बिपीन देशपांडे

औरंगाबाद : डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अधिसभा निवडणुकीतही महाविकास आघाडीचा प्रयोग करण्याच्या दृष्टीने हालचाली गतिमान झाल्या आहेत. या संदर्भाने काँग्रेस, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) व राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांच्या पातळीवर चर्चा करून प्रस्ताव पाठवण्यापर्यंतची प्रक्रियाही झालेली आहे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद पुरस्कृत विद्यापीठ विकास मंच व मुख्यमंत्री शिंदे यांचा गट सोबत उतरण्यासाठीही प्रयत्न सुरू आहेत.

विद्यापीठ अधिसभा निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली, त्याच दरम्यान, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे औरंगाबादेत होते. त्यांची औरंगाबाद दौऱ्यात शहराध्यक्ष शेख युसूफ व प्रदेश पातळीवरील पदाधिकाऱ्यांनी भेट घेऊन विद्यापीठ अधिसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा प्रयोग करण्याविषयी चर्चा केली. नाना पटोले यांच्या परवानगीनंतरच काँग्रेसकडून राष्ट्रवादीचे नेते तथा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांच्याकडे आघाडी करण्याविषयीचा प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. आमदार चव्हाण यांच्याकडून अद्याप कुठलाही प्रतिसाद मिळाला नसला तरी तो मिळेल, असा विश्वास काँग्रेसच्या युवक संघटनेतील पदाधिकाऱ्यांना वाटतो आहे. शिवसेनेकडूनही आदित्य ठाकरे, वरुण सरदेसाई हे विद्यापीठ अधिसभा निवडणुकीत लक्ष घालत आहेत. येत्या दोन दिवसांत आदित्य ठाकरे हे औरंगाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्या दरम्यानही आघाडी करण्याच्या दृष्टीने अनेक घडामोडींना वेग येणार आहे. या संदर्भाने युवा नेते विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या संपर्कात असून त्यांनाही आदित्य ठाकरे, वरुण सरदेसाई यांनी आघाडी करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू ठेवण्याचे आदेश असल्याचे शिवसेनेतील (उद्धव बाळासाहेब ठाकरे) सूत्रांकडून सांगण्यात आले.

हेही वाचा… वन क्षेत्रात राहुल गांधींच्या ‘पदयात्रे’चा मोटारीने प्रवास, सुरक्षा व पर्यावरणाची हानी टाळण्याचा मुद्दा

पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत काँग्रेस व शिवसेनेकडून (ठाकरे गट) राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सतीश चव्हाण यांच्यामागे ताकद उभी करण्यात आली होती. पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत सतीश चव्हाण हे ५७ हजार ८९५ एवढ्या मताधिक्याने निवडून आले होते. त्याची उतराई म्हणून चव्हाण यांनी शिवसेना (ठाकरे गट) व काँग्रेसशी संबंधित उमेदवारांना मदत करून महाविकास आघाडीचा प्रयोग यशस्वी करून दाखवावा, अशी बोलणी सुरू आहे. या संदर्भात आमदार सतीश चव्हाण हे राष्ट्रवादीच्या शिर्डी येथील मंथन शिबिरात असल्यामुळे त्यांच्याशी संवाद होऊ शकला नाही. दरम्यान, विद्यापीठ निवडणुकीतील उत्कर्ष पॅनेल असून त्याच्यामागे सतीश चव्हाण त्यांची सर्व (धन) शक्ती पणाला लावत असल्याचा आरोप विद्यापीठ विकास मंचकडून करण्यात येत आहे.

हेही वाचा… वसंत मोरे : जनतेच्या मनातील नेता

विद्यापीठातील अधिसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मविआचा प्रयोग करण्याच्या दृष्टीने काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची औरंगाबाद दौऱ्यात भेट घेऊन चर्चा केली. त्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत राष्ट्रवादीच्या वरिष्ठ पातळीवरील नेत्यांशी चर्चाही केली. त्यांच्या परवानगीने काँग्रेसचे शहराध्यक्ष शेख युसूफ यांनी राष्ट्रवादीचे आमदार सतीश चव्हाण यांच्याकडे आघाडीच्या संदर्भाने प्रस्ताव पाठवला आहे, असे प्रदेश युवक काँग्रेसचे सचिव डाॅ. नीलेश आंबेवाडीक यांनी सांगितले. तर विद्यापीठ निवडणुकीत महाविकास आघाडी आकारास आली तर अधिक चांगले. त्यासाठी शिवसेनेकडून प्रयत्न करण्यात येतील. मात्र, आघाडी नाही झाली तर स्वतंत्रही लढू, असे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी म्हटले आहे.

हेही वाचा… पालकमंत्री गिरीश महाजनांचे अमित देशमुख यांच्याकडून कौतुक; वादळ थांबविणारे नेतृत्व म्हणत सूर जुळवून घेण्याचा प्रयत्न

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विद्यापीठ विकास मंच व शिंदे गट एकत्र येण्याविषयी सकारात्मक चर्चा सुरू आहे. अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस पार पडला आहे. यानंतर पुढील चर्चा करण्यात येईल, असे बाळासाहेबांची शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र जंजाळ यांनी म्हटले आहे.