “मागासवर्गीय आणि ओबीसी समुदायांचा वापर केवळ निवडणुकीच्या काळात मतदानासाठी केला जातो. मी ज्या कोळी समुदायाचे प्रतिनिधीत्व करतो, त्या समाजातील नेत्यांचाही वापर फक्त निवडणुकीपुरताच केला जातो. भाजपा आणि काँग्रेसमध्येही असंच होतं आणि निवडणुकीनंतर नेत्यांना बाजूला सारलं जातं.” आमदार मकवाना यांनी असा आरोप केलाय की, विसावदर पोटनिवडणुकीत विजय मिळवणाऱ्या गोपाल इटालिया यांनाच पक्षाने सर्व गोष्टींचं श्रेय दिलं आणि माझ्यासारख्या इतर नेत्यांकडे दुर्लक्ष केलं.

मकवाना म्हणतात- ‘आप’मध्ये दलितांविषयी भेदभाव

“गुजरातमधील कडी विधानसभा पोटनिवडणूक लढविण्यासाठी आम आदमी पार्टीचे उमेदवार जगदीश चावडा १० लाख रुपयांचं कर्ज घेतलं होतं, असं सांगत आमदार उमेश मकवाना यांनी पक्षावर दलित उमेदवारांप्रती भेदभाव केल्याचा गंभीर आरोप केला आहे. विसावदरच्या पोटनिवडणुकीत पटेल समुदायातील गोपाल इटालिया यांच्यासाठी आपचे संपूर्ण नेते प्रचारात गुंतले होते. त्यांनी कोट्यवधी रुपयांचा खर्च केल्याने ते निवडून आले. कडीचा उमेदवार गरीब आणि दलित असल्यामुळे पक्षाने त्याला एकटं सोडलं. अशा प्रकारचा भेदभाव खपवून घेतला जाणार नाही,” असा आरोप मकवाना यांनी केला.

आणखी वाचा : Nasbandi Colony : दिल्लीतील एका वस्तीला नसबंदी कॉलनी कसं नाव मिळालं? आणीबाणीत तिथे काय घडलं?

कोण आहेत आमदार उमेश मकवाना?

  • उमेश मकवाना हे गुजरातमधील बोटाद विधानसभा मतदासंघाचे ‘आप’चे आमदार आहेत.
  • २०२० मध्ये त्यांनी भाजपाला सोडचिठ्ठी देऊन आम आदमी पार्टीत प्रवेश केला होता.
  • त्याआधी मकवाना हे बोटाद जिल्ह्यातील भाजपाच्या युवा मोर्चाचे काम पाहत होते.
  • भाजपाच्या माजी खासदार भरतीबेन शियाळ यांचे ते वैयक्तिक सहायकही राहिले होते.
  • २०२२ च्या विधानसभा निवडणुकीत ‘आप’ने मकवाना यांना उमेदवारी दिली होती.
  • त्यांनी भाजपाचे उमेदवार घनश्याम विरानी यांचा दोन हजार ७९९ मतांनी पराभव केला होता.
  • त्यानंतर आम आदमी पार्टीने त्यांची गुजरात विधानसभा व्हिप म्हणून नियुक्ती केली होती.
  • २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत ‘आप’ने मकवाना यांना भालनगर मतदारसंघातून उमेदवारी दिली होती.
  • मात्र भाजपाच्या उमेदवार निमूबेन बांभनिया यांनी त्यांचा तब्बल साडेचार लाख मताधिक्याने पराभव केला होता.
  • या निवडणुकीत काँग्रेसबरोबर आघाडी करणाऱ्या आपला भरुची मतदारसंघातही दारुण पराभवाचा सामना करावा लागला.
mla Umesh Makwana and arvind kejriwal (pti photo)
आम आदमी पार्टीचे प्रमुख अरविंद केजरीवाल व बोटाद विधानसभा मतदारसंघाचे आमदार उमेश मकवाना (छायाचित्र पीटीआय)

उमेश मकवाना आमदारकीचा राजीनामा देणार?

दरम्यान, उमेश मकवाना यांनी आम आदमी पार्टीच्या व्हीपसह इतर पदांचा राजीनामा दिला असला तरी, त्यांनी अजूनही आमदारकीचा राजीनामा दिलेला नाही. “आगामी विधानसभेची निवडणूक स्वतंत्रपणे लढायची की नवीन पक्ष स्थापन करायचा याबाबत मी लवकरच निर्णय घेईन,” असे त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं आहे.

आमदार उमेश मकवाना यांची पक्षातून हकालपट्टी

आमदार उमेश मकवाना यांनी आम आदमी पार्टीवर गंभीर आरोप केल्यानंतर पक्षाचे प्रदेशाध्यक्ष इसुदान गढवी यांनी त्यांना पाच वर्षांपासून पक्षातून निलंबित केलं आहे. त्याचबरोबर मकवाना यांनी तातडीने आमदारकीचा राजीनामा द्यावा, असे आव्हानही त्यांनी दिलं आहे. मकवाना यांनी पक्षातील नेत्यांवर केलेले आरोप खोटे आणि बिनबुडाचे असल्याचं इसुदान गढवी यांनी स्पष्ट केलं आहे. दरम्यान, मकवाना यांच्या बंडामुळे गुजरातमध्ये बळ वाढवण्याचा प्रयत्न करणाऱ्या आम आदमी पार्टीला मोठा धक्का बसला आहे.

उमेश मकवाना यांची भाजपाशी मिलीभगत – आपचा आरोप

आम आदमी पार्टीवर आघात करणाऱ्या आमदार उमेश मकवाना यांच्यावर पक्षाने गंभीर आरोप केले आहेत. आपचे अध्यक्ष इसुदान गढवी यांनी असा दावा केलाय की, आमदार मकवाना हे भाजपाबरोबर संगनमत करून जाणीवपूर्वक पक्षाला इजा पोहोचविण्याचा प्रयत्न करीत आहेत. उमेश मकवाना यांनी आमदारकीचा राजीनामा द्यावा आणि पुन्हा निवडणूक जिंकून दाखवावी, असं थेट आव्हानही गढवी यांनी दिलं आहे. इतकंच नाही तर भाजपानेही मकवाना यांना उमेदवारी देऊन बोटाद विधानसभा मतदारसंघ जिंकून दाखवावा, असंही त्यांनी म्हटलं आहे.

हेही वाचा : Maharashtra Politics : शरद पवारांचा सहकार क्षेत्रातील प्रभाव कसा कमी झाला?

विसावदरमध्ये आपचा विजय, पाच जागांवर पुन्हा कब्जा

विसावदर विधानसभा पोटनिवडणुकीत विजय मिळवून आम आदमी पार्टीने भाजपाला मोठा धक्का दिला आहे. या विजयासह गुजरात विधानसभेतील आपच्या आमदारांचं एकूण संख्याबळ पाचवर पोहोचलं आहे. २०२२ मध्येही पक्षाने विसावदर मतदारसंघात दणदणीत विजय मिळवला होता. विशेष बाब म्हणजे गेल्या निवडणुकीच्या तुलनेत आपचे मताधिक्य ४५.१८ टक्क्यांवरून आता ५१.०४ टक्क्यांवर पोहोचलं आहे. आम आदमी पार्टीने जिंकलेल्या पाचपैकी चार जागा सौराष्ट्र भागात आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सौराष्ट्रात ‘आप’चे मजबूत अस्तित्व

विसावदर, बोटाद, जामजोधपूर आणि गढीयाधर या मतदारसंघावर सध्या आपचे वर्चस्व आहे. तर मध्य गुजरातमधील डेडियापाडा ही अनुसूचित जमातींसाठी राखीव असलेली जागाही सध्या आम आदमी पार्टीच्या ताब्यात आहे. आमदार उमेश मकवाना यांच्या बंडखोरीनंतर आप आणि भाजपा यांच्यातील राजकीय आरोप-प्रत्यारोप शिगेला पोहोचले आहेत. आगामी काळात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीवर या संघर्षाचे परिणाम दिसून येण्याची शक्यता आहे.