scorecardresearch

अजातशत्रू मुनगंटीवार

सुधीर मुनगंटीवार म्हणजे राजकारणातील अजातशत्रू व्यक्तिमत्व. पक्षात ते एकाचवेळी जसे फडणवीसांना प्रिय तसेच गडकरींच्याही जवळचे.

अजातशत्रू मुनगंटीवार
सुधीर मुनगंटीवार- कॅबिनेट मंत्री

शफी पठाण

 शिंदे – भाजप युती सरकारच्या पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेणारे सुधीर मुनगंटीवार म्हणजे राजकारणातील अजातशत्रू व्यक्तिमत्व. पक्षात ते एकाचवेळी जसे फडणवीसांना प्रिय तसेच गडकरींच्याही जवळचे. पक्षाबाहेरही त्यांच्या चाहत्यांची यादी मोठीच. याचे कारण त्यांचा स्पष्टतावादी तरी सर्वांना सोबत घेऊन चालणारा स्वभाव. विषय पक्षातला असो वा सार्वजनिक जीवनातला. मुनगंटीवार स्पष्ट भूमिका घेतात, परिणामांची पर्वा न करता रोखठोक बोलतात. हा आपला, तो त्यांचा असा दुजाभाव न करता ‘सबका साथ’ला अनुसरून त्यांची वाटचाल असते. म्हणूनच मुनगंटीवार यांना ‘विदर्भाचा बुलंद आवाज’ही संबोधले जाते.

चंद्रपूर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणारे मुनगंटीवार १९९५ पासून सलग सहा वेळा विधानसभेवर निवडून आले आहेत. फडणवीस सरकारच्या कार्यकाळात त्यांच्याकडे अर्थ आणि वन अशी दोन अत्यंत महत्त्वाची खाती होती. या काळात त्यांनी विदर्भ आणि मराठवाडा या भागांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. अर्थमंत्री असताना जिल्हा विकास निधीत घसघशीत वाढ केली. चंद्रपूर जिल्ह्यात जागतिक पातळीवरील वन अकादमी त्यांच्याच पुढाकाराने सुरू झाली.

उच्‍च विद्याविभूषित व लोकप्रिय आमदार अशी मुनगंटीवार यांची राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात ओळख आहे. विद्यार्थी दशेपासून भारतीय जनता पक्षाशी जुळलेल्या मुनगंटीवार यांच्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्कार आहेत. संघटनात्मक पातळीवरही त्यांनी अनेक महत्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडल्या. १९९३ मध्‍ये भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष , १९९६ मध्‍ये महाराष्‍ट्र प्रदेश भाजपाचे सरचिटणीस आणि २०१० मध्‍ये ते प्रदेश भाजपाचे  अध्यक्ष होते. विदर्भात भाजपच्या प्रमुख नेत्यांमध्ये त्यांचा समावेश होतो. भाजप नेते नितीन गडकरी व देवेंद्र फडणवीस या दोन्ही प्रमुख नेत्यांशी त्यांचे उत्तम संबंध आहेत. फडणवीस सरकारच्या काळात ज्या मंत्र्यांवर आरोप झाले नाहीत, त्यात मुनगंटीवार यांचा समावेश होतो. 

मराठीतील सर्व सत्ताकारण ( Politics ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Sudhir mungantwar is the person who maintain the relations with all print politics news pkd

ताज्या बातम्या