संजीव कुळकर्णी

राज्यातील महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस हा दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष असला, तरी नांदेड आणि लातूर जिल्ह्यात आम्हाला काँग्रेसच्या पालकमंत्र्यांचा जाच सहन करावा लागतो, त्यावर उपाय म्हणून या दोन जिल्ह्यांसाठी राष्ट्रवादीच्या खमक्या मंत्र्याची संपर्कमंत्री म्हणून नियुक्ती करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. तूर्तास लातूर व नांदेड या दोन जिल्ह्यातच अशी व्यूहरचना केली जात आहे. नांदेडचे पालकमंत्री म्हणून सध्या काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोकराव चव्हाण काम करत आहेत, तर लातूरचा कारभार अमित देशमुख यांच्याकडे आहे. या दोन्ही नेत्यांपुढे डाळ शिजत नसल्याने राष्ट्रवादीच्या दृ्ष्टीने राजकीय अशक्त या जिल्ह्यांमध्ये खमक्या मंत्र्यांची नेमणूक करण्याची ठरविले जाण्याची शक्यता आहे.

‘राष्ट्रवादी’चे अध्यक्ष खासदार शरद पवार, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील हे नांदेड मुक्कामी राहिलेले नेते रविवारी सकाळी मुंबईला रवाना झाले. तत्पूर्वी त्यांनी पक्षाचे जिल्हाध्यक्ष हरिहरराव भोसीकर यांच्या निवासस्थानी भेट दिली. या भेटी दरम्यान पवार यांनी नांदेड जिल्ह्यात पक्ष विस्तारासाठी काय प्रयत्न चालले आहेत, अशी विचारणा स्थानिक पदाधिकाऱ्यांकडे केल्यानंतर काँग्रेस आणि या पक्षाच्या स्थानिक सर्वोच्च नेत्याविरूद्ध तक्रारीचा सूर निघाला. धनंजय मुंडे यांच्याकडे सध्या नांदेड जिल्ह्याचा कारभार असून त्यांना कार्यबाहुल्यामुळे अधिक वेळ देता येत नसल्याने संपर्कमंत्री बदलण्याची गरज असल्याची रविवारी चर्चा झाली. या चर्चेवेळी राज्यमंत्री संजय बनसोडे, माजी राज्यमंत्री जयप्रकाश दांडेगावकर, माजी आमदार प्रदीप नाईक, पक्षाचे प्रदेश सरचिटणीस बसवराज पाटील नागराळकर, नांदेड जिल्ह्याचे सरचिटणीस डी.बी.जांभरूनकर, वसंत सुगावे, बाळासाहेब भोसीकर आदी मंडळी हजर होती.

जिल्ह्यात पक्षवाढीसाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत; पण काँग्रेसच्या पालकमंत्र्यांचा जाच सहन करावा लागतो. ज्या तालुक्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे चांगले प्राबल्य आहे अशा भागांमध्ये जिल्हा नियोजन समितीचा निधी देण्याच्या बाबतीत हात आखडता घेतला जात आहे. पक्षाच्या कार्यकर्त्यांची कामे केली जात नाहीत, असे एका पदाधिकाऱ्याने पवार यांना सांगितल्यानंतर तेथे हजर असलेल्या लातूर जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी आमच्या जिल्ह्यातही अशीच स्थिती असल्याची पुस्ती जोडली.नांदेड जिल्ह्यासाठी सध्या संपर्कमंत्री कोण आहे, अशी विचारणा पवार यांनी केल्यानंतर धनंजय मुंडे यांचे नाव त्यांना सांगण्यात आले; पण स्थानिक परिस्थिती पाहता पक्षाने नांदेड जिल्ह्यासाठी प्रभावी व खमका संपर्कमंत्री नेमावा, अशी मागणी पवारांकडे केल्यानंतर तेथे उपस्थित असलेले ज्येष्ठ नेते कमलकिशोर कदम यांनी संपर्कमंत्रिपदासाठी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांचेच नाव सुचविल्याचे समजते. कमलबाबूंच्या या सूचनेवर स्वतः वळसे पाटील यांनी कोणतीही प्रतिक्रिया नोंदविली नाही.

चौकट – 

नांदेड-लातूर जिल्ह्यातली राष्ट्रवादीची स्थिती

नादेड जिल्ह्यातील नऊ विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचा एकही आमदार नाही. त्यामुळे संघटनात्मक पातळीवर तसा आनंदी आनंद आहे. तुलनेने लातूर जिल्ह्यातील सहा मतदारसंघात अहमदपूरमध्ये बाबासाहेब पाटील व उदगीरमध्ये राज्यमंत्री संजय बनसोडे असले, तरी हात पाय पसरण्यासाठी राष्ट्रवादीला खूप कष्ट घ्यावे लागतात. त्यामुळे कुपोषित जिल्ह्यात संपर्क मंत्रीही ताकदीचे द्यावेत या मागणीने जोर धरला जात आहे.