नागपूर : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शरद पवार यांचा नुकताच दोन दिवसीय नागपूर दौरा आटोपला. हा दौरा पक्षाच्या मंडळ यात्रेच्या शुभारंभाच्या निमित्ताने होता. मात्र पवार यांनी या दौ-यात एका दगडात अनेक पक्षी मारल्याचे दिसून आले.

मंडळ यात्रेसाठी संघभूमी नागपूरची निवड, राहुल गांधीच्या निवडणूक आयोगावरील मतचोरीच्या आरोपाला समर्थन, याच मुद्यावरून फडणवीस यांना केलेले लक्ष्य आणि कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेऊन पक्षातील मरगळलेपणा दूर करण्याचा प्रयत्न आदी पवार यांच्या नागपूर दौ-यातील प्रमुख बाबी ठरल्या.

देशात सर्वात प्रथम मंडळ आयोग महाराष्ट्रात लागू करण्याचे श्रेय शरद पवार यांना जाते. हीच बाब केंद्रस्थानी ठेवून राष्ट्रवादीने मंडळ यात्रेचे नियोजन केले. या माध्यमातून भाजपचे ओबीसी प्रेम किती बेगडी आहे हे सांगण्याचा प्रयत्न आहे. मंडळ आयोगाच्या शिफारशी लागू करण्यास कोणती शक्ती त्यावेळी अग्रेसर होती आणि तीच शक्ती आता आपण ओबीसींचे तारणहार कसे आहोत हे दर्शवण्याचा प्रयत्न करत आहे, ही बाब राष्ट्रवादीच्या नेत्यांनी यात्रेच्या शुभारंभाचा सांगून या यात्रेमागचा उद्देश स्पष्ट केला. . मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शहरात येऊन भाजपचे वस्रहरण करण्याचा हा प्रकार होता. वास्तविक राष्ट्रवादी शरद पवार गटाची ताकद नागपूर मध्ये नगण्य स्वरूपाची असताना मंडळ यात्रेसाठी नागपूरची निवड करणे व त्याची चर्चा घडवून आणले यात पवार यशस्वी ठरले.

दुसरी बाब म्हणजे मतचोरीच्या राहुल गांधींच्या आरोपाला पवार यांनी दिलेले समर्थन आणि याच अनुषंगाने त्यांनी केलेला नवा गौप्यस्फोट. याचे पडसाद दिल्लीपर्यंत उमटले. पवार यांनी निवडणूक आयोगाच्यावतीने भाजपकडून केला जाणारा प्रतिवाद यावरही टीका केली. त्यांचा रोख फडणवीस यांच्याकडे होता. या सर्व प्रकरणात संशयाची सुई भाजपकडे वळवण्याचा पवार यांचा प्रयत्न यशस्वी झाल्याचे दिसून येते.

तिसरी बाब म्हणजे पक्षात जीवंतपणा आणण्यासाठी विविध भागात दौरा करून कार्यकर्ते, नात्यांच्या भेटी घेणे. नागपूर दौ-यात पवार यांनी नागपूर दौ-यात अनेक नेत्यांच्या भेटी घेतल्या. कॉंग्रेस आमदार विकास ठाकरे हे सुद्धा पवार यांना भेटले. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी विधान परिषद सदस्य प्रकाश गजभिये यांच्या घरी स्नेहभोजनाला गेले. पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रवीण कुंटे पाटील याची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. यातून कार्यकर्त्यांमध्ये सकारात्मक संदेश दिला

दरम्यान सुरूवातीला राष्ट्रावादीच्या मंडल यात्रेकडे दुर्लक्ष करणा-या भाजपने नंतर त्याची दखल घेतली. नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही यात्रा बोगस असल्याची टीका केली.